सृष्टिज्ञान हे ‘विज्ञान’ या एकाच विषयाला वाहिलेले मराठी साहित्यातील एक मासिक आहे. हे मासिक अखंडितपणे सातत्याने प्रसिद्ध होत आहे. विज्ञानाच्या शाखा-उपशाखांतील माहिती सुबोध, सोप्या मराठी भाषेतून देण्याचे कार्य सृष्टिज्ञान मासिकाने केले आहे. भारतातील उद्योगधंदे, नवे शोध, मनोरंजक शास्त्रीय प्रयोग, शास्त्रज्ञांची चरित्रे, वैज्ञानिक छंद, दैनंदिन व्यवहारातले विज्ञान, बुद्धीला खाद्य पुरविणारे कूट प्रश्न, जिज्ञासा, हे कसे घडते, टपाल तिकिटातून विज्ञान, गणिताच्या गंमती अशा अनेक रंजक लेखन प्रकारातून विज्ञानविषयक माहिती नियमितपणे देत आहे. ९१ वर्षांच्या काळात ‘सृष्टिज्ञान या मासिकाने सुमारे ३७ हजार पृष्ठांचा विज्ञानविषयक उपयुक्त माहितीपूर्ण वाचनीय मजकूर प्रकाशित केला आहे.

सृष्टिज्ञान
प्रकार मासिक
विषय विज्ञान
भाषा मराठी
माजी संपादक प्रा. गो. रा. परांजपे
प्रकाशक सोसायटी फॉर दि प्रमोशन ऑफ सायंटिफिक नॉलेज, श्री. शं. ब. सहस्रबुद्धे, आर्यभूषण समाज, महात्मा फुले वस्तु संग्रहालय
पहिला अंक १ जानेवारी १९२८
देश भारत
मुख्यालय पुणे

स्थापना संपादन

सर्वसामान्यांपर्यंत या वैज्ञानिक शोधांची माहिती पोहोचवली पाहिजे या विचाराने प्रा. गो. रा. परांजपे यांनी सोसायटी फॉर दि प्रमोशन ऑफ सायंटिफिक नॉलेज या संस्थेमार्फत सृष्टिज्ञान हे मासिक प्रकाशित करावयास सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी वैज्ञानिक विषयांवर व्याख्याने आयोजित केली होती परंतु श्रोत्यांनी ही माहिती लिखित स्वरूपात द्यावी म्हणजे संग्रही राहील असे मत मांडल्याने त्यांनी मासिक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

दिनांक १ जानेवारी इ.स. १९२८ रोजी सृष्टिज्ञानचा पहिला अंक पुणे येथे प्रकाशित झाला. हा अंक क्राऊन साईजचा होता. त्यात ३२ पाने होती. या अंकाच्या मुखपृष्ठावर पौर्णिमेच्या चांदण्यात वाहणाऱ्या झऱ्याचे चित्र आहे. तसेच पहिल्या पानावर सीहॉर्स या माशाचे तीनरंगी चित्र आहे. या अंकासाठी प्रा. गो. रा. परांजपे यांनी संपादकीय लिहिले होते. आणि यात डॉ. दि. धों. कर्वे लिखित ‘कृत्रिम रंग’, डॉ. भा. ग. वाड लिखित ‘लुई पाश्चर’ हे लेख आहेत. इतर मजकुरांत ‘नेपच्यूनचा शोध’, रासायनिक गप्पा-टप्पा वगैरे लेखांचा समावेश आहे. हे लेख सोप्या, सुबोध भाषेत लिहिलेले आहेत.

या मासिकाचे काम आर्थिकदृष्ट्या तोट्याचे असल्याने आर्यभूषण समाजाने ते जानेवारी इ.स. १९३३ मध्ये चालवायला घेतले. बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात आर्यभूषण मुद्रणालयाने ‘सृष्टिज्ञान’चे मुद्रण, प्रकाशन, वितरण या जबाबदाऱ्या सांभाळल्या. तोटा सोसून हे मासिक डिसेंबर इ.स. १९७४ चालवले.

जानेवारी इ.स. १९७५ पासून पुढे ‘सृष्टिज्ञान’ मासिक मासिक महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाखाली प्रकाशनात खंड न पडता सुरू राहिले आहे.

स्वरूप संपादन

इ.स. १९६० पर्यंत ‘सृष्टिज्ञान’चा आकार लहान क्राऊन (५ इंच x ७ इंच) होता. पुढे हा आकार बदलून क्राऊन अष्टपत्री (७। इंच x ९।। इंच) असा मोठा करण्यात आला. मुखपृष्ठावर कधी एक रंगी, कधी दुरंगी तर कधी बहुरंगी अशी चित्रे दिसून येतात. सृष्टिज्ञान'ने मराठीतून विज्ञान कथा लेखनास चालना मिळावी म्हणून मोठे प्रोत्साहन दिले. अनेक दिवाळी अंकात विज्ञानकथा प्रसिद्ध करण्याची प्रायोगिकता दाखवली आहे.

संपादक संपादन

प्रा. गो. रा. परांजपे यांनी 'सृष्टिज्ञान'च्या एका अंकात त्यांचे लेखन विषयक मत नोंदवले आहे, 'विज्ञानावरील लेखात अचूकता हवी, आधुनिकता हवी, प्रुफे पुन्हा पुन्हा तपासली पाहिजेत, संपादकाला विविध विषयांची माहिती हवी, वेळप्रसंगी स्वतः लिहायची तयारी हवी.'

‘सृष्टिज्ञान’च्या आजपर्यंतच्या वाटचालीत संपादक मंडळात सदस्य म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती

  • प्रा. गो. रा. परांजपे
  • डॉ. वि. ना. भाजेकर
  • प्रा. श्री. ल. आजरेकर
  • डॉ. दि. धों. कर्वे
  • डॉ. स. बा. हुदलीकर
  • प्रा. प्र. रा. आवटी
  • डॉ. कृ. श्री. म्हसकर
  • डॉ. वि. ना. गोखले
  • श्री. शं. ब. सहस्रबुद्धे
  • श्री. ग. म. वीरकर
  • प्रा. क. वा. केळकर
  • प्रा. मो. ल. चंद्रात्रे
  • डॉ. मो. वा. चिपळूणकर
  • डॉ. त्र्यं. शं. महाबळ
  • डॉ. गो. रा. केळकर
  • प्रा. ना. ह. फडके
  • डॉ. श्री. द. लिमये
  • श्री. आ. मा. लेले
  • प्रा. भा. वा. केळकर
  • प्रा. प्र. वि. सोवनी
  • श्री. मो. ना. गोखले
  • डॉ. अ. ब. सप्रे
  • प्रा. य. बा. राजे
  • श्री. निरंजन घाटे
  • श्री. गो. बा. सरदेसाई
  • डॉ. कृ. वि. दिवेकर
  • डॉ. वा. द. वर्तक
  • डॉ. र. द. भिडे
  • श्री. अ. स. जोशी
  • डॉ. क. कृ. क्षीरसागर
  • डॉ. अनिल महाबळ
  • श्री. श्री. वि. केळकर
  • श्री. अ. ल. देशमुख
  • डॉ. म. वि. पानसे
  • श्री. वि. केळकर

संपर्क संपादन

हे मासिक वार्षिक वर्गणी भरून वाचकांना मिळू शकते. त्यासाठी संपादक, 'सृष्टिज्ञान', महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, घोले रस्ता, पुणे ४११ ००४. फोन क्र. ९१-२०-२५५३२७५० येथे संपर्क साधता येतो.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन