चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (: बागलांची राई-तेंडोली-वेंगुर्ले, ८ मार्च १९३०; - मुंबई, २६ एप्रिल १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते.
आरती प्रभू | |
---|---|
जन्म नाव | चिंतामणी त्र्यंबक खानोलकर |
टोपणनाव | आरती प्रभू |
जन्म |
८ मार्च १९३० बागलांची राई, तेंडोली, वेंगुर्ले[१] |
मृत्यू |
२६ एप्रिल, १९७६ (वय ४६) मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखन, काव्य |
साहित्य प्रकार | कविता, कादंबरी, नाटक, पटकथा |
प्रसिद्ध साहित्यकृती | कोंडुरा, जोगवा |
वडील | त्र्यंबक खानोलकर |
आई | सुंदरा खानोलकर (माहेरचे नाव मुक्ता धोंडो बागलकर) |
पत्नी | शैलजा खानोलकर (माहेरचे नाव तारा भास्कर परुळेकर) |
अपत्ये | त्र्यंबक, हेमलता, अविनाश |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार |
जीवन
संपादनचिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई, तेंडोली येथे झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात १९३६साली वेंगुर्ले येथून झाली. इ.स. १९३७ साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचं भुसारी मालाचं दुकान होतं. पण ते वर्षभरात बंद केलं आणि 'शांतीनिवास' नावाची खानावळ सुरू केली. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी पहिली ते इंग्रजी चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले. इ.स. १९४५ पर्यंत खानोलकर कुटुंब सावंतवाडीमध्ये राहत होते. सावंतवाडी सोडण्यापूर्वी दोन-एक वर्ष त्यांची खानावळ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या घरासमोरील एका जागेत होती.[२] पुन्हा खानोलकर कुटुंबीय बागलांची राई, वेंगुर्ले येथे आले. त्यांनतर शिक्षणासाठी खानोलकर मुंबईत ठाकुरद्वार येथे आले व नजीकच्या सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी पाचवीत प्रवेश घेतला. साधारण जुलै इ.स. १९४८मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असताना शिक्षण अर्धवट सोडून ते तडकाफडकी कुडाळला परतले. कोचरे वेंगुर्ले येथील प्राथमिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला व त्यानंतर १९४९ कुडाळ हायस्कूलमध्ये एस.एस.सी.च्या वर्गात दाखल झाले.[३]
४ जानेवारी १९५० रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याचवर्षी एस.एस.सी.च्या वर्गात खानोलकर अनुत्तीर्ण झाले. मे १९५० मध्ये 'बालार्क' या शालेय वार्षिकामध्ये त्यांची 'भवितव्य' ही कविता व 'मोगऱ्याची वेणी' ही कथा प्रसिद्ध झाली.[४] खानोलकरांनी लिहिलेले हे आजवर उपलब्ध असलेले पहिले लिखाण आहे. १ जानेवारी १९५१ कुडाळ येथे ते व त्यांच्या मातोश्री, यांनी 'वीणा गेस्ट हाउस' नावाचे लॉजिंग-बोर्डिंग सुरू केले.[५] तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. मार्च इ.स. १९५१ मध्ये 'सत्यकथा' ह्या नियतकालिकात त्यांची 'जाणीव' ही कथा प्रसिद्ध झाली. १० मे, इ.स. १९५२ रोजी सुकळवाड, मालवण येथील कु. तारा भास्कर परुळेकर यांच्याशी खानोलकर यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी पत्नीचे नाव शैलजा ठेवले. 'वैनतेय' साप्ताहिकामध्ये त्यांची 'कुढत का राहायचे?' ही कविता १७ फेब्रुवारी,इ.स. १९५३ला प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच ते कवी म्हणून प्रकाशात आले. २५ एप्रिल, इ.स. १९५३ला त्यांना मुलगा झाला त्याचे नाव त्र्यंबक ठेवले. त्यांनंतर २६ जानेवारी, इ.स. १९५४ या दिवशी त्यांच्या 'येईन एक दिवस' या नाटकाचा प्रयोग झाला. रंगभूमीवर आलेले हे त्यांचे पहिलेच नाटक. फेब्रुवारी इ.स. १९५४मध्ये 'सत्यकथा' नियतकालिकात त्यांची 'शून्य शृंगारते' ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपणनावाने प्रसिद्ध झालेली ही पहिली कविता होती.[६] १ जानेवारी १९५७ यादिवशी त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील कवीसंमेलनात भाग घेतला हे त्यांचे आकाशवाणीवरील पहिले काव्यवाचन होते.
