चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर (जानेवारी १५, इ.स. १९२३; अमरावती, ब्रिटिश भारत - ऑक्टोबर २५, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशकं रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द आहे.

चित्तरंजन कोल्हटकर
जन्म चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर
जानेवारी १५, इ.स. १९२३
अमरावती, ब्रिटिश भारत
मृत्यू ऑक्टोबर २५, इ.स. २००९
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पुरस्कार संगीत नाटक अकादमी आणि राष्ट्रपती पदक, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
वडील चिंतामणराव कोल्हटकर
पत्नी विदुला कोल्हटकर

बालपण

संपादन

कोल्हटकरांचा जन्म जानेवारी १५, इ.स. १९२३ रोजी महाराष्ट्रात अमरावती येथे झाला. त्यांचे वडील चिंतामणराव कोल्हटकर हेसुद्धा नाटकांतून अभिनय करत असत. विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे चुलते.


कारकीर्द

संपादन

'भावबंधन' नाटकातील 'मोरेश्वर' या भूमिकेतून फेब्रुवारी ४, इ.स. १९४४ रोजी कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले. तत्पूर्वी इ.स. १९४७ मध्येच भालजी पेंढारकरांच्या 'गरिबांचे राज्य' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. इ.स. १९५० साली झळकलेल्या 'कुंकवाचा धनी' या चित्रपटात त्यांना नायकाची व्यक्तिरेखा साकारायची संधी सर्वप्रथम लाभली. त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका केली. त्यानंतर पेडगांवचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजुळा, हिरवा चुडा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८०पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. अभिनयाशिवाय कोल्हटकरांनी नाटकांचे दिग्दर्शनही केले. इ.स. १९६४ सालातले 'मोहिनी' हे त्यांनी दिग्दर्शिलेले पहिले नाटक होते. इ.स. १९४९ साली जेव्हा त्यांनी पहिल्यांदा भावबंधन केले, तेव्हा लता मंगेशकरही त्या नाटकात होत्या.

आग्ऱ्याहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. चित्तरंजन कोल्हटकरांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. भावबंधनप्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरिताचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार

संपादन

चित्तरंजन कोल्हटकरांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांना सिनेमांतील आणि नाटकांतील अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्यांत विष्णूदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे.

चित्रपट

संपादन
वर्ष (इ.स.) शीर्षक नाटक / चित्रपट सहभाग
इ.स. १९४४ भावबंधन नाटक अभिनय
एकच प्याला नाटक अभिनय
पद्मिनी नाटक अभिनय
आग्ऱ्याहून सुटका नाटक अभिनय
बेबंदशाही नाटक अभिनय
इथे ओशाळला मृत्यू नाटक अभिनय
श्री नाटक अभिनय
स्वामिनी नाटक अभिनय
दुरिताचे तिमिर जावो नाटक अभिनय
आकाशगंगा नाटक अभिनय
पंडितराज जगन्नाथ नाटक अभिनय
इ.स. १९६४ मोहिनी नाटक दिग्दर्शन
अश्रूंची झाली फुले नाटक अभिनय
गारंबीचा बापू नाटक अभिनय
बावरली हरिणी नाटक अभिनय
विषवृक्षाची छाया नाटक अभिनय
मुद्राराक्षस नाटक अभिनय
इ.स. १९५० कुंकवाचा धनी चित्रपट अभिनय
पेडगांवचे शहाणे चित्रपट अभिनय
मोहित्यांची मंजुळा चित्रपट अभिनय
हिरवा चुडा चित्रपट अभिनय
थांब लक्ष्मी, कुंकू लावते चित्रपट अभिनय
ही माझी लक्ष्मी चित्रपट अभिनय
अंगाई चित्रपट अभिनय
गरिबाघरची लेक चित्रपट अभिनय
जावई माझा भला चित्रपट अभिनय

संघटनात्मक कार्य

संपादन

इ.स. १९८७ साली इंदुरात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोल्हटकरांनी भूषवले. तसेच, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. तर संस्कार भारतीचे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते.

कोल्हटकरांनी रंगात रंगलो मी हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.

मृत्यू

संपादन

मृत्युपूर्वी आठ दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घराखालीच फेरफटका मारत असताना ते पडले. त्यात त्यांच्या खांद्याचे हाड मोडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, त्यांचे ऑक्टोबर २५, इ.स. २००९ रोजी महाराष्ट्रात पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

बाह्य दुवे

संपादन
  • "चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन". 2010-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-11-20 रोजी पाहिले.