प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती

संस्कार संकल्पना

संपादन

मनुष्याच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यकर्मावर समाजात धर्माचा पगडा बराच बसला आहे असे दिसून येते.शिक्षण विषयक संस्कारात कालानुक्रमे विद्यारंभ किंवा अक्षरस्वीकरण हा संस्कार सर्वात आद्य होय. पाचव्या वर्षी प्राथमिक शिक्षणाचा प्रारंभ होवून मुले अक्षरे शिकू लागत त्यावेळी हा संस्कार करण्यात येत असे.त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे. त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे. ज्यामुळे गुरुगृही राहून पुढील शिक्षण घेण्याची परवानगी विद्यार्थ्याला मिळत असे. वैदिक काळात मुलींचे उपनयन होवून त्या ही गुरुगृही राहून अध्ययन पूर्ण करीत असत. वेदांचे अध्ययन संपवून ब्रह्मचारी गुरुगृहाहून स्वगृही परत जाण्याला निघाला म्हणजे समावर्तन संस्कार करण्यात येई.

गुरूंचे महत्त्व

संपादन

वैदिक शिक्षण पद्धतीत गुरूंचे महत्त्व विशेष मानले आहे.गुरू हा शिष्याचा आध्यात्मिक पिता मानला गेला असल्याने आई व वडील यांच्यापेक्षा गुरूंचे स्थान शिष्याच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरत असे.अति प्राचीन काळी लेखन कला अस्तित्वात नसताना गुरूच्या मुखातून आलेले ज्ञान ग्रहण केले जात असे.बौद्ध संघामध्ये भिक्षु लोक शिष्यांची आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे सर्व व्यवस्था करीत असत. केवळ अध्यापन एवढाच गुरूचा कार्यभाग नसून व्यक्तिगत आरोग्याची काळजी कशी घ्यावी येथपर्यंतचे विषय गुरू शिष्यांना समजावून सांगत असत.

वैदिक अभ्यासाचे विषय

संपादन
  • १.वेदकालाचा पूर्वार्ध-

या कालखंडात वैदिक मंत्र,इतिहास,यज्ञकर्म,भूमितीज्योतिष या वैदिक पद्धती जपण्यासाठी आवश्यक विषयांचे अध्यापन प्रामुख्याने केले जाई.

  • २. वेद्कालाचा उत्तरार्ध व ब्राह्मण काल-

नाराशंसी गाथा, मंत्रार्थ समजून घेणे ,इतिहास, छन्दशास्त्र हे विषय शिकविले जात.व्याकरणशास्त्र उदयाला आल्यानंतर त्याचाही अभ्यास सुरू झालेला दिसतो.

वेदविद्या,धनुर्वेदआयुर्वेद,कायदा,ज्योतिष,नर्तन,वादन,चित्रकला वास्तुशास्त्र हे विषय शिकविले जात. काळानुसार उद्योग आणि भौतिक कला यांचा विकास झाल्याने शिक्षणातही धर्मशास्त्र,न्याय वेदांत या शात्रांचा समावेशही होऊ लागला. बौद्ध हिंदू व जैन अभ्यासकात शास्त्रचर्चा होत असल्याने या धर्मातील साहित्याचा अभ्यासही विद्यार्थी करीत असत.

या काळात वैदिक मतांचा अर्थ समजावून घेण्याची प्रवृत्ती कमी होत चालली, त्यामुळे तत्कालीन शिक्षणतज्ज्ञ त्याविषयी आग्रही होते.वेदार्थ संशोधनाकडे यांकालात कमी लक्ष दिले गेले. साहित्य, धर्मशास्त्र ,काव्य यांचा अभ्यास करण्याकडे कल वाढला. पाणिनीची सूत्रे,अष्टधातू,गणित,उणादी सूत्रे या काळत मुलांना नवव्या वर्षी साधारणपणे शिकवीत असत असे इत्सिंग याच्या वर्णनातून दिसते.[]