४ मे, इ.स. १९५८ रोजी मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या पल्लवी या संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. जानेवारी इ.स. १९५९च्या अखेरीस 'वीणा गेस्ट हाऊस' बंद झाले. त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गाठली. जुलै इ.स. १९५९मध्ये त्यांना लोणावळा येथील वसतिगृहावर देखरेख ठेवण्याची नोकरी मिळाली. पण सात-आठ दिवसातच ते मुंबईला परतले. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक झाली. २६ सप्टेंबर, इ.स. १९५९ साली त्यांचा "जोगवा" हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९६१ च्या ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून त्यांना आकाशवाणीच्या नोकरीवरून काढण्यात करण्यात आले.[७] 'मौज'च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना
ये रे घना
न्हाउं घाल
माझ्या मना ...
खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.
नाटके
संपादनकुडाळला असताना चि.त्र्यं.खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झाले. त्यानंतर खानोलकरांनी ’एक शून्य बाजीराव’ लिहिले, ते ‘रंगायन‘ने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या.
कवी, कथाकार आणि पुरोगामी कादंबरीकार खानोलकर यांच्या नाटकांत दुःखाची अनेक रूपे उमटतात. नशीब आणि मनुष्य यांच्यात काय संबंध आहे? पाप आणि पुण्य या संकल्पनांबद्दल त्यांचे काय मत आहे? हे त्याच्या नाटकांनी दाखवले आहे. खानोलकरांची कविता ही त्यांची जीवनरेखा होती. त्यांच्या दुःखाची व्यथा त्यांच्या कवितांमध्ये व्यक्त झाली आहे. त्याला कदाचित तत्त्वज्ञान म्हणून दुःख पहाण्याचे सामर्थ्य दिले गेले होते, केवळ दुःखाकडे तटस्थतेपासून दुःख स्वीकारण्याच्या अपरिहार्यतेमुळे. कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या खानोलकर यांनी बऱ्याच काळानंतर नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. १९६६ मध्ये त्यांचे प्रसिद्ध नाटक 'एक शून्य बाजीराव' रंगमंचावर आले, आणि ते पुस्तक स्वरूपातही दिसले. अनेक रंग आणि शैली स्वीकारणारा बाजीराव स्वतःला बऱ्याच रूपांत प्रकट करतो.. कधी तो विदूषकाच्या शैलीत उभा राहतो, तर कधी भागवतकार, कथाकार किंवा कीर्तनकारांच्या शैलीत दिसतो. कधीकधी तो सर्कस विदूषक कलाबाजी करतो, आपल्या अंगांच्या अभिव्यक्तीसह त्याचा हेतू समृद्ध करतो आणि कधीकधी एकल नाटक सुरू करतो. कधी त्याच्या भाषेत संस्कृत भाषेचे काव्यत्व असते तर कधी थोर लेखकांचा गूढ गोडवा, तर कधी लोकनाट्याचे विडंबन, कधी विवेकी विद्वानांची प्रतिष्ठा. या सर्व शोधांमध्ये बाजीरावांचे चारित्र्य त्याचे दुःख, व्यथा, व्याधी व्यक्त करणारे रूप धारण करते. या कारणास्तव, केवळ मराठी नाट्यच नाही तर आधुनिक भारतीय रंगभूमीवर देखील एक शून्य बाजीराव हे एक 'महत्त्वाचे नाटक ' आहे.
प्रकाशित साहित्य
संपादन- अजगर (कादंबरी, १९६५)
- अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
- अभोगी (नाटक)
- अवध्य (नाटक, १९७२)
- आपुले मरण
- एक लघुकांदबरी आणि काही कविता
- एक शून्य बाजीराव (नाटक, १९६६)
- कालाय तस्मै नमः (नाटक, १९७२)
- कोंडुरा (कादंबरी, १९६६)
- गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
- चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
- जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
- त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
- दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
- नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
- पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
- पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
- रखेली (नाटक)
- राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
- रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
- श्रीमंत पतीची राणी (नाटक)
- सगेसोयरे (नाटक, १९६७)
- सनई (कथा संग्रह, १९६४)
- हयवदन (नाटक)
अप्रकाशित नाटके
संपादन- अंधा युग(अनुवाद)
- असाही एक अश्वत्थामा
- आई
- आषाढातला एक दिवस
- इस्तू जागा ठेव
- एकनाथ मुंगी
- एका नाटकाचा अंत
- एका भुताचे भागधेय
- एका राघूची गोष्ट
- गुरू महाराज गुरू
- चव्हाटा
- थंडीच्या एका रात्री
- दायित्व (अनुवाद)
- देवाची आई(केळीचे सुकले बाग)
- देवाचे पाय
- पुनश्च एक बॉबी
- प्रतिमा
- प्रेषित
- भूत कोण माणूस कोण?
- .माकडाला चढली भांग
- येईन एक दिवस
- रात सवतीची
- ललित नभी चार मेघ
- विखाराणी
- शाल्मली
- श्रीरंग प्रेमरंग
- होती एक शारदा.
गाजलेली भावगीते
संपादन- कसे? कसे हासायाचे
- गेले द्यायचे राहून
- ती येते आणिक जाते
- दुःखना आनंदही, अंतना आरंभही
- नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
- ये रे घना ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना
- विश्रब्ध मनाच्या कातरवेळी, एखाद्या प्राणाची दिवेलागण
- समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
- ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन् शुद्ध व्हा.
गाजलेली चित्रपटगीते
संपादन- कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (चित्रपट : सामना)
- तुम्ही रे दोन, दोनच माणसं (चित्रपट : चानी)
- तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी (चित्रपट : निवडुंग)
- तो एक राजपुत्र, मी एक रानफूल (चित्रपट : चानी)
- बंद ओठांनी निघाला, पेटलेला एकला (चित्रपट : सर्वसाक्षी)
- मीच मला पाहते, पाहते आजच का (चित्रपट : यशोदा)
- लवलव करी पात, डोळं नाही थाऱ्याला (चित्रपट : निवडुंग).
खानोलकर यांच्या जीवनावरील आणि साहित्यावरील पुस्तके
संपादन- आरती प्रभूंची कविता (लेखिका - डॉ. माधवी वैद्य)
- कादंबरीकार खानोलकर (समीक्षा, प्रभाकर आत्माराम पाध्ये)
- खानोलकरांची कादंबरी (लेखिका - डॉ. माधवी वैद्य)
- खानोलकरांचे नाटक (लेखिका - डॉ. माधवी वैद्य)
- चि.त्र्यं. खानोलकरांचे ललित चरित्र (लेखक- दीपक घारे)
- चि.त्र्यं. खानोलकरांच्या शोधात (लेखक- जया दडकर)
- काव्यप्रदेशातील स्त्री ह्या समीक्षा ग्रंथात आरती प्रभू ह्यांच्या काव्यातील स्त्री हा महत्वाचा लेख अंतर्भूत (लेखक किरण शिवहर डोंगरदिवे)
पुरस्कार
संपादन१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार – 'नक्षत्रांचे देणे'साठी.
खानोलकर आणि आरती प्रभू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे पुरस्कार
संपादन- आरती प्रभू अकादमीचा आरती प्रभू पुरस्कार : प्रेमानंद गज्वी यांना (१५ फेब्रुवारी २०२०)
- आरती प्रभू अकादमीचा आरती प्रभू पुरस्कार : कवी सौमित्र यांना (२४ जानेवारी २०१९)
- आरती प्रभू अकादमीचा आरती प्रभू पुरस्कार : महेश केळुस्कर यांना (२७ जानेवारी २०१८)
- आरती प्रभू अकादमीचा ५वा आरती प्रभू पुरस्कार : सई परांजपे यांना. (२१ जानेवारी २०१७)
- आरती प्रभू अकादमीचा ४था आरती प्रभू पुरस्कार : महेश एलकुंचवार यांना (जानेवारी २०१६मध्ये)
- आरती प्रभू अकादमीचा ३रा आरती प्रभू पुरस्कार : शफाअत खान यांना (मे २०१५मध्ये)
- आरती प्रभू अकादमीचा २रा आरती प्रभू पुरस्कार : सतीश आळेकर यांना (२६ एप्रिल २०१४)
- आरती प्रभू अकादमीचा १ला आरती प्रभू पुरस्कार : विष्णू सूर्या वाघ यांना. (२८ एप्रिल २०१३)
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- दडकर, जया. चि.त्र्यं. खानोलकरांच्या शोधात.
बाहय दुवे
संपादन- चि.त्र्यं खानोलकरांची ‘आठवणीतील गाणी‘वरील गीते
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावरील चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांची माहिती Archived 2011-08-28 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र टाइम्स - कवितेच्या गावातला वेडापीर - आरती प्रभू Archived 2008-07-04 at the Wayback Machine.
- दिवेलागण, कविवर्य आरती प्रभू, कवितेचे रसग्रहण[१]