आर.के. लक्ष्मण

(आर. के. लक्ष्मण या पानावरून पुनर्निर्देशित)


रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण (२४ ऑक्टोबर १९२१ - २६ जानेवारी २०१५) हे एक भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक होते. आर. के. लक्ष्मण या नावाने ते ओळखले जातात.[] ते त्यांच्या "द कॉमन मॅन"च्या निर्मितीसाठी आणि 1951 मध्ये सुरू झालेल्या टाइम्स ऑफ इंडियातील "यू सेड इट" या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रांसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत.[]

रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण (आर.के. लक्ष्मण)
जन्म कृष्णस्वामी
२३ ऑक्टोबर, इ.स. १९२४
म्हैसूर, भारत
मृत्यू २६ जानेवारी, २०१५ (वय ९३)
पुणे, महाराष्ट्र
निवासस्थान पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए.
पेशा व्यंगचित्रकार
कारकिर्दीचा काळ १९४२पासून
मूळ गाव रासीपुरम
धर्म हिंदू
जोडीदार कमला
वडील कृष्णस्वामी
नातेवाईक आर.के. नारायण
पुरस्कार पद्मभूषण(१९७१) पद्मविभूषण(२००५) मॅगसेसे पुरस्कार(१९८४)
स्वाक्षरी

आर.के. लक्ष्मण यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अर्धवेळ व्यंगचित्रकार म्हणून करून त्यांनी स्थानिक वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी काम केले. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना, त्यांनी त्यांचे मोठा भाऊ आर.के. नारायण यांच्या "द हिंदू"मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कथांसाठी चित्रे रेखाटली.[] मुंबईतील फ्री प्रेस जर्नलसाठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची पहिली पूर्णवेळ नोकरी होती. नंतर, ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये सामील झाले आणि द कॉमन मॅन या पात्रासाठी प्रसिद्ध झाले, जो लक्ष्मण यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

जन्म व सुरुवातीचे आयुष्य

संपादन

लेखक आर.के. नारायण यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ या दिवशी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. 'हार्पर्स', 'पंच', 'ऑन पेपर', 'बॉइज', अ‍ॅटलांटिक', अमेरिकन मर्क्युरी', 'द मेरी मॅगझिन', स्ट्रॅन्ड मॅगझिन', अशी मासिके त्यांना तिथे पहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

संपादन

अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स येथे शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्झ मध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नल मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे देखील तेथेच काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी 'फ्री प्रेस'ची नोकरी सोडली. त्यानंतर अर्धशतकभर ते 'टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये व्यंगचित्रे काढत राहिले. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्यांचे व्यंगचित्र या दैनिकात नाही असे एकदाही घडलेले नाही.

लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे - चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत.

 
पुण्यातील कॉमन मॅन पुतळा

घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास याच्या जोरावर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सहजच लक्षात राहतात. आसपासच्या घटना मिस्किलपणे दाखवीत असल्याने लक्ष्मण यांची चित्रे खास आहेत. त्यांच्यावर तोचतोचपणाचे आरोपही झाले, पण त्यांनी कधी चिडून कोणाला उत्तर दिले नाही.

रा. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की त्याचा एक पूर्णाकृती पुतळाही बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्‌स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. आर.के, लक्ष्मण हे कथालेखक व कादंबरीलेखकही आहेत. त्यांनी लिहिलेली निबंधांची आणि प्रवासवर्णनांचीही पुस्तके आहेत.

लक्ष्मण यांचे थोरले भाऊ प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचा लक्ष्मण यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्यासाठीही बरीच व्यंगचित्रे काढली. तसेच इतर अनेक लेखकांसाठी व्यंगचित्रे काढली आहेत. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या कथा दैनिक 'हिंदू मधून प्रसिद्ध होत असत. या कथांसाठी लक्ष्मण यांच्याकडूनच ते चित्रे काढून घेत असत. सरावाने आर.के. लक्ष्मण अधिकाधिक चांगली चित्रे काढू लागल्यामुळे इतर लेखकही त्यांच्याकडून चित्रे काढवून घेऊ लागले. त्यांच्या पत्‍नी कमला यांच्या गोष्टींसाठीही त्यांनी चित्रे काढून दिली. व्यंगचित्रांचे त्यांना विशेष आकर्षण होते. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. स्थानिक वर्तमानपत्रांतूनही त्यांच्या व्यंगचित्रांना प्रसिद्धी मिळत असे.