बौद्ध अभ्यासक्रम

संपादन

महायान मताचा जम्बुदीप / भारतात प्रसार झाला व त्यांचे सर्व ग्रंथ संस्कृत भाषेत असत. त्यामुळे बौद्ध विद्यार्थ्यांनाही संस्कृत व्याकरण, कोश व साहित्य शिकविले जात. सविनयआदी ग्रंथातील उतारे त्यांच्याकडून पाठ करून घेतले जात. १६ व्या वर्षी त्यांच्या उच्च शिक्षणास प्रारंभ होई आणि त्यात तर्क व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास करण्यावर भर असे. विहारातील भिक्खूही हेतुविद्याशास्त्र, विभाशा इ. विषयांचा अभ्यास करीत.

विद्यार्थीदशा आणि जीवनक्रम

संपादन

ब्रह्मचाऱ्याने पाळावयाचे काही विशिष्ट नियम असत. आई वडील आणि गुरूंचा आदर करणे, खरे बोलणे,सदाचरण करणे,अलंकार तसेच शरीराचे सुशोभन करणाऱ्या गोष्टी टाळणे अशा गोष्टी ब्रह्मचाऱ्याला विहित होत्या.तथापि द्राह्यायण ऋषींचे मत होते की तापणाऱ्या रस्त्याने चालताना पादत्राणे घालणे इ. गोष्टी चालू शकतील.[]

वार्षिक अधिवेशने आणि सुट्ट्या

संपादन

वर्षारंभ किंवा उपाकर्म संस्कार श्रावणात होई तर वर्षांत किंवा उत्सर्जन संस्कार माघ महिन्यात होई. विद्यालयांना काही नित्य व काही नैमित्तिक सुट्ट्या असत. प्रतिपदा आणि अष्टमी या दिवशी अध्यापन बंद असे. काही नैमित्तिक कारणे जसे श्रोत्रीय किंवा राजाचा मृत्यू,सन्मान्य अतिथींचे आगमन या कारणास्तव सुट्टी मिळे.[]

शिक्षण पद्धती

संपादन

तत्कालीन विद्यार्थी बरेचसे ग्रंथ हे पाठ करीत. लेखनकला अस्तित्वात आल्यानंतरही ही पद्धती सुरू असल्याचे दिसते.व्याकरण,मीमांसा यांचे केवळ पाठांतर होत नसून गुरूकडून ते समजावूनही घेतले जात.प्रत्येक गुरूजवळ १५-२० विद्यार्थीच शिकत असल्याने त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देता येत असे.

परीक्षा पद्धती

संपादन

दिलेला पाठ विद्यार्थ्याला समजला व त्याने तो कंठगत केल्याची गुरूला खात्री झाली म्हणजे मग त्याला पुढील पाठ देण्यात येई.

अन्तेवासी पद्धती

संपादन

कला,उद्योग,व्यापार यांचे शिक्षण अन्तेवासी, ज्याला इंग्रजीत (Apprenticeship)म्हणतात त्या पद्धतीने दिले जात असे.नारद स्मृती ग्रंथात याचा उल्लेख सापडतो.(श्लोक १६ ते २१). हे शिक्षण प्रत्यक्ष कारखाना इ ठिकाणी असे.विद्यार्थी आणि त्याच्या पालकाकडून या पद्धतीत कारखानदार करारही करून घेत असत.वैद्यक,खनीशास्त्र,नौकाशास्त्र, लष्करी शिक्षण यांचा यात समावेश होई.

कला व शास्त्र शिक्षण

संपादन

लष्करी शिक्षण

संपादन

सुतसोम जातक या ग्रंथानुसार मोठ्या गावांमध्ये उच्च लष्करी शिक्षण देणाऱ्या लष्करी शाळाही होत्या.तक्षशीलेस अशी अनेक विद्यालये होती व त्यापैकी एकात भारतातील होते. (पृ.१०१) भाला,तलवार यांचा वापर,बाणाचे अचूक नेम कसे घ्यावेत याचे प्रशिक्षण दिले जाई. बहुतेक गावात आपले संरक्षक असे युवकांचे पथक असे. गावातील असे अध्यापक आपण तयार केलेलं विद्यार्थी राजाकडे सैन्यात भरती करायला आणीत आणि त्याबदल्यात रोख रक्कम,हत्ती,घोडे इ.मिळवीत असत.

