श्टुटगार्ट

(स्टटगार्ट या पानावरून पुनर्निर्देशित)


स्टुटगार्ट ही जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्याची राजधानी आहे. हे जर्मनीमधले ६ वे सर्वात मोठे शहर आहे. युरोपातील एक महत्त्वाचे ऑद्योगिक केंद्र म्हणून या शहराची गणना होते. वाहन उद्योगाकरता प्रसिद्ध असूनही या शहराच्या आजूबाजूला निसर्गरम्य टेकड्या आहेत. या शहराची लोकसंख्या ५९०४२९ (फेब्रुवारी २००८) इतकी आहे. या शहराला स्वायत्त शहराचा दर्जा आहे. बाडेन-व्युर्टेनबर्ग या राज्याची राजधानी असल्याने येथे राज्याचे विधान भवन आहे.

स्टुटगार्ट
Stuttgart
जर्मनीमधील शहर


चिन्ह
स्टुटगार्ट is located in जर्मनी
स्टुटगार्ट
स्टुटगार्ट
स्टुटगार्टचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 48°46′43″N 9°10′46″E / 48.77861°N 9.17944°E / 48.77861; 9.17944

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बाडेन-व्युर्टेंबर्ग
क्षेत्रफळ २०७ चौ. किमी (८० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८०४ फूट (२४५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,००,०३८
  - घनता २,८९४ /चौ. किमी (७,५०० /चौ. मैल)
http://www.stuttgart.de

प्रोटेस्टंट तसेच कॅथोलिक ख्रिश्चन धर्मांची प्रमुख चर्चे येथे बघायला मिळतात.

युरोपातील इतर प्रमुख शहरांशी दळणवळण वाढवण्याकरता शहराने 'स्टुटगार्ट २१' या प्रकल्पाखाली 'दास न्यॉय हेर्झ युरोपास' (अनुवादः युरोपाचे नवे हृदय) असे नवे नाव धारण केले आहे.

मर्सेडिज बेंझ या जगप्रसिद्ध स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनी डायमलर आ. गे.चे संस्थापक श्री गोटलिब डाइमलर यांनी जगातील सर्वात स्वयंचलित वाहन याच शहरात बनवले. सध्याचे डायमलर कंपनीचे मुख्यालय व पोर्शे या अतिजलद स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनीचे मुख्यालय स्टुटगार्टमध्ये आहे. तसेच बाँश, बेहेर, माह्-ले, या वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यादेखील याच शहरात सुरू झाल्या. या प्रमुख उद्योगसमूहांच्या मुख्यालयांबरोबर त्यांचे उत्पादन करणारे कारखाने या शहराची शान वाढवतात.

शहराचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून ज्ञात आहे. मध्ययुगातील रोमन सम्राट ओटो याची घोड्यांची मोठी पागा या शहरात होती. त्यामुळे याचे नाव स्टुटगार्ट (स्वैर अनुवादः घोड्यांची पागा) असे पडले. हा प्रदेश जर्मनीमधे 'श्वाबिश' प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर्मन भाषेप्रमाणेच येथील स्थानिक लोक 'श्वेबिश' ही बोली भाषा बोलतात.

भौगोलिक

संपादन

स्टुटगार्ट शहर हे नेकार नदीच्या किनारी वसले असून ब्लॅक फॉरेस्ट व स्वेबियन आल्प्स या दोन प्रमुख डोंगर रांगाच्या मधोमध आहे. त्यामुळे शहराचा बहुतेक भाग उंचसखल आहे, शहराची समुद्रसपाटीपासूनची कमीत कमी उंची .... मीटर व जास्तीतजास्त उंची ... मीटर आहे. मुख्य शहर डोंगर पायथ्याशी असून शहराचे बहुतेक उपभाग डोंगरमाथ्यावर आहेत. डोंगरभागातील घनदाट वृक्षराजी व डोंगरउतारावरचे द्राक्षाचे मळे हे येथील वैशिष्ट्य आहे.

हवामान

संपादन

स्टुटगार्टचे हवामान हे सर्वसाधारणपणे पश्चिम युरोपीय हवामान प्रकारात मोडते. एका वर्षात साधारण पणे ४ ऋतू अनुभवायला मिळतात. मार्च ते साधारणपणे मे मध्यापर्यंत वसंत (frühling) बहारात असतो. वर्षातील सर्वोत्तम हवामान या दिवसात अनुभवायला मिळते. अचानक बदलणारे निर्सगाचे रूप हे िथले वैशिष्ट्य. सर्वत्र झाडावर फुलणारी पालवी व जमीनीवर आच्छादलेले फुलांचे गालिचे मन मोहून घेतात.

