खाशाबा जाधव (जन्म : गोळेश्वर-कऱ्हाड, १५ जानेवारी १९२६; - १४ ऑगस्ट १९८४) हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.

खाशाबा जाधव
M.S. Gill unveiling the plaque to Re-christen the Wrestling Stadium as K.D. Jadhav Stadium in the memory of Late Khashaba Dadasaheb Jadhav.jpg
एम.एस. कुस्ती स्टेडियमला खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या स्मरणार्थ के.डी. जाधव स्टेडियम असे नाव देण्याच्या फलकाचे अनावरण करताना एम एस गील
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव खाशाबा दादासाहेब जाधव
टोपणनाव केडी (KD), पॉकेट डायनामो
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान रेठरे, कराड तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
जन्मदिनांक जानेवारी १५, इ.स. १९२६
जन्मस्थान गोळेश्वर, सातारा
मृत्युदिनांक ऑगस्ट १४, इ.स. १९८४
मृत्युस्थान कराड, सातारा
उंची ५'६"
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर इ.स. १९५२ हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा': ५२ किलो. फ्रीस्टाइल कुस्ती; कांस्य
खाशाबा जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.

खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. कुस्तीच्या खेळात त्यांची ख्याती होती. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते.[१] सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्व्हर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते.[२] हा एकमेव ऑलिंपिक पदक विजेता होता की त्याला भारत सरकारने पद्म अवॉर्ड दिला नाही. तो स्वतःच्या हिमतीवर तयार झाला. याची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला १९४८ चे ऑलिंपिक पूर्वीचे मार्गदर्शन केले.

बालपणसंपादन करा

खाशाबा हा ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचा हा सर्वात लहान म्हणजे ५ क्रमांकाचा मुलगा होता. याने ८ वर्षाचा असताना त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला २ मिनिटांत लोळवले होते. त्याने सन १९४०-१९४७ दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण करून उर्वरित जीवन कुस्तीकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले.लहानपणीपासून त्यांना कुस्तीचे वेड होते.

कुस्तीसंपादन करा

त्याचे वडील कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्याला त्याचे वयाचे ५ व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. महाविद्यालयात त्याला बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते. शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्याची कुस्ती त्याला कधीही आडवी आली नाही. खाशाबाने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. त्याने ऑलिंपिक वेळी स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडकविण्याचाही निश्चय केला होता.

सन १९४८ मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर हाते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा ६ वा क्रमांक पुढे घेऊन जाणारा ठरला नाही. पुढील सन १९५२ सालच्या हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी जरी ते बाॅटमवेट गटात (५७ किलो) गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली.

ऑलिंपिक कार्यकारी मंडळातील सुंदोपसुंदीमुळे पुढील १९५२ च्या ऑलिंपिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही असे त्याना सांगण्यात आले. त्यांचे म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिला आणि त्यामुळे ऑलिंपिकसाठी निवड झाली नाही. या वेळी ते शांत बसले नाहीत तर याचा खुलासा घेणेसाठी त्यांनी पतियाळाचे महाराजे यांचेकडे न्याय मिळण्यासाठी विनंती केली. पतियाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला आणि त्याच्या विरोधी कुस्तीगीराशी त्यांनी पुन्हा त्याची ट्रायल घेतली. या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगीराला चितपट केले आणि त्यांची ऑलिंपिकसाठी निवड झाली. हेलसिंकीला जायचे म्हणजे पैसे हवेत ! कुटुंबाची पळापळ सुरू झाली. गावात लोकवर्गणी जमा झाली. खाशाबा कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालयात शिकत होता. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिष्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिंपिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेवून त्याला रु.७०००/- दिले. त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचेकडे निधीसाठी गळ घातली पण त्यांनी फक्त रु.४०००/- दिले.

गादीवरील कुस्तीत पाय घसरतात. खेळताना दोन चुका झाल्या, त्यामुळे गोल्ड मेडल हुकले ते जपानच्या ईशी शोबची याने जिंकले. त्या गटात विविध देशांचे २४ स्पर्धक होते. त्यांनी सेमी फायनलपर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी खाशाबांना ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले, पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंपिक पदक ठरले.

कराड तालुक्यातील गोळेश्वरर हे लहानसे गाव. कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबाचे स्वागतासाठी त्या परिसरातील सजविलेल्या १५१ बैलगाड्या, हजारो लोक, ढोल तासे, लेझीम पताका, फटाके, घेऊन हजर होते. गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण व्यापला होता. हे अंतर पायी चालावयाचे झाले तरी १५ मिनिटांचे आहे पण हेच अंतर पार करण्यासाठी विनातक्रार सात तास लागले. हा प्रकार मी पूर्वीही आणि त्यानंतरही कधी पाहिला नाही असे खाशाबांचे बंधू संपतराव जाधव म्हणाले. एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेले हे गोळेश्वर गाव भारताचे नकाशावर ठळकपणे दिसू लागले. भारत देशाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या या गोळेश्वर गावाची जगभर प्रसिद्धी झाली.

भारताचे हॉकी टीमनेही गोल्ड मेडल पटकावले होते पण खाशाबाचे विशेष कौतुक झाले. कोल्हापूर मधील सर्व तालीम आखाड्यानी तसेच महाविद्यालयांनी भरभरून कौतुक केले. खाशाबाने कोल्हापूरमध्ये स्वतः कुस्ती फडाचे आयोजन केले. त्यात स्वतःही भाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या. त्यात जी कमाई झाली ती त्याचेवर स्वतःचे घर गहाण ठेवून मदत करणारे आणि वरदहस्त ठेवणारे महाविद्यालयाचे प्राचार्य यांना न विसरता त्या मिळकतीतून त्यांचे घर त्यांना परत मिळण्यासाठी पैसे दिले.

सन १९५५मध्ये खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात ते सब-इन्स्पेक्टर या हुद्दयावर भरती झाले. तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्‌स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून निवृत्त झाले. पेन्शनसाठी त्यांना खूप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्‌स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे उरलेले जीवन गरिबीत गेले. खाशाबा जाधव यांचा सन १९८४ मध्ये एका रोड अपघातात दुर्दैवी अंत झाला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धासंपादन करा

  • सन १९४८ ऑलिंपिक
  • सन १९५२ ऑलिंपिक

निधनानंतरसंपादन करा

देशाने केलेला आदरसंपादन करा

सन २०१० मध्ये आदरयुक्त भावनेने दिल्ली येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील कुस्ती विभागाला त्यांचे नाव दिले.[३] सन २००१ मध्ये त्यांना अतिशय प्रसिद्ध असा अर्जुन ॲवाॅर्ड दिला.

साहित्यसंपादन करा

नॅशनल बुक ट्रस्टचे संजय सुधाणे यांनी त्यांचेवर 'ऑलिंपिक वीर के.डी.जाधव' हे पुस्तक लिहिले.

चित्रपटसंपादन करा

आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आणि आत्ताचे चित्रपट दिग्दर्शक संग्राम सिंग हे खाशाबा जाधव यांच्या रंजीत जाधव या मुलाच्या स्मरणातील गोष्टीतून चित्रपट बनविण्याच्या तयारीत आहेत.[४]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी १९५२ ऑलिंपिकमधील कांस्य पदक जिंकले" (PDF).
  2. ^ "खाशाबा जाधव, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो".
  3. ^ "इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील कुस्ती विभाग स्थळाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात आले".
  4. ^ "संग्राम सिंग हे खाशाबा जाधव यांच्यावर चित्रपट बनविण्याच्या तयारीत आहेत".

बाह्य दुवेसंपादन करा