ऑपरेशन चॅस्टाइझ
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
हल्ल्यानंतर उध्वस्त झालेले मॉहने धरण
हल्ल्यानंतर उध्वस्त झालेले मॉहने धरण
दिनांक १६-१७ मे, १९४३
स्थान इडर, मॉहने आणि सॉर्पे नद्या, जर्मनी
परिणती ब्रिटिश सैन्याचा विजय
युद्धमान पक्ष
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम नाझी जर्मनी जर्मनी
सेनापती
युनायटेड किंग्डम गाय गिब्सन नाझी जर्मनी जोसेफ कॅमह्युबर
सैन्यबळ
१९ लॅंकेस्टर बॉम्बफेकी विमाने १२वे फ्लीगरकोर
बळी आणि नुकसान
८ विमाने पाडली गेली
५३ वायुसैनिक मृत्युमुखी
३ वायुसैनिक युद्धबंदी
२ धरणे उद्धवस्त
१ धरण क्षतिग्रस्त
अंदाजे १,६०० नागरिक मृत्युमुखी
(यांतील १,०००+ सोव्हिएत युद्धबंदी आणि वेठबिगारी कामगार होते).

ऑपरेशन चॅस्टाइझ हे दुसऱ्या महायुद्धदरम्यान १६-१७ मे १९४३च्या रात्रीत ब्रिटनच्या रॉयल एरफोर्सतर्फे जर्मनीच्या धरणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या कारवाईचे सांकेतिक नाव होते. या मोहिमेचे वैशिष्ट्य हे की खास या मोहिमेसाठी प्रथमच उसळणाऱ्या बॉंब (bouncing bomb)चा वापर क‍रण्यात आला. या विशिष्ट रचनेच्या बॉंबमुळेच ही कारवाई यशस्वी ठरली. लक्ष्यावर आदळल्यावर लगेच स्फोट न होता, उसळ्या घेत काही अंतर कापून फुटणारा हा बॉंब बार्न्स वॉलिस यांनी शोधला व विकसित केला होता.[१] या कारवाईअंतर्गत मॉहने धरण आणि एडरसी धरण उध्वस्त झाले तर सोर्पे धरणास जुजबी नुकसान झाले.

उसळणाऱ्या बॉंबची कार्यपद्धती विषद करणारे चित्र. बॉंब पृष्ठभागापासून कमी अंतरावरून पाण्यात सोडला जातो, त्यानंतर तो उसळत पुढे जातो. काही वेळाने वेग कमी झाल्यावर तो पाण्यात बुडतो व स्फोट होतो.

पार्श्वभूमी

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या रूर नदीच्या खोऱ्यातील औद्योगिक भागातून जर्मनीसाठी युद्धविषयक उत्पादन जोमाने होत होते. यात तेथील धरणे व जलविद्युत निर्मितीची केंद्रांचा मोठा वाटा होता. ही धरणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, कालव्यांसाठी पाणी पुरवठा या दृष्टीनेही महत्त्वाची होती. यामुळे ब्रिटनने यांच्यावर हल्ला करणे आवश्यक ठरवलेले होते.[२] या धरणांना शत्रूपासून धोका आहे हे जर्मनीही जाणून होता त्यामुळे धरणांच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आलेली होती. पारंपरिक पद्धतीने बॉंबहल्ला करून धरणे उडवणे शक्य होते, पण त्यासाठी अचूक मारा आणि तोही सातत्याने योग्य त्या जागी करत राहणे गरजेचे होते. ब्रिटिश वायुसेनेकडे असे अचूक अस्त्र उपबलब्ध नव्हते. असे अस्त्र असल्यासही जर्मनीच्या बचावाची तयारी पाहता उघडउघड हल्ला शक्य नव्हता.[३]

उसळणाऱ्या बॉम्बची कल्पना

 
अपकीप (Upkeep) असे सांकेतिक नाव दिलेला सध्या इंग्लंडच्या डक्सफोर्ड युद्धसंग्रहालयातील उसळणारा बॉम्ब

धरणाला अधिकाधिक नुकसान करण्यासाठी बॉंबचा स्फोट पाण्याच्या पृष्ठभागाखाली व धरणाच्या भिंतीजवळ होणे आवश्यक होते. यासाठी पाण्याखाली मारा करणारे पाणतीर किंवा टॉर्पेडो वापरता आले असते. याची शक्यता लक्षात घेऊन जर्मनीने आधीच धरणांत पाणतीर विरोधी जाळ्या बसवल्या होत्या. दुसरा मार्ग होता की साधारण १० टन वजनाचा बॉंब ४०,००० फूट उंचीवरून सोडून अपेक्षित ठिकाणी मारा करणे. पण त्यावेळी उपलब्ध विमानांची इतका वजनदार बॉम्ब घेऊन इतक्या जास्त उंचीवरून उडण्याच्या क्षमताची नव्हती.

