अंबिकाबाई भोसले

या छत्रपती राजाराम महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या


महाराणी अंबिकाबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या. त्यांना अहिल्याबाई असेही म्हणले जाते. त्या वैरागकर नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या. त्या निपुत्रिक होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्या विशाळगडावर सती गेल्या. त्यांचे वय त्या वेळी अवघे २४ ते २५ वर्षींचे असावे. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर अतिशय दृढ निश्चयाने अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या. आजही विशाळगडावर एका चौथऱ्यावर दगडात कोरलेली दोन पावले दिसतात. ती अंबिकाबाई ऊर्फ अहिल्याबाई यांच्या समाधीची आहेत.

महाराणी अंबिकाबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ १६८९ - १७००
राजधानी जिंजी
पूर्ण नाव अंबिकाबाई राजारामराजे भोसले
पदव्या महाराणी
मृत्यू १७००
विशाळगड, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी महाराणी ताराबाई
उत्तराधिकारी महाराणी सकवारबाई (द्वितीय)
पती छत्रपती राजाराम महाराज
राजघराणे भोसले
चलन होन

महाराणी ताराबाई आणि महाराणी राजसबाई छत्रपती राजाराम राजेंच्या दोन्ही पत्नी, छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्याजवळ नव्हत्या. त्या पन्हाळा किल्ल्यावर होत्या. चौथी पत्नी अंबिकाबाई राणीसाहेब विशाळगडावर होत्या. त्यांना छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा चार सहा घटका दिवस होता. तेव्हा अंबिकाबाई राणीसाहेबांनी सहगमनाचा संकल्प केला आणि त्यासाठी मलकापूरहून साहित्य आणावयास हवालदारास सांगितले. तो बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, 'दिवस थोडा राहिला. मलकापुराहुन साहित्य येणे त्यास रात्र होईल. गलबलीचे दिवस किल्ल्याचे काम. येविशी आज्ञा?' तेव्हा अंबिकाराणी बोलली, स्वार पाठवून जलदीने साहित्य आणवावे. मी गेल्यावाचून सूर्य अस्तास जाणार नाही.' असे म्हणून सदरेची सावली पडली होती, त्या सावलीजवळ किचित् मातीचा ढीग करवून त्यावर पळसाचे पान रोवले व म्हणले की, 'यास ओलांडन सावली जाणार नाही." आणि असे सांगतात की, खरोखरच अंबिकाबाई राणीच सहगमन होईपर्यत सावली त्या पळसाच्या पानाला ओलांडून गेली नाही. छ. राजाराम राजेंचे पागोटे हृदयाशी धस्त अंबिकाबाई राणीसाहेब सती गेल्या.

छ. राजाराम महाराजांचे जीवन हे समर्पण होते. राणी अंबिकाबाईचे जीवन हे राजारामाच्या चरणी वाहिलेले फूल होते. त्यांची समाधी ही त्या पवित्र समर्पणाची साक्ष आहे.