कान्हा व्याघ्र प्रकल्प

(कान्हा राष्ट्रीय उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)

कान्हा राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्रप्रकल्प राबविला गेलेले भारतातील मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. भारतात व्याघ्रप्रकल्प सर्वाधिक यशस्वी येथे ठरला, अशी या उद्यानाची ख्याती आहे. सुप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते लेखक रुडयार्ड किपलिंग [] यांची प्रसिद्ध जंगल बुक ही साहित्यकृती याच उद्यानावरू सुचली. हे जंगल १८७९ साली संरक्षित उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना १ जून १९५५ रोजी झाली []. त्याअगोदर हे राष्ट्रीय उद्यान हलून आणि बंजर या दोन अभयारण्यांमध्ये विभाजित होते. आजचे राष्ट्रीय उद्यान हे मंडलाबालाघाट या मध्यप्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. उद्यानाचे गाभा क्षेत्र व परिसर क्षेत्र मिळून एकूण १००९ चौ.किमी इतके क्षेत्र आहे. या उद्यानाचे सर्वात मोठे आकर्षण वाघ आहे. येथे वाघ दाखवण्याच्या अनेक सफरी आयोजित केल्या जातात व वाघांची संख्या जास्त असल्याने बहुतांशी हमखास वाघ दिसतो. वाघाबरोबरच येथील इतर वन्यप्राण्यांची लक्षणीय संख्या हे येथील वैशिष्ट्य आहे. इतर वन्यप्राण्यांमध्ये अस्वल , बाराशिंगा हरीण, भारतीय रानकुत्री ढोल अथवा [[कोळसून |भारतीय रानकुत्री]], बिबट्या, चितळ, सांबर इत्यादी आहे. चितळांचेही सर्वाधिक प्रमाण येथे आढळून येते.

कान्हामधील वाघिण आपल्या बछड्यांसोबत

जंगलप्रकार

संपादन

कान्हा मधील जंगल हे मुख्यत्वे मध्यभारतातील पानगळी प्रकारचे आहे. येथे साल वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. कान्हा उद्यान हे व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्यानंतर उद्यानातील गावे हलवण्यात आली व उद्यान पूर्णपणे मानवरहित करण्यात आले. ज्याभागात मानवी वस्ती व शेती होती, त्याभागात जंगलाऐवजी मोठ्या मोठ्या कुरणांची निर्मिती झाली. या कुरणांमध्ये गवताचे खाद्य येथील हरीण व तत्सम प्राण्यांना मिळाले व हरिणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत झाली. मनुष्यवस्ती हटवणे हा उपाय कान्हा राष्ट्रीय उद्यानासाठी फायदेशीर ठरला.

येथील कुरणांत जी काही प्रकारची वनस्पती उगवते, ती बाराशिंगा या हरणासाठी खूप उपयुक्त आहे.

प्राणी

संपादन
 
कान्हामधील बाराशिंगा हरणे

कान्हामध्ये २००६च्या नोंदीनुसार १३१ वाघ होते. तसेच येथील बिबट्यांची संख्याही चांगली आहे. अस्वले व रानकुत्री येथे नेहेमी दिसून येतात. कान्हामध्ये भारतात दुर्मिळ असलेला लांडगादेखील आढळून येतो. कान्हाच्या व्याघ्रप्रकल्पाच्या यशाचे मुख्य रहस्य येथील वाघाच्या भक्ष्याच्या संख्येत आहे. चितळे येथे मेंढरांसारखी दिसून येतात, त्यांची संख्या वीस हजारापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल हरणांमध्ये सांबरांची संख्या आढळून येते. वाघाच्या इतर भक्ष्यामध्ये रानडुकरेगवे ५००० पेक्षाही जास्त आहेत. एकेकाळी नामशेष होण्यात आलेला बाराशिंगा हरीण आता १००० पेक्षाही जास्त संख्येने आढळून येतो. जगामध्ये केवळ कान्हामध्ये बाराशिंगाची ही उपजात दिसून येते. उद्यानात वानरांची संख्याही भरपूर आहे. वानरांचे मुख्य शत्रू भारतीय रानकुत्री ज्यांना मराठीत ढोल अथवा कोळसून असे म्हणतात ते येथे आढळून येतात. रानकुत्र्यांची सर्वाधिक संख्या याच उद्यानात आहे. भारतात इतर ठिकाणी याची गणना अतिशय दुर्मिळ म्हणून होते.

भारतातील इतर वन्यप्राण्यांचे कान्हा हे घर आहे. इतर वन्यप्राण्यांमध्ये कोल्हे, खोकड, माकडे ,पाणमांजरी, उदमांजर, मुंगुस, तरस, रानमांजर, रानससे, खवलेमांजर,साळिंदर, नीलगाय,काळवीट असे अनेक प्रकारचे वन्यप्राणी येथे आढळून येतात.