व्हिकर्स-आर्मस्ट्रॉंग्स या कंपनीत काम करणाऱ्या अभियंता बार्न्स वॉलिसने यासाठी अंदाजे ४.५ टन वजनाच्या बॉंबची रचना केली.[४] हा बॉंब नलाकार असून पाण्याच्यावर ६० फूट उंचीवरून ताशी २४० मैल वेगाने फेकला जाणे अपेक्षित होते. उथळ कोनात पाण्यावर आदळल्यामुळे हा बॉंब सपाट दगडासारखा पृष्ठभागावर उसळ्या मारत जात आणि धरणाच्या भिंतीला आपटत. फेकताना उलट दिशेने मिनिटाला ५०० गिरक्या दिल्यामुळे हा बॉंब भिंतीला आपटल्यावर तीस घसटत खाली बुडत जात असे. विशिष्ट खोलीला पोचल्यावर त्यातील ट्रिगर[मराठी शब्द सुचवा] कार्यान्वित होउन बॉंबचा स्फोट होत असे. हा बॉंब त्यावेळी उपलब्ध असलेल्या एव्ह्रो लॅंकेस्टर विमानांतून फेकता येण्यासाठी चाचण्या केल्या गेल्या व त्यांत काही बदल करण्यात आले.

अपकीप

या मोहिमेसाठी वापरलेल्या बॉंबला अपकीप हे सांकेतिक नाव देण्यात आले. अपकीप हा पारंपारिक बॉंबच्या आकारात नव्हता. बॉंबचा आकार बदलून त्यांना पिंपासारखे बनवण्यात आले. तसे केल्याने त्यांना फिरक्या देणे तसेच पाण्याच्या पृष्ठभागावरून उसळ्या मारणे सोपे होते. हा बॉंब पाच फूट लांबीचा असून त्याचा व्यास ५० इंच होता. बॉंबचे एकूण वजन ९,५०० पाउंड होते व त्यात ६,६०० पाउंड वजनाची शक्तिशाली स्फोटके वापरली होती. बॉंब फेकण्यापूर्वी त्यांना फिरक्या देण्यासाठी तैनात झालेल्या लॅंकेस्टर विमानांमध्ये एक विशेष मोटरही बसवण्यात आली.[५] बॉंबच्या अवाढव्य आकाराचा बॉंब फेकी दारे काढून टाकून बॉंब तेथेच लटकविण्यात आले. एका विमानात एकच बॉंब बसू शके.[६] विमानांचे वजन करण्यासाठी त्यांवरील चिलखत कमी करण्यात आले तसेच मशीनगन ही काढून टाकण्यात आल्या.

पूर्वतयारी

२६ फेब्रुवारी, १९४३ रोजी ३० लॅंकेस्टर विमाने या मोहीमेवर तैनात करण्यात आली आणि त्यांच्याकरवे हल्ला प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी इंग्लंडमध्ये याची तालीम घेण्यात आली. यासाठी एका विंग कमांडर गाय गिब्सनच्या नेतृत्वाखाली नवीन स्क्वॉड्रनची निर्मिती करण्यात आली. यात पाच ग्रुप स्क्वॉड्रनमधून २१ चमू निवडण्यात आले. यांत इंग्लंडशिवाय त्यावेळील इंग्लंडच्या वसाहती असणारे ऑस्ट्रेलियान्यू झीलँड यांच्याही काही वैमानिकांचा समावेश होता. या सैन्यदलाला सरावासाठी एक वापरात नसलेले धरणही उपलब्ध करून देण्यात आले. त्यांना सरावासाठी आयब्रूक धरण, ॲबर्टन धरण, डेरवेंट धरण आणि चेसिल बीच येथील धरणे उपलब्ध केली गेली आणि जमीनीलगत आणि रात्री काळोखात विमाने उडविण्याचा सराव देण्यात आला. त्याकाळी वापरली जाणारी बॅरोमेट्रिक अल्टिमीटर ही हवेचा दाब मोजून जमिनीपासूनची उंची ठरवणारी उपकरणे अचूक नव्हती त्यामुळे पाण्याच्या पातळीपासून साठ फूट उंची मोजणे अवघड होते. यासाठी आरएएफच्या अभियंत्यांनी एक भौमितिक क्लृप्ती योजली. त्यांनी विमानांच्या नाकाखाली आणि पोटाखाली दोन प्रखर दिवे बसविले व त्यांचे झोत अशा प्रकारे वळविले की जमीन किंवा पाण्यापासून बरोबर ६० फूट उंचीवर हे झोत एकमेकांत मिसळून एकच झोत दिसेल.

