केनेथ जेम्स पीस (इंग्लिश: Kenneth James Peace), ह्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९६३ला पेसले (इंग्लिश: Paisley) ह्या गावी झाला, हे स्कॉटिश संगीतकार, पियानोवादक आणि दृश्यमाध्यम कलाकार (विज्युअल आर्टिस्ट) आहेत.

James Peace at the waterfall

वैयक्तिक माहिती व कारकीर्द संपादन

जेम्स पीस ह्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९६३ला पेसले ह्या गावी झाला.[१][२] त्यांचा बालपणीचा सर्वाधिक काळ पश्चिम स्कॉटलँडच्या (इंग्लिश: Scotland) समुद्रकिनाऱ्यावरील हेलेन्सबर्ग ह्या निसर्गोपचाराचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावी व्यतीत झाला. त्यांच्या कुटुंबात अनेक दृश्यकला माध्यमातील  कलाकारांचा समावेश होता (उदा. जॉन मॅक्नी, इंग्लिश: John McGhie). शिवाय, विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नृत्यसंगीताच्या क्षेत्रात कार्यरत असलेले लोकप्रिय, प्रसिद्ध संगीतकार  फेलिक्स बर्न्स (इंग्लिश: Felix Burns) हेही त्यांच्या नातेवाईकांपैकी होत.[१][३] जेम्स पीस ह्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून पियानोवादनाचे धडे घ्यायला सुरुवात केली, तेव्हाच ते स्वतंत्रपणे पियानो वादनाच्या सांगीतिक रचना करू लागले होते. त्यांचा पहिला सार्वजनिक जाहीर कार्यक्रम वयाच्या चौदाव्या वर्षी झाला. ह्या कार्यक्रमात त्यांनी  स्कॉट जॉप्लिन (इंग्लिश: Scott Joplin) द्वारा निर्मित संगीत सादर केले. दोन वर्षानंतर त्यांना  रॉयल स्कॉटिश अकादमी ऑफ म्युझिक अँड ड्रामा मध्ये (आता: स्कॉटलँड रॉयल संगीतविद्यालय, इंग्लिश: Royal Conservatoire of Scotland) सोळा वर्षांचा, म्हणजे सर्वात कमी वयाचा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळाला.[१][३][४][५] १९८३ मध्ये त्यांनी ग्लासगो विश्वविद्यालय (इंग्लिश: Glasgow University) मधून पियानो: संगीतरचना, वादन व सिद्धांतविषयक शिक्षण पूर्ण करून विशिष्ट प्राविण्यासह B.A.[६][७]ची स्नातक पदवी मिळवली. त्यापुढच्या वर्षी त्यांनी RSAMD ऑर्केस्ट्राच्या समवेत मेंडेलझोन (जर्मन: Mendelssohn)च्या पियानो कॉन्सर्टो, क्रमांक १ची धून सादर केली.[१] हीच धून वाजवून त्यांनी संगीत सादरीकरणविषयक खास पदविका ही पदवी मिळवली आणि ते अनेक परितोषिकांचे विजेते ठरले. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर साथीदार सहकलाकार तसेच एकल पियानोवादक म्हणूनही त्यांना प्रचंड मागणी होती. एडिनबरा (इंग्लिश: Edinburgh) मध्ये १९८८ ते १९९१ पर्यन्त त्यांचा निवास होता.[१][३]

जेम्स पीस १९९१ ते २००९ पर्यन्त बाड नाऊहाईम (जर्मन: Bad Nauheim) जर्मनी (जर्मन: Bundesrepublik Deutschland), मध्ये राहिले.[१][४][५][७][८] ह्या काळात त्यांनी टँगो ह्या नृत्यप्रकाराचा शास्त्रोक्त परिचय करून घेतला, त्यांच्या टँगो-प्रेरित पियानोवरील संगीतरचना त्यांनी  टँगो एस्कॉस (tango escocés स्कॉटिश टँगो)[१][८][९] ह्या शीर्षकाच्या सीडीच्या स्वरूपात तयार केल्या आणि २००२ साली त्यांना विक्टोरिया कॉलेज ऑफ़ म्युझिकचे (इंग्लिश: Victoria College of Music) प्रतिष्ठित सदस्यत्व (इंग्लिश: “Fellow”)  लाभले.[३][८] त्याच वर्षी सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये उत्तर जर्मनीच्या एकल संगीत मैफिलीत त्यांनी सादरीकरण केले व त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अतिपूर्व देशांत त्यांनी कार्यक्रमांची मालिका गाजवली, हाँग काँग (इंग्लिश: Hong Kong) मध्ये त्यांनी त्यांची रचना "टँगो XVII"चे प्रथम सादरीकरण केले.[८][१०][११][१२]

