किर्लोस्कर हे मराठी भाषेतील एक नियतकालिक आहे. हे नियतकालिक दरमहा प्रकाशित होते. इ.स. १९२० साली शंकर वासुदेव किर्लोस्कर (शंवाकि) यांनी या नियतकालिकाची सुरुवात केली[१]. १९२१ ते १९२८ किर्लोस्कर खबर या मासिकाच्या प्रारंभीच्या काळात काळात सहसंपादक म्हणून नारायण हरी आपटे यांनी काम केले आहे. (संदर्भ: किर्लोस्करीय. लेखक: मंगेश कश्यप. प्रकाशक: नंदिनी पब्लिशिंग हाऊस). शंवाकि निवृत्त झाल्यावर मुकुंदराव किर्लोस्कर हे किर्लोस्कर मासिकाचे संपादक झाले.

किर्लोस्कर
प्रकार मासिक
भाषा मराठी
माजी संपादक शंकर वासुदेव किर्लोस्कर
स्थापना इ.स. १९२०
पहिला अंक इ.स. १९२०
देश भारत

सुरुवात संपादन

किर्लोस्करवाडीच्या किर्लोस्कर कारखान्यात निर्मिल्या जाणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या उद्देशाने किर्लोस्कर मासिकाची सुरुवात झाली. इ.स. १९२० च्या सुमारास किर्लोस्कर कारखान्याच्या जाहिरात व विपणनाची सूत्रे शंकर वासुदेव किर्लोस्कर सांभाळत होते. तेव्हा अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या फोर्ड उद्योगसमूहाच्या फोर्ड टाइम्स वृत्तपत्रिकेवरून किर्लोस्करांना आपल्या कारखान्याची वृत्तपत्रिका काढण्याची कल्पना स्फुरली[१]. वृत्तपत्रिकेच्या छपाईसाठी किर्लोस्करांनी हॅंडप्रेस छपाईयंत्र घेतले. इ.स. १९२० साली किर्लोस्कर खबर अश्या नावाने या वृत्तपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाला. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते.

विनायक दामोदर सावरकर यांनी इ.स. १९२९ साली किर्लोस्कर कारखान्यास भेट दिली, तेव्हा किर्लोस्कर खबर पत्रिकेचा अंक त्यांच्या पाहण्यात आला. त्यातील खबर हा फारसी शब्द सावरकरांना खटकला. त्यांनी किर्लोस्करांना केलेल्या सूचनेनुसार खबर हा शब्द पत्रिकेच्या नावातून वगळण्यात आला आणि या नियतकालिकाचे नाव किर्लोस्कर असे ठेवण्यात आले[१].

वाटचाल संपादन

स्थापनेनंतर किर्लोस्कर नियतकालिकाचा विस्तार वाढत गेला. विनायक दामोदर सावरकर, विष्णू सखाराम खांडेकर, नारायण सीताराम फडके, पु.ग. सहस्रबुद्धे, श्रीधर व्यंकटेश केतकर, चिंतामण विनायक जोशी, ना.धों. ताम्हणकर, बाळूताई खरे, मालतीबाई दांडेकर इत्यादी साहित्यिकांचे साहित्य किर्लोस्कर नियतकालिकातून छापून आले. बाबूराव पेंटर, प्र.ग. सिरूर, महादेव विश्वनाथ धुरंधर, ग.ना. जाधव यांसारख्या ख्यातनाम चित्रकारांनी या नियतकालिकासाठी मुखपृष्ठे रंगवली.

जून, इ.स. १९५९मध्ये किर्लोस्कर नियतकालिकाचे कार्यालय किर्लोस्करवाडीहून पुण्यास हलले.

संदर्भ संपादन

  1. ^ a b c राजाध्यक्ष,मं.गो. "शंवाकिचे किर्लोस्कर[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २२ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)