तेजोमेघ (इंग्लिश|इंग्लिश: Nebula; नेब्युला) हा धूळ, हायड्रोजन, हेलियम व आयनित वायूंपासून बनलेला आंतरतारकीय मेघ असतो. सुरुवातीला हे नाव कोणत्याही मोठ्या अवकाशीय वस्तूस देण्यात येई, उदाहरणार्थ आकाशगंगेच्या पलीकडील दीर्घिका.

"नवनिर्मितीचे स्तंभ" - ईगल तेजोमेघ
एनजीसी ६०४ गॅरेन तेजोमेघ(H नीहारिका
नासाद्वारे क्रॅब तेजोमेघ चलचित्र

(देवयानी दीर्घिका ही एडविन हबल याने दीर्घिकांचा शोध लावण्यापूर्वी अँड्रोमेडा तेजोमेघ म्हणून ओळखली जाई.) तेजोमेघ बऱ्याचदा ताऱ्यांच्या निर्मितीची ठिकाणे बनतात. उदा. ईगल तेजोमेघ. ईगल तेजोमेघाचे छायाचित्र हे नासाच्या सर्वांत लोकप्रिय छायाचित्रांपैकी एक आहे, "पिलर्स ऑफ क्रिएशन". (नवनिर्मितीचे स्तंभ) या भागांमध्ये वायू, धूळ व इतर घटक एकमेकांवर आदळून जास्त वस्तुमान तयार होते, जे आणखी वस्तुमान आकर्षित करते व शेवटी ते ताऱ्यांत रूपांतर होण्याइतके मोठे होते. उरलेल्या वस्तुमानाचे ग्रह व इतर ग्रहीय प्रणालीतील वस्तूंमध्ये रूपांतर होते.

इतिहास

संपादन

असे मानण्यास जागा आहे की दुर्बीणीच्या शोधापूर्वीही माया संस्कृतीच्या लोकांना तेजोमेघांविषयी माहिती होती. मृगनक्षत्राच्या आसपास असलेल्या आकाशाच्या क्षेत्रासंबंधित असलेली एक लोककथा या गोष्टीचे समर्थन करते. कथेत असा उल्लेख आहे की धगधगत्या आगीच्या आसपास एक डाग आहे.[]

ख्रिस्ताब्द १५० च्या दरम्यानच्या काळात क्लॉडियस टॉलेमियस (टॉलेमी) याने त्याच्या अल्मागेस्ट या पुस्तकाच्या सातव्या व आठव्या खंडात पाच तेजोमय दिसणाऱ्या ताऱ्यांची नोंद करून ठेवली आहे. त्याने सप्तर्षीसिंहराशी यांच्यादरम्यान एकही तारा नसलेल्या भागात असलेला तेजोमय प्रदेशही नोंदवला आहे. पहिल्या खऱ्या तेजोमेघाचा उल्लेख हा फारसी खगोलशास्त्रज्ञ अब्द अल्-रेहमान अल्-सुफी याच्या निश्चित ताऱ्यांचे पुस्तक (९६४) या ग्रंथात सापडतो. देवयानी दीर्घिका असलेल्या ठिकाणी त्याने "लहानसा ढग" असल्याचे नोंदवले आहे. त्याने ओम्रिकॉर्न व्हेलोरम हा तारकापुंज "तेजोमय तारका" म्हणून व ब्रॉकीच्या पुंजासारखे इतर तेजोमय खगोल सूचिबद्ध केले. ज्या अतिनवताऱ्यामुळे क्रॅब तेजोमेघाची निर्मिती झाली तो अतिनवतारा एसएन १०५४चे अरबी व चिनी खगोलशास्त्रज्ञांनी १०५४ मध्ये निरीक्षणे केली आहेत.

