स्त्रीमुक्ति आंदोलन
सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष समतावादासाठी व स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासाठी आधुनिक काळात छेडले गेलेले आंदोलन. स्त्रिया व काही समाजसुधारकांनी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व वैचारिक पातळीवर हाताळलेले असल्यामुळे त्यास चळवळ म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘ स्त्री वर्ष ’ म्हणून व १९७५ — ८५ हे ‘ स्त्री दशक ’ म्हणून घोषित करण्यात आल्यावर स्त्रीमुक्ती चळवळींच्या माध्यमातून स्त्रियांसंबंधीचे अनेक प्रश्न विशेषत्वाने पृष्ठस्तरावर येऊ लागले. स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीवाद वगैरे संकल्पना याच काळात रूढ झाल्या, तरी स्त्रियांच्या उद्धाराचा,कल्याणाचा विचार व कृती शतकापूर्वीच सुरू झाली होती. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान दिल्याने व रूढ समाजव्यवस्थेत धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक व आर्थिक अशा सर्व व्यवस्था स्त्रियांचे शोषण करतात, याची जाणीव झाल्याने त्यांना विरोध करण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळ अस्तित्वात आली.
स्त्रीचे माणूसपण नाकारून तिला जी पशूतुल्य स्थिती प्राप्त करून दिली जाते, त्याविरुद्ध बंड पुकारत समाजात व्यक्ती म्हणून असलेले तिचे स्थान प्रस्थापित करण्यासाठी विकसित करण्यात आलेली ही एक विचारप्रणाली आहे. मोर्चे, आंदोलने, चळवळी, धरणे, निवेदने, बैठका, सभा ,साहित्य, भाषणे, चर्चासत्रे, अधिवेशने, कार्यशाळा, स्त्री अभ्यासकेंद्रे इत्यादींच्या माध्यमांतून जगभर स्त्रियांनी पुरुषी मानसिकतेला धक्के देत आपले न्याय्य हक्क मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालवले आहेत.धर्म, संस्कृती, परंपरा यांची बीजे समाजमनात खोलवर रुजलेली असतात. हजारो वर्षांपासून स्त्री-पुरुषांच्या कामाची वाटणी ठरलेली आहे. पूर्वीच्या काळी शिकार, लढाया, संरक्षण ही पुरुषांची प्रमुख कतर्र्व्ये होती. त्यानंतर शेती, अर्थार्जन, शिक्षण, कुटुंबाची प्रतिष्ठा, पत व नाव राखणे, धार्मिक आणि सांस्कृतिक रीतीरिवाजांचे पालन, व्यक्तिगत विकास साधणे इ.
कर्तव्ये करणे व कुटुंबाचे प्रमुखपद सांभाळणे ही कामे त्यांच्याकडे आली. स्त्रियांकडे मात्र पूर्वापार घरकाम, मुलांना जन्म देणे आणि सांभाळणे, शेती व अन्य कामात मदत करणे अशी कामे होती. स्त्रियांची कामे मुख्यतः शरीर पातळीवरची असून त्यांची बुद्धी व विचार यांना संधी मिळण्याची सोय या विभागणीत नाही. वरवर पाहता ही विभागणी न्याय्य व सोयीची वाटली, तरी पुढे त्याला उच्च-नीच असा उतरंडीचा दर्जा प्राप्त झाला.
नरनारी ही व्यवस्था नैसर्गिक आहे मात्र पुरुषप्रधान व्यवस्थेत लिंगभेदभाव ( जेंडर ) मुद्दाम घडवला गेला. संस्कृतीच्या इतिहासाने मर्दुमकी, पराक्रम, सामर्थ्य, धैर्य, निर्भयपणा, बुद्धिमत्ता, धीटपणा या गोष्टी ‘ पुरुषी ’ या अभिधानाला चिकटवल्या. दुबळेपणा, परावलंबित्व, भित्रेपणा, चंचलता, अधीरता, लाजाळूपणा, रडवेपणा, हळवेपणा अशा नकारात्मक प्रतिक्रियेने ‘ बायकी ’ हे अभिधान दाखवण्यात आले. फ्रेंच विचारवंत व कादंबरीकर्त्री सीमॉन द बोव्हारने (१९०८—८६) म्हटल्याप्रमाणे ‘ कोणी बाई म्हणून जन्माला येत नाही पण नंतर तिला बाई बनवली जाते ’ म्हणजे केवळ लिंगवैशिष्ट्यामुळे एखाद्या व्यक्तीवर बाईपणाच्या कल्पना लादल्या जातात. अशा प्रकारच्या विरोधावर उभारलेल्या तत्त्वज्ञानामुळे पुरुषाचा पराक्रम सिद्ध होण्यासाठी स्त्रीला दुबळेपणा स्वीकारावा लागतो. पुरुषाला मोठेपणा, तर स्त्रीकडे कमीपणा पुरुष स्वामी, तर स्त्री दासी पुरुष क्रियाशील, तर स्त्री निष्क्रिय हे संदर्भ समाजातील मूल्यपद्धतींशी जोडले गेल्याने स्त्रीचे अवमूल्यन झाले.
