पाल घराणे

(पालवंश या पानावरून पुनर्निर्देशित)

पाल घराणे हे पूर्व भारतात असलेले एक राजघराणे होते. इ.स. ७५० मध्ये बंगालात पाल घराण्याची सत्ता स्थापन झाली.

पाल साम्राज्य
[[चित्र:|200 px]]

इ.स. ७५० - इ.स. ११६२
राजधानी पाटलीपुत्र
राजे गोपाल
देवपाल
भाषा पाली, संस्कृत
क्षेत्रफळ वर्ग किमी

इतिहास

संपादन

इ.स. ६१९ मध्ये गौड राज्याचा राजा शशांकपाल मरण पावल्यानंतर सुमारे एक शतकापर्यंत बंगालमध्ये अराजक माजले होते. कनौजचा यशोवर्मन आणि काश्मीरचा ललितादित्य यांनी बंगालवर वेळोवेळी स्वारी केली होती. त्यामुळे बंगाल प्रांताचे अनेक छोट्या संस्थानात आणि सरंजामी जहागिरीमध्ये विभाजन झाले होते. या जहागीदारांत सतत चालणारी युद्धे. यामुळे त्यांच्या जुलमी राजवटीत लोकांचे अतिशय हाल झाले. या सगळ्यावर मात करण्यासाठी काही सामंत एकत्र आले आणि त्यांनी आपल्यापैकी एकाची राजेपदी निवड केली. अशा पद्धतीने पहिली निवड गोपाल या सामंताची करण्यात आली आणि सर्वांनी त्याच्या आज्ञा पाळण्याचे आश्वासन दिले. अशा रीतीने पाल घराण्याची स्थापना झाली.

  • गोपाल
  • धर्मपाल
  • देवपाल
  • सूरपाल
  • पहिला विग्रहपाल
  • नारायणपाल

  • दुसरा विग्रहपाल
  • पहिला महिपाल
  • रामपाल
  • कुमारपाल
  • तिसरा गोपाल
  • मदनपाल
  • गोविंदपाल

राजांची कामगिरी

संपादन
पाल कालखंडातील कलेचे नमुने

पाल घराण्याचा पहिला राजा गोपाल याचे घराणे परंपरागत रजपूत जमीनदार होते. तो वाप्यता याचा पुत्र होता. गोपालाने हिमालयाच्या पायथ्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सर्व प्रदेश आपल्या अमलाखाली आणला होता. गोपालाची एकूण कारकीर्द पंचेचाळीस वर्षांची असली तरी तो सुरुवातीला एक संस्थानिक होता सामंतांनी एकत्र येऊन त्याला राजा केल्यावर त्याने इ.स. ७५० ते इ.स. ७७० पर्यंत बंगालचा सार्वभौम राजा या नात्याने राज्य केले. गोपालानंतर त्याचा मुलगा धरमपाल हा उत्तराधिकारी झाला. त्याने इ.स. ७७० ते इ.स. ८१० पर्यंत राज्य केले. कनौजच्या वत्सराजाशी त्याने संघर्ष केला होता. गुर्जर-प्रतिहार आणि राष्ट्रकुटांनी धरमपालाचा पराभव केला होता. पण त्या पराभवाने धरमपालाचे काही नुकसान झाले नव्हते कारण त्याच्या राज्याच्या बाहेरच उभयतांशी त्याने युद्ध केले होते. नंतर त्याने कनौजवर स्वारी करून तेथील इंद्रायुधाला पदच्युत केले आणि चक्रायुध या आपल्या सामंताला कनौजचे राजेपद बहाल केले. धरमपालाने परमेश्वर, परमभट्टक आणि महाराजाधिराज अशी शाही बिरूदे धारण केलेली होती.

बौद्ध ज्ञानाचे एक महत्त्वाचे केंद्र विक्रमशीला विद्यापीठ याची स्थापना धरमपालानेच केली होती. नालंदा विद्यापीठानंतर हे केंद्र दुसऱ्या क्रमांकावर होते. धरमपालानंतर त्याचा पुत्र देवपाल हा पाल साम्राज्याचा उत्तराधिकारी झाला. त्याने इ.स. ८१० ते इ.स. ८५० पर्यंत राज्य केले. त्याने गुर्जर-प्रतिहारांचा पराभव केला होता. उत्कल (ओडिशा) आणि प्रागज्योतिषपूर (आसाम) ही राज्येही काबीज केली होती. बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये त्याने अनेक बौद्ध विहार बांधले. आग्नेय आशियातील शैलेंद्र घराण्याचा राजा बलपुत्रदेव याला नालंदा येथे परकीय बौद्ध भिक्षूंच्यासाठी एक विहार बांधण्याची परवानगी दिली होती आणि या विहाराच्या दैनंदिन खर्चासाठी पाच गावांचे दानही दिले होते.

देवपालाचा मृत्यू इ.स. ८५० मध्ये झाला. त्याच्या मृत्यूनंतर मात्र पाल साम्राज्याचा गौरवशाली काळ समाप्त झाला. कारण त्याच्यानंतर आलेले सूरपाल, पहिला विग्रहपाल आणि नारायणपाल हे दुर्बल पाल राजे सत्तेवर आले. सूरपालाने राजपदावर आल्यावर दोन महिन्यातच राजेपदाचा त्याग केला विग्रहपालही राजेपदी आल्यानंतर तीन-चार वर्षातच सन्यास घेऊन आपला पुत्र नारायणपाल याच्या हाती त्याने सत्ता दिली. नारायणपाल मात्र चोपन्न वर्षे म्हणजे इ.स. ८५४ ते इ.स. ९०८ पर्यंत सत्तेवर राहिला पण त्याने राज्यकारभारावर फारसे लक्ष दिले नाही. त्याच्या या दुबळेपणाचा फायदा घेऊन त्याच्या सामंतांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली. नारायणपालाच्या मृत्यूनंतरही ऐंशी वर्षे पाल घराण्याची अवनतीच होत राहिली मात्र इ.स. ९८८ मध्ये सत्तेवर आलेल्या पहिल्या महिपालाने पाल राज्य काहिसे सावरले. याने इ.स. ९८८ ते इ.स. १०३८ पर्यंत राज्य केले. याच्या काळात चोळ राजा पहिला राजेंद्र चोळ याने स्वारी केली होती. यानंतर रामपाल हा इ.स. १०७७ मध्ये सत्तेवर आला. जवळपासच्या राजांशी संघर्ष करत त्याने इ.स. ११२० पर्यंत राज्य केले. त्याच्यानंतर कुमारपाल (इ.स. ११२० ते इ.स. ११२५), तिसरा गोपाल (इ.स. ११२५ ते इ.स. ११४४), मदनपाल (इ.स. ११४४ ते इ.स. ११६१) आणि शेवटचे एक वर्ष इ.स. ११६२ मध्ये गोविंदपाल हा शेवटचा पाल राजा होऊन गेला.

सेन घराण्यातील विजयसेन या राजाने कालिंदी नदीच्या काठी मदनपालाचा पराभव करून उत्तर बंगालचा प्रदेश काबीज केला होता आणि पाल घराण्याचा शेवटचा राजा गोविंदपाल हा विजयसेनाचा मुलगा वल्लालसेन याच्याबरोबरच्या लढाईत इ.स. ११६२ मध्ये मरण पावला आणि पाल घराण्याचा शेवट होऊन तेथे सेन घराण्याचा अंमल चालू झाला.


संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्यदुवे

संपादन
  • "पाल साम्राज्य" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर, २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)