ओगदेई खान

(ओगदेई या पानावरून पुनर्निर्देशित)

ओगदेई खान हा चंगीझ खानचा तिसरा मुलगा (इ.स. ११८५ ते इ.स. १२४१) व त्याच्या राज्याचा उत्तराधिकारी होता. चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर इ.स. १२२९ मध्ये याने मध्यमंगोलियावर आपले राज्य चालवण्यास सुरुवात केली. वडिलांप्रमाणेच त्याने अनेक स्वाऱ्या व लुटालुट केली. मंगोलियातील काराकोरम या शहराला त्याने आपल्या राजधानीचे शहर म्हणून निश्चित केले.

ओगदेई खान
खान (मंगोल शासक)
ओगदेई खानाचे व्यक्तिचित्र
अधिकारकाळ १२२९ - १२४१
जन्म ११८५
मृत्यू १२४१
पूर्वाधिकारी चंगीझ खान
वडील चंगीझ खान
पत्नी तोरेगीन खातून
संतती गुयुक खान
राजघराणे बोर्जिगीन


बालपण

संपादन

ओगदेई हा चंगीझ खानाच्या चार मुलांपैकी तिसरा मुलगा. लहानपणापासूनच आपल्या शांत, नम्र व समजूतदार स्वभावामुळे तो चंगीझ खानाचा लाडका होता. आपण वडिलांसारखे हुशार नसल्याचे त्याने जोखले होते तरीही आपल्या समजूतदार व चतुर स्वभावामुळे तो इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरत असे. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे लहानपणापासूनच त्याला घोडेस्वारी व युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले होते. चंगीझच्या स्वाऱ्यांमध्ये त्याला सहभागी केले जात असे. युद्धनीतीत तो तरबेज होता. याचबरोबर आपल्या सैन्याधिकारी, सेनापती यांच्या सल्ले, तक्रारींकडे तो उत्तमरीत्या लक्ष पुरवत असल्याने तो लोकप्रियही होता.

राज्यविस्तार

संपादन

चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर इ.स. १२२९मध्ये भरवण्यात आलेल्या सभेत एकमताने चंगीझच्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून ओगदेई खानाची निवड करण्यात आली. स्वतः चंगीझखानाचीही अशीच इच्छा असल्याचे सांगितले जाते. ओगदेईने अनेक स्वाऱ्या करून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला.

चंगीझ खानाप्रमाणे "गेर"मध्ये न राहता जगात इतरत्र लोक जसे नगरे बांधून राहतात तसेच मंगोलांनी राहावे अशी ओगदेईची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक कारागीर, स्थापत्यशास्त्रज्ञ व अभियंत्याना काराकोरमला नेले व तेथे पक्की बांधकामे करून नगर वसवले. या बांधकामावर युरोपीय व मुसलमानी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. नगरात त्याने चर्च व मशिदी बांधल्या. आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची पूर्ण मुभाही दिली. चंगीझ खानाने मिळवलेली बरीचशी लूट त्याने या नगरावर व इतर बांधकामांवर तसेच व्यापारावर खर्च केल्याने अधिक लूट मिळवण्यासाठी त्याला पुन्हा स्वाऱ्या करणे भाग होते.

चीनमधील सुंग राज्यकर्त्यांच्या साहाय्याने त्याने चीनमधीलच जुर्चेन या प्रबळ राज्यवटीवर जोरदार हल्ले करून त्यांची राजधानी ताब्यात घेतली. इ.स. १२३४मध्ये त्याने जुर्चेन राज्याचा निःपात केला. त्यानंतर त्याच्या अधिपत्याखाली चीनविरुद्ध सुरू करण्यात आलेले युद्ध त्याच्यानंतरही सुमारे ४५ वर्षे चालले व संपूर्ण चीन मंगोल फौजांच्या ताब्यात आला. त्याच्या फौजांनी कोरियाला आपले मांडलिक बनवले, मध्य आशिया व युरोपमध्ये रशिया, हंगेरी, पोलंडवर स्वाऱ्याही केल्या. त्यापुढे जाणे मात्र ओगदेईच्या मृत्यूमुळे रहित करण्यात आले.

मृत्यू

संपादन

इ.स.१२४१ मध्ये ओगदेई खानाचा अतिमद्यपान व संधीवाताच्या दुखण्याने मृत्यू झाला. आपल्या पश्चात आपला बेजबाबदार व ऐशोआरामाला चटावलेला मुलगा गुयुक खान गादीवर बसावा अशी ओगदेईची इच्छा नव्हती. त्याने जीवंतपणी आपला उत्तराधिकारी न निवडल्याने त्याची पत्नी व गुयुक खानाची आई तोरेगीन खातूनने काही काळ राज्यकारभार सांभाळला. पुढे इ.स. १२४५ मध्ये तिने आपल्या मुलाला गुयुक खानाला गादीवर बसवले. ओगदेईच्या बाजूने लढणाऱ्या रशियामधील जोचीच्या मुलाला बाटु खानला ही निवड मान्य नव्हती. त्यामुळे गुयुक व बाटु यांच्यातील बेबनाव वाढत होता. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी इ.स. १२४८मध्ये गुयुक खान बाटुच्या भेटीस जात असता त्याचा वाटेत मृत्यू झाला. यानंतर सत्ता तोलुई खान याचा पुत्र मोंगके खान याच्या ताब्यात गेली.

संदर्भ

संपादन
  • गेंगीज़ खान ऍन्ड द मेकिंग ऑफ द मॉडर्न वर्ल्ड - जॅक वेदरफोर्ड
  • द मंगोल कॉन्क्वेस्ट्स - बाय द एडिटर्स ऑफ टाइम-लाइन बुक्स


(अपूर्ण)