वैद्यक

संपादन

वैद्यक शिक्षणापूर्वी विद्यार्थ्यांचे आयुर्वेदीय उपनयन होत असे.यासाठी संस्कृत भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक असे कारण सर्व शिक्षण संस्कृतातूनच होत असे.अंतेवासी पद्धतीनेही काही वैद्य लोक शिष्य स्वीकारत असत.अंतःशरीराच्या ज्ञानासह जखमा कशा धुवाव्यात,बाणाची शरीरात घुसलेली टोके कशी काढावीत येथपर्यंतचे शिक्षण दिले जात असे.चरक व सुश्रुत यांच्या ग्रंथांवरून या शिक्षणाची कल्पना येते.पशुवैद्यक शाखेचा प्रसारही यात झालेला दिसतो.

शिल्पकला

संपादन

प्रथम शिल्पकला बाल्यावस्थेत होती पण नंतर गांधार,ग्रीक या कलांचा संपर्क आल्यानंतर ती विकसित होऊ लागली.भारतीय लोकांनी यात बरेच प्राविण्य मिळविले.पेशावर,मथुरा,भारहूत,अजंठा,अमरावती पाटलीपुत्र या ठिकाणी अशा शिक्षणाची केंद्रे होती.अन्तेवासी पद्धतीने या कलेचे शिक्षण मथुरा येथे दिले जात असे. हे शास्त्र शिकताना मूर्तिशास्त्र,पुराणे,गणित,वास्तुशास्त्र यांचेही शिक्षण आवश्यक मानले जाई.[]

प्राचीन शिक्षणकेंद्रे व शिक्षण संस्था

संपादन

ब्राह्मण

विद्वान ब्राह्मण खाजगी रीतीने अध्यापनाचे कार्य करीत,अध्यापन हे त्यांचे धार्मिक कर्तव्य होते.बौद्ध संघाप्रमाणे ब्राह्मणांच्या शिक्षणाच्या सार्वजनिक संस्था नव्हत्या.काही ठिकाणी विद्वत परिषदा होत पण त्यामधे धार्मिक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवले जात. बनारस,कांची,वाई,नाशिक येथे ब्राह्मणांची मोठी वस्ती असल्याने नवव्या शतकानंतर या भागात शिक्षणकेंद्रे अस्तित्वात आली. राजे लोक विद्वान ब्राह्मणांना अध्यापनासाठीगावे भेट देत असत.त्यांना अग्रहार म्हणले जात असे. अशा ठिकाणीही शिक्षणकेंद्रे उदयाला आली.

बौद्ध

समाजातील मुलांचे शिक्षण पहिल्यापासून आपल्या देखरेखीखाली घेण्याने धर्मप्रसाराचे काम अधिक सुलभ होते हे लक्षात आल्याने बौद्ध विहारातून सर्वांनाच शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले.बौद्धांच्या मठ शिक्षणसंस्था पाचव्या शतकातच अस्तित्वात आलेल्या दिसतात, राजधानी,तीर्थे,मठ,देवालये येथे शिक्षणसंस्था असत,राजे लोक येथील विद्वानांचा परामर्श घेत असत,तक्षशीला कनोज या अशा प्रकारच्या संस्था होत्या.

संदर्भ

संपादन
  1. ^ डाॅॅ. अळतेकर, सदाशिव अनंत. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती. |access-date= requires |url= (सहाय्य)
  2. ^ डाॅॅ. अळतेकर, सदाशिव अनंत. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती. |access-date= requires |url= (सहाय्य)
  3. ^ डाॅॅ. अळतेकर, सदाशिव अनंत. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती. |access-date= requires |url= (सहाय्य)
  4. ^ डाॅॅ. अळतेकर, सदाशिव अनंत. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती. |access-date= requires |url= (सहाय्य)

५. भरत शिंह उपाध्याय . पाली साहित्याचा इतिहास