काळूबाई

(मंदारदेवी काळूबाई मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक-भक्त वर्षभर येत असतात.

मांढरदेवी काळूबाई
निवासस्थान मांढरदेव ता. वाई जि. सातारा
वाहन सिंह
शस्त्र तलवार, ढाल, त्रिशूळ, गदा, चक्र, शंख, भाला
वडील दक्ष प्रजापती/हिमालय
आई प्रसुती/मैनाराणी
पती महादेव
अन्य नावे/ नामांतरे मांढरदेवी, काळेश्वरी, डोंगरची वाघिण ,
या अवताराची मुख्य देवता पार्वती
मंत्र महिषासूरमर्दिनी स्तोत्र, काली कवच
नामोल्लेख देवी माहात्म्यम् दुर्गा सप्तशती, शिवमहापुराण मार्कण्डेय पुराण देवीभागवत पुराण
तीर्थक्षेत्रे  • मांढरदेव,  • भागिनघर, ता. राजगड,  • वेल्हे,  • कुसुंबी,  • वरोशी,  • कांजळे,  • बोपगाव,  • केळवडे

समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्टया शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणेसातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई - भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांढरगड. अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी साता-याहून वाईमार्गे तर पुण्याहून भोरमार्गे जाता येते. शिवाय पुर्वेकडून शिरवळवरून लोहोम-झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊलवाट आहे. पायथ्याला झगलवाडीतही देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो. मधल्या टप्प्यावर जाळीतल्या म्हसोबाचे कडक देवस्थान आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे. त्यानंतरच्या टप्प्यावर मांढव्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर आहे. स्थानिक लोक तिला मंडीआई असे म्हणतात. या मंदिरासमोरच गोमुखतीर्थ हे जलकुंड आहे.

द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासूराचा सेनापती देवीलाख्यासूराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला साहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांढव्यऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले. त्यांनी हिरडाच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू- महादेवाची तपसाधना केली, त्याठिकाणी मंडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्यालाच मांढेश्वर असेही म्हणतात. हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे.

शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेत तेथुन जवळपास १२५ पायऱ्या चढाव्या लागतात. मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची ५फूट उंचीची मूर्ती लागते. मुख्य मंदिराचे सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह तीन खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची दोन फूट उंचीची शेंदूरचर्चित महिषासूरमर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे. मुर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडी-चोळी नेसवलेली असते. हळदी-कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. भक्त आईची ओटी खण-नारळाने भरतात. देवीभक्तीची ज्योत अखंड रहावी म्हणूनच मंदिरासमोरच दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजीबाबा (गोविंदबुवा) तरडावीकडे शिपाई मांगीरबाबा यांची मंदिरे आहेत. याशिवाय गडावर मरीमाता, लक्ष्मीआई, गंगाजीबाबा, तेलीबाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमाणांचा तांडा असून गडाला ५२वीरांचा वेढा आहे.

पौषी यात्रेच्या दोन दिवस आधी जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा केली जात असते. या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे 'बोपगावच्या फडतरे' यांना असतो. गावोगावची भक्तमंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल-ताशा-हलगी-संबळ-झांजेच्या तालावर छबीना काढून डोंगर चढून येत असतात. यात्रेला महाराष्ट्रसह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. शाकंभरी पौणिर्मेशिवाय नवरात्रौत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरत असते. 'काळूबाईच्या नावानं चांगभलं' आणि 'बोल मांढरच्या काळीचं चांगभलं'च्या गजराने सारा परिसर दुमदुमुन जातो.

मंदिर -

देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून ४६५० फूट टेकडी वर हे मंदिर आहे. ते साताऱ्यातून २० कि.मी. अंतरावर आहे

मांढरदेवी काळुबाईचे मंदिर आहे . मंदिर लहान असुन त्यास सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आहे आहे. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत.तसेच मुख्य मंदिरासमोरिल डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचं ठान आहे. काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असुन वनराई ने नटलेला आहे.

मूर्ती-

मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मुर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मुर्तीस शेंदुर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व इतरवेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो. देवीचे वाहन सिंह हे आहे.

आख्यायिका-

सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. (या ऋषिंमुळे गडाला मांढरगड नाव पडले) त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिद्धिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली.तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरविले. पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढुन वर आली आणि ऋषिंमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळुबाईचे पुजन केले होते.अशी एक दंतकथा सांगितली जाते.

यात्रा / उत्सव -

देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली. म्हणून आजही पौष पोर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेउन गडावर येतात. ढोल , झांज ही ही देवीची प्रमुख वाद्य आहेत.भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच सेवकांना मासांहारी नैवेद्य दाखवतात . पौष पोर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवुन हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. देवीचा छबिना हा यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण आहे.