टेहळ्यांकडून मिळालेल्या धरणे व आसपासच्या प्रदेशांच्या वर्णनावरून ठरवण्यात आले की धरणाच्या भिंतीपासून ४०० ते ४५० मीटर अंतरावर पाण्यापासून साधारण ६० फूट उंचीवरून ३९० किमी प्रति तास या वेगाने बॉब टाकण्यात यावा. अनेक महिन्यांच्या सरावानंतर मे महिन्यात हल्ला करण्याचे ठरले. या दिवसात धरणांतील पाण्याची पातळी जास्त असल्याने जास्त पाण्याच्या प्रवाहाने मोठा पूर येऊन जास्त नुकसान व्हावे ही अपेक्षा होती.

नियोजन

मोहिमेचे एकूण नेतृत्व विंग कमांडर गाय गिब्सन यांच्याकडे होते. एकूण १३३ जणांचा या मोहिमेत सहभाग होता.

१३ मे रोजी गिब्सन आणि वॉलिस यांनी चार अधिकाऱ्यांना या मोहीमेचा तपशील दिला. यांत स्क्वॉड्रन लीडर हेन्री मडस्ले, एच.एम. यंग या फ्लाइट कमांडर; मॉहने धरणावरील हल्ल्याचा नायक फ्लाइट लेफ्टनंट जॉन हॉपगूड आणि बॉंबिंग लीडर फ्लाइट लेफ्टनंट बॉब हे यांचा समावेश होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी आपापल्या दलांना हा तपशील दिला.

१६मेच्या रात्री नियोजित ही मोहीम तीन फळ्यांमध्ये होणार होती. पहिली फॉर्मेशन प्रत्येकी तीन विमाने असलेल्या तीन तुकड्यांची होती. कमांडर गिब्सनच्या नेतृत्वाखाली ही फळी मॉहने धरणावर चालून जाणार होती आणि बॉंब शिल्लक राहिले तर इडर धरण त्यांचे दुय्यम लक्ष्य होते. दुसऱ्या फळीमध्ये फ्लाइट लेफ्टनंट ज्यो मॅककार्थीच्या नेतृत्वाखाली पाच विमाने होती. ही विमाने सोर्पे धरणावर हल्ला करणार होती. तिसरी फळी ही राखीव होती आणि फ्लाइट सार्जंट सिरिल अँडरसनच्या नेतृत्वाखाली मुख्य हल्ल्यानंतर दोन तासांनी निघणार होती. जर पहिल्या हल्ल्यांना यश नाही मिळाले तर ही फॉर्मेशन पुन्हा एकद्या त्या लक्ष्यांवर मारा करणार होती. जर यश मिळाले तर तिसरी फॉर्मेशन इतर छोट्या धरणांवर मारा करणार होती.

मोहीम

१६ मेच्या रात्री ९:२८ वाजता पहिल्या विमानाने उड्डाण केले. दुसऱ्या क्रमांकाच्या फळीतील ही विमाने उत्तरेकडून दूरच्या वाटेने लक्ष्याकडे जाणार होती.[७] मॅककार्थीच्या विमानातून तेलगळती झाल्याने त्याने राखीव विमानातून ३४ मिनिटे उशीरा उड्डाण केले.[८] पहिल्या क्रमांकाच्या फळीने ९:३९ पासून तीन विमानांच्या गटांत दहा-दहा मिनिटांच्या अंतराने उड्डाण केले.[७] राखीव फळीने १७ मेच्या पहाटे ००:०९ वाजता उड्डाण केले.[७]