मे मध्यापासून साधारणपणे आॅगस्टपर्यंत येथील मानाप्रमाणे सौम्य उन्हाळा असतो. तापमान जास्ततजास्त ३२ ते ३३ अंश से पर्यंत चढते. या काळात दिवस अतिशय मोठा म्हणजे साधारणपणे १६ ते १८ तासापर्यंत असतो.

सप्टेंबर ते साधारणपणे नोव्हेंबर हा पानगळीचा (herbst) ऋतू असतो. सुरुवातीला झाडांच्या पानांचा रंग बदलतो. व कालांतराने पाने पूर्णपणे पिकून गळून पडतात. प्रत्येक झाडावरील पानांची छटा वेगवेगळी असते, त्यामुळे झाडावरील विविध रंग मन मोहून घेतात. सरासरी तापमान या दिवसात कमी व्हायला सुरुवात होते व कडक थंडीची चाहुल लागते.

डिंसेबरपासून फेब्रुवारीपर्यंत कडक हिवाळा असतो. किमान तापमान साधारणपणे -५ ते -७ अंश सेल्शियसपर्यंत कमी जाऊ शकते. या दिवसात कमाल तापमान ३ ते ४ अंश सेल्शियस असते त्यामुळे दिवसा देखील कडक थंडीचा अनुभव घेता येतो. तापमान अतिशय कमी असल्यास येथील तळि गोठतात. या दिवसात नियमितपणे बर्फवृष्टी होत रहाते. २००६-२००७ मध्ये केवळ दोनदाच बर्फवृष्टी झाल्याने येथील लोक नारज झाले होते.

सार्वजनिक वाहतूक

संपादन
 
श्टुटगार्ट ऊ बान

सार्वजनिक वाहतूकीचा अंत्यंत उत्कृष्ट नमुना म्हणून स्टुटगार्टकडे पाहिले जाते. शहरातील वाहतूक मुख्यत्वे तीन प्रकारे होते.

१. एस बान :- शहर व लांबची उपनगरे यांना जोडणारी ही रेल्वेसेवा आहे. लांब अंतरे लवकर काटण्यासाठी लोक याचा उपयोग करतात. मुख्य शहरातून जाताना ही रेल्वे प्रामुख्याने जमिनीखालून जाते.

२. ऊ बान :- शहरातील विविध भागांना लोहमार्गाने जोडणारी ही रेल्वेसेवा आहे. छोट्या अंतरांसाठी या सेवेचा वापर होतो.

३. बस :- शहराचा प्रमुख भाग हा डोंगराळ असल्याने सर्वच भाग लोहमार्गाने जोडणे शक्य नाही त्यामुळे दुर्गम भागात बसचा चांगला पर्याय उपलब्ध आहे.

येथील सार्वजनिक वाहतूक ही अतिशय सुनियोजित व वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहे. येथील बसेस व ऊ बान रेल्वेगाड्या खूपच आरामदायक असून अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आहेत.

स्टुटगार्ट हे शहर जर्मनीमधल्या व युरोपमधल्या सर्व प्रमुख शहरांशी रस्तेमार्ग, लोहमार्ग आणि हवाईमार्गांनी जोडलेले आहे.

जर्मनीमधले जगप्रसिद्ध ठिकाण 'ऑटोबान'ही या शहराशी जोडलेले आहेत (ए-८, ए-८१ आणि ए-८३१).

जर्मनीच्या राष्ट्रीय रेल्वेसेवेप्रमाणेच फ्रान्सच्या टी.जी.व्ही. सारख्या रेल्वेसेवाही येथे उपलब्ध आहेत. पॅरिसस्ट्रासबुर्ग (फ्रान्स), बासेल (स्विट्झर्लंड), व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), यांसारख्या युरोपातील इतर मोठ्या शहरांशी स्टुटगार्ट थेट जोडलेले आहे.

अर्थव्यवस्था

संपादन

स्टुटगार्ट हे दक्षिण जर्मनीमधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. जवळपास १,५०,००० लहान-मोठे कारखाने या शहरात अथवा या शहराच्या आसपासच्या हद्दीत आहेत. विविध जगप्रसिद्ध कंपन्यांची प्रमुख कार्यालये या शहरात आहेत. डायमलर, बॉस्च, पोर्शे यांची तर ही जन्मभूमीच आहे. त्याचप्रमाणे आय.बी.एम., हेल्वेट अँड पिकार्ड यांसारख्या संगणक क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांची कार्यालयेही याच शहरात आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की पोर्शे या अतिजलद चारचाकी गाड्यांवर असणारे बोधचिन्ह याच शहराच्या बोधचिन्हावरून घेतले आहे. जागतिक वाहनउद्योगात ही एक अतिशय विशॆष गोष्ट आहे.