James Peace - Idylls Op.4b

त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी त्यांचे लक्ष युरपवर केंद्रित केले आणि विविध देशांच्या राजधानीच्या शहरांत त्यांच्या संगीतकलेचे सादरीकरण केले: ॲम्स्टरडॅम, अथेन्स[१३], बर्लिन[१४], ब्रसेल्स, हेलसिंकी[१५], लिस्बन[१६], लंडन, माद्रिद[१७], ओस्लो[१८], रेक्जाविक[१९], व्हियेना[२०].

२००८ मध्ये त्यांच्या टँगोमधील व्यासंगाच्या आणि कलात्मक आविष्काराच्या सन्मानार्थ त्यांना लंडन कॉलेज ऑफ म्युझिकचे (इंग्लिश: London College of Music) सदस्यत्व (इंग्लिश: “Fellow”) बहाल करण्यात आले.[१]

काही काळ एडिनबरामध्ये व्यतीत केल्यानंतर फेब्रुवारी २०१० मध्ये ते जर्मनीत परतले व वीसबाडेन (जर्मन: Wiesbaden) मध्ये स्थायिक झाले.[१][२] हयानंतर त्यांच्या सर्जनशीलतेला नवीन आयाम लाभले आणि त्यांनी त्यांच्या काही संगीतमय रचनांवर लघुपट बनविले. “जेम्स पीस इन वीसबाडेन” हा माहितीपट त्यांची ह्या शैलीतील एक निर्मिती आहे.[२१][२२]

पारितोषिके आणि पुरस्कार संपादन

●      प्रथम पुरस्कार, "एग्नेस मिलर" स्पर्धा (इंग्लिश: Agnes Millar Prize for Sight-Reading). ग्लासगो, १९८३[४]

●      प्रथम पुरस्कार, "डनबार्टनशायर ई.आई.एस." स्पर्धा (इंग्लिश: Dunbartonshire E.I.S. Prize for Piano Accompaniment). ग्लासगो, १९८४[४]

●      प्रथम पुरस्कार, सिबेलियस निबंध स्पर्धा (इंग्लिश: Sibelius Essay Prize). ग्लासगो, १९८५[४]

●      प्रारंभकालीन टँगो रचनांच्या सन्मानार्थ पुरस्कार, टी.आई.एम. आंतरर्राष्ट्रीय रचना स्पर्धा (इटालियन भाषा: Torneo Internazionale di Musica). रोम, २०००[१][२][५]

●      टँगो ऑप. २६ ह्या रचनेसाठी सन्मान पदविका, IBLA फाउंडेशन. न्यू यॉर्क, २००२[१][२][५]

●      सन्मानपदक (प्रथम श्रेणी), इंटरनेशनल पियानो डुओ एसोसिएशन. तोक्यो, २००२[१][३][५][८][२३]

●      गोल्ड मेडल, इंटरनेशनल एसोसिएशन ऑफ लुटेस (फ्रेंच: Académie Internationale de Lutèce). पेरिस, २००५[१][३]

संगीतरचना संपादन

• धबधबा (इंग्लिश: The Waterfall)[२४]

Tango Milonga op. 26

• सुखद जीवन (इंग्लिश: Idylls)

• सकाळचे प्रेमगीत (फ्रेंच: Aubade) 

• मूक अश्रू (इंग्लिश: Silent Tears)

Tango XVIII by James Peace (James Peace, piano)

• हरवलेली पाने (इंग्लिश: Forgotten Leaves)

• ओबो आणि पियानो सोनाटा (इंग्लिश: Oboe Sonata)

• गाथागीत (इंग्लिश: Symphonic Ballade)

• समारोह  परेड क्र. १ (इंग्लिश: Ceremonial March no.1) 

