सरला देवी चौधरी (जन्म: सरला घोषाल; ९ सप्टेंबर १८७२ - १८ ऑगस्ट १९४५) या भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी १९१० मध्ये अलाहाबाद येथे भारत स्त्री महामंडळाची स्थापना केली. ही भारतातील राष्ट्रीय स्तरावरील पहिली महिला संघटना होती. [] संस्थेच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे. संपूर्ण भारतातील महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी या संस्थेने लाहोर (तेव्हा अविभाजित भारताचा भाग), अलाहाबाद, दिल्ली, कराची, अमृतसर, हैदराबाद, कानपूर, बांकुरा, हजारीबाग, मिदनापूर आणि कोलकाता येथे अनेक कार्यालये उघडली.

सरला देवी चौधरानी
सरला देवी चौधरानी
जन्म सरला घोषाल
०९ सप्टेंबर १८७२
कोलकाता
मृत्यू १८ ऑगस्ट १९४५
कोलकाता
निवासस्थान कोलकोता
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एम.ए. (मराठी), एम.एड, पीएच.डी.
पेशा शिक्षणतज्ज्ञ, चळवळीतील कार्यकर्ती
जोडीदार रामभुज दत्त चौधरी
अपत्ये दीपक
वडील जानकीनाथ घोषाल
आई स्वर्णकुमारी देवी
नातेवाईक

देवेंद्रनाथ टागोर (आजोबा)

रवींद्रनाथ टागोर (मामा)


चरित्र

संपादन

प्रारंभिक जीवन

संपादन

सरला यांचा जन्म जोरासांको, कोलकाता येथे ९ सप्टेंबर १८७२ रोजी एका प्रसिद्ध बंगाली विचारवंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील जानकीनाथ घोषाल बंगाल काँग्रेसच्या पहिल्या सचिवांपैकी एक होते.

सरला यांची आई स्वर्णकुमारी देवी, या बंगाली भाषेतील प्रख्यात लेखिका होत्या. एक प्रख्यात ब्राह्मो नेते देबेंद्रनाथ टागोर हे स्वर्णकुमारी देवी यांचे वडील होते. कवी रवींद्रनाथ टागोर हे त्यांचे बंधू होते.

सरला देवी यांचे कुटुंब ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते, हा समाज राम मोहन रॉय यांनी स्थापन केला आणि नंतर सरलाचे आजोबा देबेंद्रनाथ टागोर यांनी विकसित केला.

१८९० मध्ये, सरला देवी यांनी बेथून कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात बी.ए. पदवी संपादन केली. बी.ए. परीक्षेत सर्वोच्च महिला उमेदवार म्हणून त्यांना महाविद्यालयाचे पहिले पद्मावती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. []

त्या काळात फारच कमी महिला भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी एक सरला देवी होत्या.

कारकीर्द

संपादन

शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरला म्हैसूर राज्यात गेल्या आणि महाराणी कन्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. एका वर्षानंतर, त्या पुन्हा आपल्या गावी परतल्या आणि त्यांनी 'भारती' या बंगाली नियतकालिकासाठी लिहायला सुरुवात केली आणि त्यांच्या राजकीय हालचालींनाही सुरुवात केली.

१८९५ ते १८९९ पर्यंत, त्यांनी आपल्या आई आणि बहिणीसह संयुक्तपणे 'भारती'चे संपादन केले, आणि नंतर १८९९ ते १९०७ पर्यंत, देशभक्तीचा प्रचार आणि भारतीचा साहित्यिक दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतःहून भारतीचे संपादन केले.

महिलांनी उत्पादित केलेल्या देशी हस्तकलेच्या वस्तुंना मागणी यावी या हेतुने त्यांनी १९०४ मध्ये, कोलकाता येथे लक्ष्मी भंडार (महिला स्टोअर) सुरू केले. १९१० मध्ये, त्यांनी 'भारत स्त्री महामंडळ' (अखिल भारतीय महिला संघटना) ची स्थापना केली, ही महिलांसाठी असलेली पहिली अखिल भारतीय संघटना आहे असे अनेक इतिहासकार मानतात.[] महिलांच्या वर्ग, जात आणि धर्माचा विचार न करता महिलांच्या शिक्षणाला आणि व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिले. या संघटनेच्या भारतात अनेक शाखा आहेत. []

वैयक्तिक जीवन

संपादन

१९०५ मध्ये, सरला देवी यांनी रामभुज दत्त चौधरी (१८६६-१९२३) यांच्याशी विवाह केला. ते वकील, पत्रकार, राष्ट्रवादी नेता म्हणून सुपरिचित होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचे अनुयायी होते. लग्नानंतर त्या पंजाबला राहायला गेल्या. तेथे त्यांनी आपल्या पतीला राष्ट्रवादी उर्दू साप्ताहिक 'हिंदुस्थान'चे संपादन करण्यास मदत केली, त्याचे नंतर इंग्रजी नियतकालिकात रूपांतर झाले.