स्टुटगार्ट हे शहर येथील ऊच्च-तंत्रज्ञावर आधारलेल्या उद्योंगासाठी प्रसिद्ध आहे. शहर आणि आजूबाजूला असलेल्या शैक्षणिक क्षेत्राचा यामधे मोठा वाटा आहे. स्टुटगार्ट विद्यापीठ, होहेनहाईम विद्यापीठ आणि स्टुटगार्ट तंत्रनिकेतन या प्रमुख शैक्षणिक संस्थांबरोबरच फ्राऊनहोफर, मॅक्स प्लँक यांसारख्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या संशोधन क्षेत्रातल्या संस्थाही भक्कम औद्योगिक वाढीस हातभार लावतात.

शैक्षणिक

संपादन

बाडेन व्युर्टेनबर्ग राज्य हे क्षैक्षणिकदृष्टया अतिशय पुढारलेले राज्य आहे. जर्मनीतील ९ मुख्य विद्यापीठांतील ३ प्रमुख विद्यापीठे या एकट्या राज्यात आहेत. ९ पैकी मुख्य विद्यापीठ असलेले स्टुटगार्ट विद्यापीठ या शहरात आहे. होहेनहाईम विद्यापीठ व एसलिंगेन विद्यापीठ यांसारख्या दर्जेदार शिक्षणसंस्था या राज्यात आहेत.

क्रीडा

संपादन

जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. फाउ.एफ.बे स्टुटगार्ट (VFB Stuttgart) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील अव्वल साखळी स्पर्धेमधे भाग घेतो. ५ वेळा राष्ट्रीय विजेत्या ठरलेल्या या संघाचे प्रमुख कार्यालय बाड-कान्स्टाट या उपनगरामधल्या गोटलिब डायमलर स्टेडियममध्ये आहे.२००७ बुन्डेसलिगाचे विजेतेपद या संघाने पटकावले होते

फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९९३ साली जागतिक मैदानी स्पर्धा या शहरात झाल्या होत्या. २००६ मध्ये जर्मनीमधे झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधले ६ सामने या शहरात झाले होते. सन २००७मधे या शहराने युरोपच्या क्रीडा राजधानीचा मान मिळवला होता.

वायसेनहोफ येथे 'मर्सेडिस कप टेनिस स्पर्धा' भरवली जाते. त्याचप्रमाणे 'पोर्श अरेना' या क्रीडासंकुलात टेनिस, बास्केटबॉल आणि हँडबॉल हे क्रीडाप्रकार खेळले जातात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

संग्रहालये

  • विल्हेमा- प्राणी संग्रहालय
  • मर्सेडिज बेंझ संग्रहालय
  • पोर्शे संग्रहालय
  • स्टाट्स गॅलेरी

टी.व्ही मनोरा- स्टुटगार्ट शहरातल्या कोणत्याहि भागातून दृष्टीस पडतो. या मनोऱ्यावरून स्टुटगार्ट व परिसराचे विहंगम दृष्य दिसते.

राजवाडे

  • लुडविग्सबर्ग- स्टुटगार्टपासून २० किमी अंतरावर लुडविग्सबर्ग या गावात हा पाहाण्याजोगा राजवाडा आहे.
  • सॉलिट्युड- स्टुटगार्टजवळील डोंगरावर घनदाट झाडीमध्ये हा राजवाडा आहे.

प्रसिद्ध व्यक्ति

संपादन
  • गोटलिब डाइमलर- मर्सेडिज बेंझबनवणाऱ्या कंपनीचा ( डायमलर आ. गे.) आद्य संस्थापक, पहिल्या मोटरकारची निर्मीति.
  • गेओर्ग विल्हेल्म फ्रेडरिश हेगल - १९व्या शतकामधील तत्त्वज्ञ
  • विल्हेल्म मायबाख- पहिल्या मोटरकारचा निर्माता, गोटलिब डायमलर यांच्या बरोबरीने काम
  • रोबर्ट बॉश- बॉश कंपनीचे आद्य संस्थापक
  • फर्डिनांड पोर्शे- पोर्शे कंपनीचे आद्य संस्थापक
  • ज्युर्गन किल्न्समन- जर्मनीच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार व प्रशिक्षक
  • थिओडोर ह्यूस- दुसऱ्या महायुद्धानंतरचे जर्मनीचे पहिले राष्ट्र्प्र्मुख

चित्रदालन

संपादन

[ चित्र हवे ]

संदर्भ

संपादन