अज्ञात कारणांमुळे अल्-सुफी मृग तेजोमेघाची निरीक्षणे करण्यात अयशस्वी ठरला. नोव्हेंबर २६, १६१० रोजी निकोलास-क्लाऊडे फॅब्री द पेरिस्क याने दुर्बीण वापरून मृग तेजोमेघाचा शोध लावला. या तेजोमेघाचे निरीक्षण १६१८ मध्ये जोहान बाप्टिस्ट सायसॅट यानेदेखील केले होते. परंतु, या तेजोमेघावर सखोल संशोधन १६५९ मध्ये ख्रिस्तियान ह्युजेन्स याने करेपर्यंत झाले नाही, जो स्वतःस या तेजोमेघाचा शोधक माने.

१७१५ मध्ये एडमंड हॅले याने सहा तेजोमेघांची यादी प्रकाशित केली. या शतकामध्ये हा आकडा संथपणे वाढत राहिला व १७४६ साली जीन-फिलिप द चिसॉ याच्या यादी ही संख्या २० वर पोचली होती (८ नव्या तेजोमेघांसह). १७५१-५३ च्या काळात निकोलास लुई द लाकायल याने केप ऑफ गुड होप येथून ४२ तेजोमेघ सूचिबद्ध केले, ज्यातील बरेचसे त्याकाळी अज्ञात होते. चार्ल्स मेसिए याने नंतर १७८१ मध्ये १०३ तेजोमेघ संकलित केले.

विल्यम हर्षेल व त्यांची बहीण कॅरोलिन हर्षेल यांच्या अथक प्रयत्नांमुळे नंतर तेजोमेघांची संख्या प्रचंड वाढली. त्यांची एक हजार नवीन तेजोमेघ व तारकापुंजांची सूची १७८६ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी आवृत्ती १७८९ मध्ये तर तिसरी व शेवटची ५१० नवे तेजोमेघ असलेली आवृत्ती १८०२ मध्ये प्रकाशित झाली. या कामात बऱ्याचदा विल्यम हर्शलला तेजोमेघ म्हणजे न कळलेले तारकापुंज वाटत असत.

निर्माणप्रक्रिया

संपादन
 
एनजीसी २०२४, ज्वाला तेजोमेघ

अनेक तेजोमेघांची निर्मिती आंतरतारकीय माध्यमात गुरुत्वीय अवपातामुळे होते. त्यातील वस्तू स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाखाली आकुंचन पावत असताना तारे मध्यभागी निर्माण होऊ शकतात, ज्यांचे अतिनील किरण आसपासच्या वायूंना आयनित करून त्यांना प्रकाशतरंगांवर दृष्टिगोचर करतात. अशा प्रकारच्या तेजोमेघांची उदाहरणे म्हणजे रोझेट्टे तेजोमेघपेलिकन तेजोमेघ होय. एच२ प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तेजोमेघांचा आकार मूळ वायंच्या मेघांच्या आकारावर अवलंबून असतो. हे असे प्रदेश आहेत की जिथे ताऱ्यांची निर्मिती होते. या ताऱ्यांना आदितारे म्हणले जाते.

काही तेजोमेघ हे अतिनवताऱ्यांच्या स्फोटांमुळे उद्भवलेले असतात. अतिनवतारे म्हणजे कमी आयुर्मानाच्या, प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा स्फोट. अतिनवताऱ्याच्या स्फोटामुळे त्यातील द्रव्य बाहेरच्या दिशेस फेकले जाऊन ऊर्जेमुळे ते आयोनित होतात व त्याच्यापासून ठोस वस्तूची निर्मिती होऊ शकते. वृषभ राशीतील क्रॅब तेजोमेघ या प्रकाराचे उत्तम उदाहरण आहे. १०५४ साली झालेला हा स्फोट एसएन १०५४ म्हणून नोंदवला गेला आहे. स्फोटानंतर निर्माण झालेली स्थायुरूप वस्तू न्यूट्रॉन तारा असून तो या तेजोमेघाच्या मध्यभागी आहे.




तेजोमेघांचे प्रकार

संपादन

संदर्भ

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ क्रूप, एडवर्ड सी. (१९९९), Igniting the Hearth Archived 2007-09-30 at the Wayback Machine., Sky & Telescope (February): 94