‘पितृसत्ताक पद्धतीतील प्रतिकात्मक व्यवस्थेत जे बाजूला टाकलेजाते, ते म्हणजे स्त्रीत्व ’, असे सुप्रसिद्ध बल्गेरियन-फ्रेंच भाषावैज्ञानिक ज्युलिया क्रिस्तिव ( ज. १९४१) हिला वाटते. पितृसत्ताक पद्धती स्त्रियांना मुख्य प्रवाहातून दोन टोकाच्या भूमिकांकडे लोटते. जिच्याबद्दल समाजाला आदर वाटतो ती देवता, पतिव्रता, सौभाग्यवती व माता या भूमिका, तर दुसऱ्या टोकाला समाजामध्ये ज्यांना किंमत नाही अशा परित्यक्ता, वेश्या, कुमारी माता, विधवा, प्रौढ कुमारिका अशा भूमिका. स्त्री ही माणूस आहे म्हणून व्यक्ती या स्वरूपात तिचा विचार होत नाही, तर स्त्रीच्या पुरुषांशी असलेल्या संबंधांवरून तिची भूमिका ठरते. स्त्रीविषयक सत्याशी या भूमिकांचा संबंध नाही, असे स्त्रीमुक्ती विचारवाद्यांना वाटते.
जगातील कोणत्याच धर्मग्रंथांनी स्त्रीला पुरुषांबरोबरचे स्थान दिलेले नाही. ‘ द हेड ऑफ एव्हरी विमेन इज मॅन ’ ( बायबल ), ‘ न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति। ’ ( मनुस्मृती ) अशी वचने स्त्रीचा दुय्यमपणा व परावलंबित्व दाखवतात. भारतीय परंपरेतील अध्यात्म विचारात स्त्री ही विषयवासनेचे आगर समजली गेली आहे. पुरुषाला संसारातून मुक्त होऊन मोक्षाची साधना करायची असेल, तर स्त्रीसंगाचा त्याग ही पहिली पायरी आहे, म्हणजे मानवकोटीतील म्हणूनही स्त्रीचा विचार अध्याहृत नाही. शेकडो वर्षे याच तुच्छतेच्या भूमिकेतून स्वतःकडे पाहिल्यामुळे स्त्रीजन्म ही पूर्वजन्मीच्या कर्माची फळे आहेत, अशा विचाराने स्त्री स्वतःला तुच्छ लेखू लागतेे. स्वाभिमान, आत्मगौरव, यशस्वी इच्छा, नैपुण्य, आत्मविश्वास, स्वातंत्र्य, स्वावलंबन या माणसाच्या नैसर्गिक इच्छा मारल्यावर माणसाचा जो कोंडमारा होतो, त्याला स्त्री बळी पडली आहे.
स्त्रियांची चळवळ उभी राहिली ती समाजपरंपरेतील स्त्रीप्रतिमा नाकारण्यासाठी. समाजाने दिलेल्या भूमिकांमधील दुटप्पीपणा, पोकळपणा, दांभिकता व स्वार्थ लक्षात येत गेल्यावर स्त्रियांनी त्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला. स्त्रीशिक्षण, अर्थार्जन, करिअरचा विचार या प्रवासात स्त्रीला स्त्री अनेक रूपांत भेटली. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे स्त्री-पुरुषांत येणारा मोकळेपणा, ठराविक कपडे वापरण्याबाबत सैल झालेले निर्बंध, कुटुंब नियोजनाच्या साधनांमुळे संततीची संख्या ठरविण्याचे मिळालेले स्वातंत्र्य, समाजात कामानिमित्त घालवावा लागणारा वेळ, स्वतःच्या स्वातंत्र्याची झालेली जाणीव, आधुनिक राहणीतील सुखसोयी, सैलावलेले कडक धार्मिक रीतीरिवाज इ. अनेक विधायक बदलांमुळे स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याचे आत्मभान व आत्मविश्वास येत गेला. केवळ चूल आणि मूल एवढेच स्त्रीचे कार्यक्षेत्र नाही. घर, लग्न, आईपण इतकेच नव्हे, तर स्वतःचे करिअरही महत्त्वाचे आहे आणि सहकार्य मिळाले, तर संसार सांभाळूनही ते करता येते. स्त्री-पुरुष हे दोघे समान पातळीवर आहेत म्हणून पतीला देव समजणे चूक असा विचार बळावत गेला.
