गंगटोक

सिक्कीम राज्यांची राजधानी
(गंंगतोक या पानावरून पुनर्निर्देशित)

गंगटोक ही भारत देशाच्या सिक्कीम राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गंगटोक जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. गंगटोक शहर हिमालय पर्वतरांगेच्या पूर्व भागात समुद्रसपाटीपासून ५,४१० फूट इतक्या उंचीवर वसले आहे. इ.स. १८४० मध्ये येथे एक मोठा बौद्ध धर्मीय मठ बांधला गेला ज्यामुळे गंगटोकचे महत्त्व वाढू लागले. इ.स. १८९० मध्ये सिक्कीम राजतंत्राची राजधानी गंगटोकला हलवली गेली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ल्हासा ते कलकत्ता खुष्कीच्या मार्गावरील एक विसाव्याचे ठिकाण म्हणून गंगटोक नावारूपाला आले. १९७५ मधील सिक्कीमच्या भारतामध्ये विलीनीकरणानंतर गंगटोक ही नव्या सिक्कीम राज्याची राजधानी राहिली. २०११ साली गंगटोकची लोकसंख्या सुमारे १ लाख होती.

गंगटोक
सिक्कीम राज्याची राजधानी
गंगटोक is located in सिक्कीम
गंगटोक
गंगटोक
गंगटोकचे सिक्कीममधील स्थान

गुणक: 27°19′48″N 88°37′12″E / 27.33000°N 88.62000°E / 27.33000; 88.62000

देश भारत ध्वज भारत
राज्य सिक्कीम
जिल्हा गंगटोक जिल्हा
क्षेत्रफळ १९.२ चौ. किमी (७.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,४१० फूट (१,६५० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,००,२९०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


गंगटोक शहर हिमालय पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसले असून येथून कांचनगंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर दृष्टीस पडते. नाथू ला ही सिक्कीमला तिबेटसोबत जोडणारी खिंड गंगटोकपासून ४० किमी अंतरावर आहे. गंगटोकचे हवामान सौम्य व शीतल स्वरूपाचे असून येथे फारसा हिमवर्षाव होत नाही.

गंगटोकची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारित आहे. येथील डोंगराळ भूभागामुळे सिक्कीममध्ये जलद गतीने औद्योगिक विकास होऊ शकत नाही. पर्यटनासोबत शेती हा देखील येथील प्रमुख व्यवसाय आहे.

राष्ट्रीय महामार्ग १० हा गंगटोकला पश्चिम बंगाल राज्यासोबत जोडणारा प्रमुख रस्ता आहे. पाकयाँग विमानतळ हा सिक्कीमधील एकमेव विमानतळ गंगटोकपासून ३५ किमी दक्षिणेस स्थित आहे. सिक्कीममध्ये आजच्या घडीला रेल्वे अस्तित्वात नसून न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक हे येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे शहर आता नामशेष असलेल्या सिक्कीम संस्थानाची राजधानी होते.

बाह्य दुवे

संपादन
  • गंगटोक महापालिका
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी

संपादन