इतका दीर्घकाळ व्यंगचित्रे काढणारा हा बहुधा एकमेव व्यंगचित्रकार असावा. त्यांचा 'कॉमन मॅन' गेल्या पन्नास वर्षातील देशातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा-उलथापालथीचा साक्षीदार आहे. चौकटीचा कोट आणि धोतर अशा पेहरावातील त्यांची छबी सतत कायमच राहिली आहे. आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रेरं आणि त्यावरील भाष्ये मार्मिक असतात. भारतीय मानसिकतेतून उमटलेली ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते. प्रसंगी ही प्रतिक्रिया खरमरीत, बोचकही असते. आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रांमध्ये प्राजंळपणाचंही दर्शन घडते. मात्र एखाद्या व्यक्तीचे व्यंग्य दर्शवणारी व्यंगचित्रेरं त्यांनी काढली नाहीत, किंवा कोणाला दुखावण्यासाठीही त्यांनी त्यांच्या कुंचल्याचा वापर केला नाही. जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी , सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक पिढया त्यांनी रेखाटल्या आहेत. एका साध्या रेषेतून या नेत्याचे व्यक्तिवैशिष्ट्य स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे.

लक्ष्मण यांची राजकीय व्यंग्यचित्रेसुद्धा बहारदार असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवर त्यांत बोचक टीका असते. पूर्वी जवाहरलाल नेहरूंचे ते बोलके व्यंग्यचित्र काढीत असत. तीच गोष्ट भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची. व्यंग्यचित्राप्रमाणेच विडंबनचित्र काढणे हाही लक्ष्मण यांचा हातखंडा आहे. एरवी त्यांच्या राजकीय व्यंग्यचित्रांत ताज्या घटनांवर औपरोधिक भाष्य असते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील विषयांत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे परकीय राजकारणातील डावपेच, ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे वेगवेगळे आव्हानखोर पवित्रे अथवा दक्षिण आफ़्रिकेतील सत्ताधाऱ्यांचे बेमुर्वतखोर वांशिक धोरण हे सर्व सातत्याने लक्ष्मण यांच्या कुंचल्याच्या फेकीचे विषय होत असतात. भारतातीय राजकारणातील गमतीजमती तर ते नेहमीच आपल्या पहिल्या पानावरील व्यंग्यचित्रांतून, आजच्या राजकारणी मंडळींचा दंभस्फोट करण्यासाठी उपयोगात आणत असतात. इतक्या तल्लखपणे आजच्या सामाजिक व राजकीय जीवनातील विसंगती शोधून काढणारे फार थोडे व्यंग्यचित्रकार या देशात आहेत.

आर. के. लक्ष्मण यांची निरीक्षणशक्ती अतिशय तीव्र आहे. बारीकसारीक तपशील ते अचूकपणे टिपतात. त्यांच्याकडे उत्तम बुद्धिमत्ता अफाट आत्मविश्र्वास आहे. पण लक्ष्मण यांचे टीकाकार त्यांचे काही दोषही दाखवतात. त्यांची राजकीय व्यंगचित्रे खूपच मिळमिळीत असतात, त्यात तिखटपणा नसतो, वादविवाद वा चर्चा पुढे नेण्याची त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये क्षमता नसते, त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये फक्त राजकीय विधान असते, भाष्य किंवा टीका नसते, त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये नावीन्याचा अभाव, तोचतोचपणा असतो, अशा स्वरूपाची टीका त्यांच्यावर केली जाते. तथापि, आर. के. लक्ष्मण यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचे अचूक भान आहे. हेच भान त्यांच्या कॉमन मॅन' मधून व्यक्त होते. कोणत्याही काळातील, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला त्यांचे विधान पटते, रुचते आणि म्हणूनच त्यांची लोकप्रियता दीर्घकाळ टिकून राहिली आहे. कॉमन मॅन या व्यंगचित्रसंग्रहचे जनक.

आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके

संपादन
  • आयडल अवर्स
  • आर.के. लक्ष्मण : दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८
  • द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह)
  • द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र; मराठीत -लक्ष्मणरेषा)
  • अ डोज ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे)
  • दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)
  • फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह)
  • बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके)
  • द मेसेंजर (कादंबरी -१९९३)
  • अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे)
  • द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
  • लक्ष्मणरेषा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक अशोक जैन)

आर.के. लक्ष्मण यांच्यावरील प्रकाशित पुस्तके

संपादन
  • टाइमलेस लक्ष्मण (इंग्रजी)

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • पद्मभूषण - सरकार भारत - 1973[]
  • पद्मविभूषण – सरकार भारत - 2005[]
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार –पत्रकारिता, साहित्य आणि क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्ट्ससाठी - 1984[]
  • कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार – कर्नाटक सरकार – १९८३
  • पत्रकारितेसाठी जीवनगौरव पुरस्कार – CNN IBN TV18 – 29 जानेवारी 2008[]
  • 'क्रिएटिव्ह कम्युनिकेशन' मधील उत्कृष्टतेसाठी आर्ट अँड म्युझिक फाऊंडेशनतर्फे पुणे पंडित पुरस्कार (पुणे पुरस्काराचे विद्वान) - 2012
  • म्हैसूर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट - 2004
  • सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आर.के. लक्ष्मण यांच्या नावाची एक खुर्ची आहे.[]
  • मराठा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी दिली आहे.
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार

IIC द्वारे आयोजित प्रदर्शने

संपादन

भारतीय व्यंगचित्रकार संस्थेतर्फे लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शने भारतीय व्यंगचित्र दालनात आयोजित करण्यात आली.

दिनांक प्रदर्शन उद्घाटक
6 फेब्रु 2009 आर.के. लक्ष्मण जयरामराजे उर्स
8 फेब्रु 2012 आर.के. लक्ष्मण यांचे अप्रकाशित डूडल एम एन वेंकटचलिया, गिरीश कर्नाड
17 ऑगस्ट 2013 प्रसिद्ध पंधरा ताडाओ कागाया (जपानी व्यंगचित्रकार)
21 ऑक्टो 2013 लक्ष्मण यांचे सर्वोत्तम ...
27 ऑक्टो 2014 चेहरे : लक्ष्मण यांचे व्यंगचित्र ...
23 जानेवारी 2016 स्टार्ट-अप 'कोरावंजी' मधील आर.के. लक्ष्मण उषा श्रीनिवास लक्ष्मण, एम.शिवकुमार, बेलुरू राममूर्ती
15 ऑक्टो 2016 अप्रकाशित RKLaxman ...
14 ऑक्टोबर 2020 त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हदी प्रदर्शन ...

चित्रपट आणि इतर माध्यमांत

संपादन

आजारपण आणि मृत्यू

संपादन

३० ऑगस्ट २००३ रोजी सकाळी ८ वाजता आर. के. लक्ष्मण यांना पक्षघाताचा झटका आला आणि त्यांची डावी बाजू निकामी झाली. यातूनही लक्ष्मण सावरले. ते पुणे आणि मुंबई येथे पत्नी कमला लक्ष्मण यांच्यासह राहत होते. २६ जानेवारी २०१५ला काही अवयव निकामी झाल्यामुळे निधन झाले.

आत्मचरित्र

संपादन

आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.

बाह्यदुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". web.archive.org. 2007-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Times of India cartoonist RK Laxman dies after illness" (इंग्रजी भाषेत). 2015-01-26.
  3. ^ "10 things you need to know about RK Laxman". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-01-14 रोजी पाहिले.
  4. ^ a b Menon, Meena (2015-01-26). "The uncommon man: R.K. Laxman (1921-2015)" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  5. ^ "'Common Man' cartoonist RK Laxman dead at 93" (इंग्रजी भाषेत). 2015-01-26.
  6. ^ "Renowned cartoonist RK Laxman to be awarded Bharat Bhushan". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-01-14 रोजी पाहिले.
  7. ^ "RK Laxman Chair started at Symbiosis University - Times Of India". web.archive.org. 2012-11-05. 2012-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-14 रोजी पाहिले.
  8. ^ "Meet the Raging Bull". thedailyeye.info (इंग्रजी भाषेत). 2022-01-14 रोजी पाहिले.