रखमाबाई जनार्दन सावे

(रखमाबाई राऊत या पानावरून पुनर्निर्देशित)

रखमाबाई जनार्दन सावे (२२ नोव्हेंबर १८६४ - २५ सप्टेंबर १९५५) या एक भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या. त्या ब्रिटिश भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टरांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. तसेच १८८४ ते १८८८ या काळात बालवधू म्हणून त्यांच्या विवाहाशी संबंधित ऐतिहासिक खटल्यात सहभागी होण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या प्रकरणाने अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सार्वजनिक चर्चा घडवून आणली, ज्यामध्ये ब्रिटिश भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांतील कायदा विरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणा विरुद्ध पुराणमतवाद आणि स्त्रीवाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. या घटनांचा परिणाम म्हणून शेवटी १८९१ मध्ये संमतीवयाचा कायदा लागू करण्यात आला.

रखमाबाई जनार्दन सावे
जन्म २२ नोव्हेंबर, इ.स. १८६४
मृत्यू २५ सप्टेंबर, इ.स. १९५५ (वय ९० वर्षे)
पेशा डॉक्टर
प्रसिद्ध कामे भारतातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर, स्त्रियांचे स्वातंत्र्य

बालपण

संपादन

हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वतः उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेले सापत्यविधवेसोबतचे लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचेही धाडसाचे पाऊल होते.

रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्त्व घडवणं, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावे लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेले असते तर असा - सासरी जाणे हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (इ.स. १८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मते स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना [[चहा पार्टी]साठी आमंत्रणे धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकाने आणि आदराने पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ॲलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो.

शिक्षण

संपादन

त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' येथील परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ एडिंबरा अँड ग्लासगो' (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण झाल्या. 'लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स' (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झाले.

लोकप्रिय संस्कृतीत

संपादन
  • 2008 मध्ये, रुखमाबाई आणि त्यांचे पती यांच्यातील कायदेशीर खटल्यातील तपशील गुलामगिरीच्या मुली: वसाहतवाद, कायदा आणि महिला हक्क ( ) लेखक सुधीर चंद्र यांनी. []
  • 2016 मध्ये, रुखमाबाईची कथा अनंत महादेवन दिग्दर्शित आणि डॉ स्वप्ना पाटकर निर्मित तनिष्ठा चटर्जी अभिनीत डॉक्टर रखमाबाई या मराठी चित्रपटात रूपांतरित करण्यात आली. []रथ

कार्य

संपादन

वैद्यकीय कार्य

संपादन

रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.

त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बऱ्याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हणले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निऱ्या शिवून ठेवत.)

अन्य सेवाभावी काम

संपादन

एक डॉक्टर म्हणून त्यांचे काम महत्त्वाचं, पण त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामेही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानड्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या इ.स. १९०७ च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केले, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचे कार्य लक्षात घेऊन इ.स. १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आले.

स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकेच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचे गावदेवीचे मंदिर सर्वांसाठी खुले केले. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणे, तिला लिहायला वाचायला शिकवणे, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणे अशी कामे त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खाते काढायला लावून बचतीचे महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या.

व्यक्तिगत आयुष्य

संपादन

जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणाऱ्या होत्या, तसेच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात' हे तत्त्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणाऱ्या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल.

रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचे मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्याने देण्याची व्यवस्था केली. वयानुसार डोळ्यांनी दिसणे अगदीच कमी झाले तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवाने रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.

सासरी जाण्यास विरोध

संपादन

पती दादाजी भिकाजी ठाकूर त्यांनी बालपणी झालेल्या स्वतःच्या अयोग्य विवाह बंधनाद्दल लढा दिला. त्यासाठी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिन्हे यांनी निकाल रखमाबाईच्या बाजूला दिला. त्यांचे वकील न्या. तेलंग होते. त्यावर लोकमान्य टिळक व केळकर यांनी टीका केल्या. टिळकांनी आपल्या केसरी मध्ये " रखमाबाईचा खटला " नावाने लेख लिहिला. तर आगरकर व पंडिता रमाबाई यांनी रखमाबाई यांना समर्थन दिले. नंतर १८८७ मध्ये वरील कोर्टात दादोजी यांनी याचिका केली असता निकाल रखमाबाई यांचे विरोधात लागला. तेव्हा त्यांचे वकील फिरोजशाह मेहता होते. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये तेव्हा रखमाबाई वर ५ लेख दिले.

हेसुद्धा पाहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. "डॉ. रखमाबाई : एक आर्त", मोहिनी वर्दे, "पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
  2. http://www.streeshakti.com/bookR.aspx?author=16
  3. http://www.womenofbrighton.co.uk/rukhmabai.html
  4. http://creative.sulekha.com/rukhmabai-india-s-first-lady-doctor_544716_blog
  5. http://books.google.co.in/books?id=rpuSzowmIkgC&pg=PA599&lpg=PA599&dq=ru...
  6. http://www.open.ac.uk/researchprojects/makingbritain/content/rukhmabai
  7. http://www.aisiakshare.com/node/2220
  1. ^ Chandra, Sudhir (2008). Enslaved Daughters: Colonialism, Law and Women's Rights (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. doi:10.1093/acprof:oso/9780195695731.001.0001. ISBN 978-0-19-569573-1.
  2. ^ Doctor Rakhmabai | Official Teaser | Tannishtha Chatterjee |access-date= requires |url= (सहाय्य)