• समारोह परेड क्र. २ (इंग्लिश: Ceremonial March no.2)

• हेमंती सोने (इंग्लिश: Autumn Gold)

• शाश्वत गीत (इंग्लिश: Eternal Song)[१]

• जॉर्जिया साठी (जॉर्जियन भाषा: საქართველოსთვის)

  गीतिकाव्यः तामार चिकवैद्जे, ज़ुराब चिकवैद्जे आणि जेम्स पीस

• २४ टँगोज् पियानो सोलो साठी[१][९][११][२२]

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d e f g h i j k l m n o Birgitta Lampert."काटेरी' ध्वनीच्या विना". Wiesbadener Tagblatt (जर्मन वृत्तपत्र), १० फेब्रुवारी २०११
  2. ^ a b c d Julia Anderton. "टँगो आंबट गोड कहाणीसारखा आहे". Wiesbadener Kurier (जर्मन वृत्तपत्र), २४  मार्च २०१२
  3. ^ a b c d e f Sabine Klein. "माझं संगीत माझ्यासारखे आहे. एकदम रोमॅंटिक ". Frankfurter Rundschau (फ्जर्मन वृत्तपत्र), १९९२. प्रकाशन २५४,  पृ०-२
  4. ^ a b c d e G. Müller. " गुणी और संवेदनशील रंगांत न्हालेली रोमॅंटिक दुनिया". Kulturspiegel Wetterau (जर्मन वृत्तपत्र), १७ मे  २००१ , पृ०-५
  5. ^ a b c d e दॉईट्च्चं नात्सीओनालबिब्लिओथेक “जेम्स पीस” Deutsche Nationalbibliothek. “James Peace”
  6. ^ “James Peace”. FRIZZ (जर्मन पत्रिका), पृ०- ५
  7. ^ a b Manfred Merz. "पियानोचा प्राण टँगोच्या तालावर नाचतो". Wetterauer Zeitung (जर्मन अख़बार), १२ नवंबर १९९२, पृ०-१९
  8. ^ a b c d e “James Peace”. The Tango Times (पत्रिका)। प्रकाशन क्र ३९, जानेवारी २००४, पृ०-१ ते ५
  9. ^ a b National Library of Scotland. “Tango escocés”
  10. ^ “James Peace”. La Cadena (डच पत्रिका). सप्टेंबर २००२, पृ०-२६
  11. ^ a b TangoTang (समाचार पत्रिका), हाँगकाँग, ८ सप्टेंबर २००२
  12. ^ “James Peace”. South China Morning Post (वृत्तपत्र), ९ ऑक्टोबर २००२
  13. ^ कॉन्सर्ट प्रोग्राम माहितीपत्रिका  (ग्रीसची कॉन्सर्ट यात्रा), {Για σένα, Αγγελικη}, २७ मे २०१६
  14. ^ Tangodanza (जर्मन पत्रिका) । प्रकाशन, १/२००२ - ९
  15. ^ कॉन्सर्ट  पोस्टर (हेलसिंकी, २०१४)
  16. ^ कॉन्सर्ट पोस्टर (लिस्बन, २०१६)
  17. ^ कॉन्सर्ट पोस्टर (स्पेन मधील संगीत कार्यक्रम) «¡Feliz cincuenta cumpleaños २०१३!»
  18. ^ Listen.no: Konsert - James Peace, Flygel. Munch Museum, ओस्लो, १६ ऑक्टोबर २००४
  19. ^ Ríkarður Ö. Pálsson. “Skozir Slaghörputangoár”. Morgunblaðið (mbl), १४ ऑक्टोबर २००४
  20. ^ कॉन्सर्ट ब्रोशर, विएना, २३ जानेवारी २००५
  21. ^ “K. James Peace in Wiesbaden”. National Library of Scotland
  22. ^ a b “K. James Peace in Wiesbaden”. Deutsche Nationalbibliothek
  23. ^ पारितोषिक विजेत्यांची यादी, आंतरराष्ट्रीय पियानो द्विवादन (तोक्यो) २००२
  24. ^ Staatstheater Wiesbaden (काॅन्सर्ट ब्राशर). १२/१९ सप्टेबर २०२१

बाह्य दुवे संपादन