गिब्सन आणि मॅककार्थीने आपल्या हल्ला जर्मनीच्या विमानविरोधी तोफांची ठाणी चुकवत दोन वेगवेगळ्या मार्गांनी नेल्या. असे असताही शत्रूच्या प्रदेशांत सगळ्यांनी साधारण एकत्रच प्रवेश करणे अपेक्षित होते. गिब्सनची फळी नेदरलँड्समध्ये घुसून शत्रूची ठाणी चुकवित उत्तरेला वळली आणि रुह्र नदीच्या काठाने पुन्हा दक्षिणेकडे वळत मॉहने धरणाकडे गेली. मॅककार्थीची फळी उत्तरेकडून नेदरलँड्समध्ये गेली व वेसेलजवळ गिब्सनला मिळाली. तेथून त्यांनी मॉहने धरण पार करीत सोर्पेकडे कूच केली.[९]

रडारच्या नजरेत न भरण्यासाठी ही विमाने जमीनीपासून १०० फूट उंचीवर उडत होती तरीही जर्मन सैन्याला त्यांचा सुगावा लागलाच. दुसऱ्या गटातील विमानांवर पहिला हल्ला झाला. त्यात एक विमान आपले रेडियो संदेशवहन गमावल्यामुळे परत फिरले.[१०] अजून एक विमान समुद्रसपाटीलगत गेले व पाण्यावर आदळले. त्यात आपला बॉंब गमावला तरीही वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान परत वर उचलले वर परत तळावर आणले. एक विमान शत्रूच्या हल्ल्यात वॅडनझीजवळ कोसळले तर अजून एक जर्मनीमध्ये विजेच्या खांबाना धडकून पडले. या विमानातील बॉंब जर्मनांच्या हाती पडला.[११] दुसऱ्या फळीतील पाचपैकी चार विमाने नाकाम झालेली असताही उशीरा निघालेला मॅककार्थी आपल्या राखीव विमानातून नेदरलँड्स पार करता झाला. पहिल्या फळीतील एक विमान विजेच्या तारांवर आदळून कोसळले.[७]

मॉहने धरणावरील हल्ला

पहिल्या गटाने गिब्सनच्या नेतृत्वाखाली प्रथम मॉहने धरणावर हल्ला केला. पहिला बॉंब गिब्सनने टाकला. त्यानंतर हॉपगुडने बॉंब टाकायचा प्रयत्न केला. त्यादरम्यान त्याच्या विमानावर गोळ्यांच्या वर्षाव झाला. विमान पाण्यासरसे आल्याने त्याच्या स्वतःच टाकलेल्या बॉंबचा झटका विमानाला बसला व पंख तुटून ते कोसळले. यानंतर तिसरा प्रयत्न मार्टिनने केला. यावेळी मार्टिनला गोळीबारापासून वाचवण्यासाठी गिब्सनने स्वतःचे विमान धरणाला समांतर उडवले. जेणेकरून जर्मन तोफांचे लक्ष विचलित व्हावे. तरीही मार्टिनच्या विमानाला थोडी इजा झालीच. पण त्याने योग्य प्रकारे बॉंब टाकला. त्यांनंतर यंगनेही बॉंब टाकला आणि नंतर माल्टबीने. माल्टबीच्या हल्ल्यानंतर नंतर धरण फुटले. मॉहने धरण फुटल्यावर गिब्सन हा यंगला सोबत घेऊन इडर धरणाकडे वळला.[७] तेथे त्याने इतर तीन वैमानिकांसह इडर धरणावर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान एका वैमानिकाने हल्ल्याचे धावते वर्णन केले होते जे त्यांच्या ठाण्याकडे प्रसारित झाले.[१२]

इडर धरणावरील हल्ला

 
१७ मे १९४३ रोजी फुटलेल्या इडर धरणाचे चित्र
 
इडर धरणाचे सध्याचे चित्र: धरणाच्या डावीकडे असलेल्या जागेत आताही दरवाजे नाहीत.