कान्हा जंगलाला वर नमूद केलेल्या गोष्टींमुळेच १ जून १९५५ रोजी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. तेव्हा केवळ २५२ चौ.किमी. क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. भारतातील सर्वाधिक यशस्वी व्याघ्रप्रकल्प म्हणून या उद्यानाची ख्याती आहे. सुप्रसिद्ध "नोबेल पारितोषिक" विजेते लेखक रुडयार्डड किपलिंग यांची प्रसिद्ध 'जंगल बुक' ही साहित्य कृती याच उद्यानावरून सुचली. याचे क्षेत्रफळ वाढवत-वाढवत आज हे जंगल सुमारे २००० चौ.किमी. क्षेत्रावर वसलेले आहे. कान्हातील या पानझडी प्रकारच्या जंगलात साल वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. कान्हा जंगल वाघांसाठी प्रसिद्ध असले तरी येथे इतर वन्य प्राण्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. यात अस्वले, चितळ, सांबरे, भेकर, बाराशिंगा ही हरिणांची दुर्मिळ जात, रानकुत्रे (कोळसून), गवे (इंडिअन गौर), बिबट्या, रान डुक्कर, कोल्हे, रान मांजर, मुंगूस, जंगलातील संदेश वाहक - लंगूर (माकडे), क्वचितच आढळणारे तांबड्या पाठीचे माकड (२०११ च्या मे महिन्यात दिसले होते) हे प्राणी तसेच घुबड, कापशी, तुरेवाला सर्प गरुड यांसारखे शिकारी पक्षी तर स्वर्गीय नर्तक, नीलपंखी, मोर सारखे अतिशय देखणे पक्षीही आढळतात. येथे आपल्याला गिधाडे ही सहज पहावयास मिळतात.

वाघ या प्रमुख आकर्षाणाखातर येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात. तरीही तेथील कौतुकास्पद गोष्ट अशी की, उद्यानात असलेली चोख शिस्त आणि तेथील सुयोग्य व्यवस्थापन ! कुठल्याही प्रकारच्या बेशिस्तीला येथे स्थान नाही व तेथील एकंदर वातावरणात तशी बेशिस्त करावीशी कुणाला वाटणारही नाही. आपल्या खाण्या-पिण्याची व राहण्याची सोय व्हावी यासाठी तेथील हॉटेल्स नेहमीच सज्ज असतात. पर्यटकांना जंगलात फिरण्यासाठी जिप्सी गाड्यांची सोय आहे. पहाटे लवकरात लवकर आपल्या गाडीचा नंबर गेटवर लावायचा असतो. कारण गाडी जेवढी लवकर जंगलात जाईल तेवढा वन्यजीव पाहण्याचा योग जास्त व आपली पुढील गाड्यांमुळे उडालेली धूळ आपल्यावर उडण्याचा त्रास कमी. हिवाळ्याच्या दिवसांत धूळ उडण्याचा त्रास नसतो. येथील जिप्सी गाड्या उघड्या असतात. जंगल जास्त चांगल्या प्रकारे पाहता याव म्हणून ही सोय केलेली असते. प्रत्येक गाडीत एक मार्गदर्शक (गाईड) घ्यावाच लागतो. येथील मार्गदर्शक व वाहन चालक अतिशय अनुभवी व तज्ज्ञ आहेत. ते कान्हा परिसरातीलच बैगा आदिवासी आहेत.

येथील नियमांनुसार पर्यटकांना कार्यालयात प्रत्येक सफारीच्या आधी स्वतःची माहिती द्यावी लागते. माहिती दिल्यावर आपल्या गाडीला जंगलात फिरायचे ठिकाण निश्चित करून दिले जाते, जेणेकरून एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची गर्दी होऊन वन्यजीवन विस्कळीत होणार नाही. कान्हातील आणखी एक आकर्षण म्हणजे 'हत्ती सफारी'. म्हणजे माहुतासोबत हत्तीच्या पाठीवर बसून वाघ पाहणे... निसर्गाचे नियम तसेच प्राणी व पर्यटकांची सुरक्षा पूर्णपणे विचारात घेऊन ही सफारी चालवली जाते. यासाठी पर्यटकांकडून विशिष्ट मूल्य आकारले जाते. इतके लोक, हत्ती त्या वाघाजवळ जातात तरी तो वाघ काहीच कसे करत नाही? असा प्रश्न सुज्ञ वाचकांना पडण साहजिक आहे. परंतु, शिकार करून पोट भरलेला वाघ विश्रांती घेण्याच्या मूडमध्ये असतो आणि हा 'टायगर शो' त्या वाघाची विश्रांती जरासुद्धा बिघडवत नाही. हत्तीच्या पाठीवर हौद्यात बसून अशा प्रकारचा वाघ पाहणे हे एक वेगळाच थ्रिल असते.

  • प्रकार - राष्ट्रीय उद्यान
  • क्षेत्रफळ - २००० चौ.किमी[]
  • जंगल प्रकार - मध्य भारतीय पानगळी प्रकार
  • भेट देण्याच सर्वोत्तम काळ - फेब्रुवारी ते जून
  • उद्यानची वेळ - सकाळी सूर्योदयापासून ते ११ वाजेपर्यंत संध्याकाळी ४.३० ते सूर्यास्तापर्यंत
  • विशेष - उद्यानात पायी फिरायला सक्त मनाई आहे. तसेच उद्यानात खाजगी गाड्या घेऊन जाण्यालाही मनाई आहे.

पुस्तके

संपादन
  • कान्हा - बारा शिंग्याचे जंगल (अतुल धामणकर)

संदर्भ

संपादन
  1. ^ "The Nobel Prize in Literature 1907". NobelPrize.org (इंग्रजी भाषेत). 2019-12-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Kanha National Park Madhya Pradesh, India | Kanha Tiger Reserve". kanha national park (इंग्रजी भाषेत). 2019-12-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Kanha National Park | Kanha: Tiger Reserve of MP| Madhya Pradesh(MP) TourisKanha National Park | Kanha: Tiger Reserve Area in MP| Madhya Pradesh(MP) Tourism". www.mptourism.com (इंग्रजी भाषेत). 2019-12-06 रोजी पाहिले.