निर्मिती हा स्त्रीच्या आयुष्याचा भाग सोडला, तर मनुष्य म्हणून असलेल्या सर्व क्षमता स्त्रीमध्येही आहेत. ‘ स्त्री म्हणून आम्ही वेगळ्या असलो, तरी आम्ही समपातळीवर आहोत ’, हा काही काळ स्त्री चळवळीचा नारा होता. शारीरिक दुबळेपणा, सौंदर्य इ. गोष्टी संस्कृतीने आरोपित केलेल्या म्हणून त्या वरवरच्या आहेत. पुरुषांइतकीच स्त्रीलाही स्वतःची ओळख पटणे, स्व-विकास, स्वतंत्रता यांची जरूरी आहे. स्वत्वाची ओळख, स्वायत्तता, स्वयंनिर्णय, सक्रिय सहभाग या गोष्टी स्त्रीला व्यक्ती म्हणून परिपक्व बनवतात. ‘ मी कोण ’ या प्रश्नापासून स्त्रीचा ‘ मी मला हवे ते होऊ शकते ’, या आत्मविश्वासाकडे झालेला प्रवास सोपा नाही. या दोन डगरींमधील अंतर मोठे असून ते पार करण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळींना मोठा लढा द्यावा लागला आहे. स्वतःवर होणारे अन्याय समजणे, स्वतःला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाबद्दल असमाधान निर्माण होणे, स्त्रीच्या पारंपरिक भूमिकेला नकार देणे, स्वतःच्या सामर्थ्याबद्दल विश्वास असणे, अन्याया-विरुद्ध आवाज उठविण्याची मानसिक ताकद असणे, समान स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करणे, स्वतःला समाजाच्या मध्यप्रवाहात एक व्यक्ती म्हणून संस्थापित करणे इ. पायऱ्या चढतच स्त्री आत्मनिर्भर होऊ शकते.
स्त्रीमुक्ती विचारसरणीला एक राजकीय दिशा आहे. स्त्रियांना दुय्यमत्व देण्यामागे जे पुरुषी राजकारण आहे, त्याचा बिमोड करणे हे चळवळीचे उद्दिष्ट आहे. शोषणाच्या सर्व प्रवृत्ती पुरुषी आक्रमकतेतून अस्तित्वात आल्यामुळे त्या प्रवृत्तींना छेद देण्याचे काम आव्हानात्मक आहे कारण पुरुषी श्रेष्ठत्वाच्या कल्पना स्त्रियांच्याही मनावर खोलवर रुजलेल्या आहेत. संसारात पतिपत्नी समान असून सर्व निर्णय दोघांच्या संमतीने घेतले जावेत स्त्रीलाही पुरुषाइतकीच लैंगिक भूक आहे स्त्रीचे लैंगिक शोषण हा अपराध आहे लग्न हे तकलादू पायावर उभे असेल, तर ते मोडणे चांगले एकटी स्त्रीसुद्धा समाजात सन्मानाने स्वावलंबी जीवन जगू शकते हे समाजमनावर, विशेषतः स्त्रियांच्या मनावर, बिंबवणे आवश्यक ठरते. कुटुंब, सार्वजनिक संस्था, धर्म-कर्मकांडे,रूढी-परंपरा, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक व राजकीय सन्मानाची पदे, आर्थिक स्वातंत्र्य इ. सर्व स्तरांवर स्त्रीच्या कर्तृत्वाला अवकाश निर्माण करून देणे, हे स्त्रीमुक्ती चळवळीसमोरील मोठे कार्य आहे.
स्त्रीमुक्ती चळवळीपुढील प्रश्न त्या त्या देशातील संस्कृती व जीवनाच्या संदर्भात कमी-अधिक महत्त्वाचे ठरतात. या चळवळीचा उगम प्रथम पाश्चात्त्य देशांत झाला. भारतीय संस्कृती पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा भिन्न असल्याने स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार दोन्ही परिप्रेक्ष्यांतून स्वतंत्रपणे केला आहे.