इडर धरणाच्या सभोवतालचा भौगोलिक परिसर त्यातील डोंगराळ असल्यामुळे विमानउड्डाणासाठी फार अवघड होता. यातच धुकेही पडले होते. शॅननने आपल्या विमानासह पहिला हल्ला केला पण बॉंब टाकण्याजोगी चाल करणे त्याला जमले नाही. सहा प्रयत्न करूनही हल्ला न करता आल्याने त्याने माघार घेतली. यानंतर मॉडस्लेने टाकलेला बॉंब त्याचा अंदाज चुकल्याने पाण्यात न पडता व धरणाच्या भिंतीला धडकून फुटला. या स्फोटात स्वतः मॉडस्लेच्या विमानाचे मोठे नुकसान झाले. यानंतर शॅननने पुन्हा प्रयत्न करून यशस्वीरीत्या बॉंब टाकला. अखेरचा बॉंब नाइट याने टाकल्यावर इडर धरणही फुटले.[१३]

सोर्पे धरणावरील हल्ला

सोर्पे धरणाकडे केवळ ३ विमाने पोचू शकली. इतर विमाने एकतर रस्ता चुकली वा जर्मनांनी ती वाटेतच पाडली. सोर्पे धरणाची परिस्थिती इतर धरणांपेक्षा वेगळी होती. धुके होतेच त्यातच धरणाची भौगोलिक रचना अशी होती की इतर धरणांप्रमाणे सोर्पेच्या मुख्य भिंतीला लंबरेषेत सरळ उडाण करून बॉंब टाकणे शक्य नव्हते. यामुळे त्यांनी सोर्पे धरणावर वेगळ्या प्रकारे हल्ला चढवला. धरणाच्या भिंतीला समांतर अशा रेषेत उडडाण करीत विमानांनी बॉंब टाकला. यावेळी बॉंबला जागीच टाकायचे असल्याने त्यांना फिरक्या देण्याची गरज नव्हती. मॅककार्थी , ब्राउन, अँडरसन या तिघांनी सोर्पे वर हल्ला केला.

पहिला प्रयत्न मॅकार्थीने केला पण त्याचे गणित जमले नाही आणि त्याचे विमान समोरील बाजुच्या टेकडीला आदळताना थोडक्यात बचावले. त्याने अजून ९ असफल प्रयत्न केले. अखेर १०व्या प्रयत्नात त्याच्या विमानातील सहकाऱ्याने बॉंब टाकला. त्यानंतर त्याने विमान वळवुन नुकसानीचा अंदाज घेतला. पण त्याला आढळून आले की भिंतीचे फारच किरकोळ नुकसान झाले असून धरण सहीसलामतच होते. याच दरम्यान राखीव दलातील वैमानिकांना सोर्पे कडे जाण्याचे आदेश मिळाले होते. पण बर्पीचे विमान रस्त्यातच जर्मनांनी पाडले व ते सोर्पे जवळ पोहचु शकले नाही. ब्राउन धरणाजवळ आला तोपर्यंत धुके दाट होऊ लागले होते. त्याने अंदाजे बॉंब टाकला पण त्याने धरणाला नुकसान झाले नाही. यानंतर अँडरसन पोहोचला पण तोपर्यंत धुके इतके दाट झाले होते की अँडरसनला प्रयत्न करणेही जमले नाही.

परतीचा प्रवास

यानंतर ब्रिटिश विमाने माघारी वळली. परत येतांनाही त्यांनी अधिकतम १०० फूट उंची वरूनच उडडाण केले. समुद्रावरून उडताना ही विमाने इतकी खाली होती की जर्मनांनी मारलेले गोळे पाण्यावरून दगडांप्रमाणे उसळताना दिसत होते.[१४] तरीही जर्मनांनीही माऱ्यामध्ये आणखी २ विमाने पडली. मोहिमेत भाग घेतलेल्या १७पैकी केवळ ९ विमाने परतली. त्यांतील दोन विमाने मोहिमेपूर्वीच परतली होती. इतर ८ विमाने एकतर जर्मनांनी पाडली अथवा नुकसान होऊन कोसळली. त्यातील सैनिकही मृत्युमुखी पडले गमवावे लागले. स्कॅम्पटनच्या तळावर ३:११ वाजता पहिले विमान परतले. विंग कमांडर गिब्सन ४:१५ला परतला. सर्वात शेवटचे विमान सकाळी ६:१५ला परतले.[१५]

रॉयल एर फोर्सने नुकसानीचा पूर्ण अंदाज घेण्यासाठी सकाळ होताच हल्ला केलेल्या जागेचे छायाचित्रण करण्यास विमाने पाठवली. त्या विमानाच्या वैमानिकाला रुर नदीच्या खोऱ्यात सर्वत्र पुराचे पाणी पसरले होते. आणि केवळ जमिनीचे उंचवटे, झाडांचे शेंडे आणि चर्चच्या मिनाऱ्यांची टोके पाण्यातुन डोकावतांना दिसत होती.[१६]

