सामंताचा दरबार
सामंताचा दरबार

सामंतशाही ही शासनव्यवस्था मध्ययुगीन काळात युरोप खंडात अस्तित्वात होती. ही शासनव्यवस्था संरक्षण व सेवा या तत्त्वांवर आधारलेली होती. मध्ययुगीन काळात संपूर्ण युरोपात सामंतशाहीचे अस्तित्व असले तरी स्थल व कालानुसार तिची स्वरूपे भिन्न होती. सामंतशाही ही शासनपद्धती युरोपात इसवी सनाच्या ९व्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंत टिकून राहिली.

८व्या शतकातील रोमन साम्राज्य दूरपर्यंत पसरलेले होते. त्यामुळे राज्यकारभार करण्यात अडचणी येऊ लागल्या. ह्यातून मार्ग काढण्यासाठी रोमन सम्राट शार्लमेनने आपल्या सरदारांना जहागिरीच्या रूपाने मोबदला म्हणून भूप्रदेश देण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेतून सामंत म्हणून ओळखल्या जाणार्‍या सत्ताधार्‍याचा एक नवा वर्ग उदयास आला. अशा प्रकारे सामंतशाहीची पद्धत सुरू झाली.

शेतजमिनीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. राजा हा राज्यातील जमिनीचा मूळ मालक होता. साम्राज्यातील जमीन कसण्यासाठी राजा ती सामंतांमध्ये वाटून देत असे. वरिष्ठ सामंत मिळालेल्या जमिनी कनिष्ठ सामंतांना वाटत होते. कनिष्ठ सामंत आपल्या जमिनी कुळांना देत असत. कुळांना सामंतांचे संरक्षण मिळे. त्याच्या बदल्यात ते सामंतांची सेवा करत.

सामंतशाहीत राजा हा सर्वात श्रेष्ठ होता. सामंतशाही व्यवस्थेवर त्याचे नियंत्रण होते. राजानंतर वरिष्ठ सामंत (ड्यूक व अर्ल), कनिष्ठ सामंत (बॅरन), सर्वात कनिष्ठ सामंत (नाईट) असा क्रम लागे. सामंतांनंतर शेतकरी व भूदासाचा क्रम होता. या व्यवस्थेत सामंत सर्वांत प्रबळ होते. सामंतशाहीची रचना पिरॅमिडसारखी होती.

(पुढे वाचा...)