मोहिमेमुळे झालेली प्राणहानी

या मोहिमेत युनायटेड किंग्डमची १७ पैकी आठ म्हणजे जवळपास निम्मी विमाने खस्त झाली तसेच मोहिमेत भाग घेतलेल्या १३३ पैकी ५३ वायुसैनिक म्हणजे ४०% जण मारले गेले. यांतील दोन रॉयल ऑस्ट्रेलियन एर फोर्स तर तेरा रॉयल केनेडियन एर फोर्सचे सैनिक होते.[१७] वाचलेल्यांतील ३४ जणांना शौर्यपदके देऊन बकिंगहॅम पॅलेस मध्ये गौरवण्यात आले. यांत पाच डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस ऑर्डर, दहा डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस अधिक चार पुनर्गौरव, दोन कॉन्स्पिक्युअस गॅलंट्री मेडल आणि अकरा डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग मेडल अधिक एक पुनर्गौरव होते. स्वतः विंग कमांडर गिब्सनला व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित करण्यात आले.[१८]

जर्मनीत धरण फुटल्यावर आलेल्या पुरामध्ये अंदाजे १,६५० जण मारले गेले, यातील सुमारे १,००० जण हे युद्धकैदी वा शत्रुराष्ट्रांचे वेठबिगारीचे मजुर होते. यात प्रामुख्याने रशियन व इतर विविध देशांच्या युद्धकैद्यांचा समावेश होता.[१९][२०])

या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेली स्क्वॉड्रन आजही कार्यरत आहे. पुढे या स्क्वॉड्रनांनी अशाच काही अपारंपारिक वा कठीण मोहिमांत भाग घेतला. '१९७७ साली जिनिव्हात झालेल्या ठरावानुसार धरणांवर केल्या जाणाऱ्या अशाप्रकारच्या हल्ल्यांना नियमबाह्य ठरवण्यात आले आहे.[२१]

युद्धावरील परिणाम

आज ऑपरेशन चॅस्टाइझचे मूल्यमापन करतांना या मोहिमेला तांत्रिक दृष्ट्या फारसे यश लाभलेले दिसत नाही[२२] [२३] पण तत्कालीन दिवसात या मोहिमेचे प्रचंड यशस्वी अशेच स्वागत झाले.[२४] जर्मनीच्या आक्रमक हवाई हल्ल्यांनी इंग्लंडच्या जनतेला व पर्यायाने मित्र राष्ट्रांना जर्मनीत घुसुन आपणही प्रहार करु शकतो हा विश्वास मिळाला. या कारवाईमुळे ब्रिटीश सैन्याचेही मनोधैर्य प्रचंड वाढले. जर्मनीच्या फुटलेल्या धरणांचे व पुर वाहुन गेलेल्या कारखान्यांचे छायाचित्रण पाहुन जर्मनीच्या औद्योगिक क्षेत्राला जबर झटका बसला असुन त्यातुन जर्मनीला सावरण्यात कित्येक वर्ष लागतील असा काहींचा होरा होता.

प्रत्यक्षात जर्मनी मात्र काही आठवड्यांतच सावरला. मॉहने धरणाला २५० रुंदीचे व २९२ फुट उंच भगदाड पडले होते. त्यातुन ३३ कोटी टन इतके पाणी रुर खोऱ्यात पसरले. पाण्याचा १० मीटर उंची प्रवाह २४ किमीच्या वेगाने नद्यांच्या खोऱ्यातुन गेला. त्यात काही खाणी बुडाल्या, ११ कारखाने , ९२ घ्ररेही उध्वस्त झाली तर ११४ कारखाने व ९७१ घ्ररे क्षतिग्रस्त झाली. ८० किमी पर्यंतच्या प्रदेशात पुराचे पाणी शिरले यात सुमारे २५ रस्ते , लोहमार्ग व पुले ही वाहुन गेले. विजेच्या उत्पादनात मोठा फटका बसला ५१०० किलोवॅट वीज उत्पादन करणारे दोन केंद्रे उधवस्त झाली तर इतर ७ केंद्रांचे नुकसान झाले. यामुळे याभागातील वीजपुरवठा २ आठवड्यांपर्यंत गायब होता.

पण या सर्वातून २७ जून पर्यंत जर्मनीने पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत केला. तसेच विद्युत पुरवठाही पूर्ण क्षमतेने सुरू झाला. खोऱ्यातील जलवाहतुकही पुर्ववत झाली. परंतु जर्मनीला यासाठी आपत्कालीन मदतकार्य हाती घ्यावे लागले. त्यासाठी आपले राखीव सैन्य व इतर सैनिक युद्धक्षेत्रातुन दूर असे मदतकार्यात राबवावे लागले. त्याचा युद्धातील आक्रमक धोरणांवर परिणाम झालाच पण यापुढील काळात दोस्त राष्ट्रांनी केलेल्या हल्ल्यांदरम्यानही भोगावा लागला.

याशिवाय या मोहिमेच्या अनुभवावरून दोस्त राष्ट्रांनी अशा प्रकारच्या इतर अनेक मोहिमा आखून जर्मनीची मोठी शस्त्रास्त्रे निकामी केली.

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

 1. ^ http://nla.gov.au/nla.news-article18403598 सिडनी मॉर्निंग हॅराल्डने तयार केलेली चित्रफीत, १९५४-०१-०८
 2. ^ Ashworth, १९९५, पान. ७६.
 3. ^ Ashworth, १९९५, पान. ७७.
 4. ^ Ashworth 1995, पान. ७७.
 5. ^ "एव्ह्रो लॅंकेस्टर बी मार्क १." वॉरबर्ड फोटो आल्बम. पाहिले: २०१०-१०-१०.
 6. ^ "लॅंकेस्टर बॉंबफेकी विमानाची रूपरेषा." द डॅमबस्टर्स (६१७वी स्क्वॉड्रन) वेब.आर्चिव्ह.ऑर्ग मार्फत,२००८, पाहिले: २०१०-१०-१०
 7. ^ a b c d e "617 Squadron, The Operational Record Book 1943–1945, pp. 22–30." Archived 6 December 2010 at the Wayback Machine. डॅमबस्टर्स.ऑर्ग.यूके, २००९-०२-१५. पाहिले: २००९-०५-१५.
 8. ^ Sweetman 1982, p. 128.
 9. ^ Sweetman 1982, p. 124.
 10. ^ "Geoffrey Rice DFC of RAF 617 Squadron Dambusters". www.hinckleypastpresent.org. Archived from the original on 2018-08-28. 5 September 2018 रोजी पाहिले.
 11. ^ Jasper Copping (5 May 2013). "New German plaque for downed Dambuster bomber". Daily Telegraph. 13 May 2013 रोजी पाहिले.
 12. ^ Robertson 1947, p. 291.
 13. ^ "Obituary: Flying Officer Ray Grayston." telegraph.co.uk. Retrieved: 16 July 2010.
 14. ^ "Obituary: George Chalmers." The Daily Telegraph, 11 August 2002. Retrieved: 4 February 2008.
 15. ^ James Holland (2013), Dam Busters: The Race to Smash the Dams, 1943, Random House, p. 462, ISBN 9780552163415CS1 maint: extra punctuation (link)
 16. ^ James Holland (2013), Dam Busters: The Race to Smash the Dams, 1943, Random House, p. 462, ISBN 9780552163415CS1 maint: extra punctuation (link)
 17. ^ Commonwealth War Graves Commission, 2005, Operation Chastise: The Dams Raid, 16/17 May 1943, pp. 4–5. Access date: 16 January 2011.
 18. ^ "क्र. 36030". द लंडन गॅझेट (Supplement). 28 May 1943. pp. 2361–2362.
 19. ^ "Casualties of the Dams Raid." Archived 25 October 2009 at the Wayback Machine. RAF Museum. Retrieved: 11 October 2009.
 20. ^ "On This Day: 17 May 1943 – RAF raid smashes German dams". BBC.
 21. ^ "Protocol Additional to the Geneva Conventions of 12 August 1949 and relating to the Protection of Victims of International Armed Conflicts (Protocol I), 8 June 1977." [ICRC Treaties and Documents]. Retrieved: 14 February 2010.
 22. ^ McKinstry, Leo (15 August 2009). "Bomber Harris thought the Dambusters' attacks on Germany 'achieved nothing'". 5 September 2018 रोजी पाहिले – www.telegraph.co.uk द्वारे.
 23. ^ Falconer 2007, pp. 89–90.
 24. ^ "How effective was the Dambusters raid?". 15 May 2013. 5 September 2018 रोजी पाहिले – www.bbc.co.uk द्वारे.