सरला देवी आणि महात्मा गांधी

संपादन

त्यांच्या पतीला असहकार चळवळीत सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली तेव्हा महात्मा गांधी लाहोरमध्ये त्यांच्या घरी भेटायला गेले होते. गांधींनी त्यांच्या भाषणांमध्ये आणि यंग इंडिया आणि इतर जर्नल्समध्येसरला देवी यांच्या कविता आणि लेखन उद्धृत केले. फेब्रुवारी १९२० मध्ये, 'यंग इंडिया'ने सरला देवी यांच्या 'लाहोर पर्दाह क्लब'च्या सदस्यत्वाशी संबंधित अनेक पत्रे प्रकाशित केली. [] सरला यांना लिहिलेल्या एका पत्रात गांधींनी लिहिले होते, ''पंडितजी तुम्हाला भारताची महान शक्ती म्हणतात यात आश्चर्य नाही.'' [] सरला देवी यांचा एकुलता एक मुलगा दिपक याने गांधीजींची नात राधा हिच्याशी लग्न केले होते.

सरला देवी आणि श्रीअरविंद घोष

संपादन

१९२० साली सरला देवी श्रीअरविंद घोष यांना भेटायला आल्या होत्या. त्यांच्या भेटीदरम्यान झालेली बातचीत 'इव्हनिंग टॉक्स विथ श्रीअरबिंदो' या पुस्तकात ग्रथित करण्यात आली आहे.[] या भेटीदरम्यान, सरला देवी यांच्यासमोर श्री.नोलिनी कांत गुप्ता यांना लाठी-काठीचा प्रयोग करून दाखविण्यास सांगण्यात आले होते, अशी आठवण ते सांगतात.[]

सरला देवी आणि महाराष्ट्र

संपादन

१८९७ च्या सुमारास सरला देवी यांनी महाराष्ट्रात पाहिल्याप्रमाणे बंगालमध्ये शारीरिक प्रशिक्षण चळवळ आयोजित करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी एक व्यायामशाळा स्थापन केली आणि सदस्यांना तलवार आणि लाठी खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी गोव्यातील एका प्रसिद्ध जिम्नॅस्टची नियुक्ती केली. तथापि, सरला देवी यांच्यासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षणाचा उद्देश शारीरिक शक्ती विकसित करणे हा होता.[]

महाराष्ट्रातील शिवजयंती उत्सवाचे अनुकरण करून, सरला देवी यांनी 'प्रतापदित्या'च्या स्मरणार्थ उत्सव सुरू केला. राष्ट्रीय भावना जागृत करणे आणि बंगालच्या राष्ट्रीय शक्तीचे पुनरुज्जीवन करणे हा त्यांचा उद्देश होता. []

नंतरचे आयुष्य

संपादन

१९२३ मध्ये पतीच्या निधनानंतर, सरला देवी कोलकाता येथे परतल्या आणि १९२४ ते १९२६ या काळात त्यांनी 'भारती'च्या संपादनाची जबाबदारी पुन्हा सुरू केली. त्यांनी १९३० मध्ये कोलकाता येथे 'शिक्षा सदन' या नावाने मुलींची शाळा स्थापन केली. त्यांनी १९३६ मध्ये सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली. आणि बिजॉय कृष्ण गोस्वामी, गौडीय वैष्णव, या आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू केली.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.

आत्मचरित्र

संपादन

त्यांचे 'जीवनेर झारा पाटा' हे आत्मचरित्र १९४२-४३ मध्ये, देश या बंगाली मासिकात मालिका रूपाने प्रकाशित झाले. त्याचे नंतर सिक्ता बॅनर्जी यांनी 'द स्कॅटर्ड लीव्हज ऑफ माय लाइफ' या नावाने (२०११) इंग्रजीत भाषांतर केले. [१०]

संदर्भ

संपादन
  1. ^ Mohapatra, Padmalaya (2002). Elite Women of India (इंग्रजी भाषेत). APH Publishing. ISBN 978-81-7648-339-1.
  2. ^ "Bethune College - Banglapedia". Banglapedia. 13 October 2020 रोजी पाहिले.
  3. ^ Majumdar, Rochona (2002). ""Self-Sacrifice" versus "Self-Interest": A Non-Historicist Reading of the History of Women's Rights in India". Comparative Studies of South Asia, Africa and the Middle East. Duke University Press.
  4. ^ Ray, Bharati. "Chaudhurani, Sarala Devi". Oxford Dictionary of National Biography (online ed.). Oxford University Press. doi:10.1093/ref:odnb/94958.
  5. ^ Guha, Ramchandra (2018). Gandhi: The Years That Changed the World. Penguin Allen Lane. p. 110. ISBN 978-0670083886.
  6. ^ Guha, Ramchandra (2018). Gandhi: The Years That Changed the World. Penguin Allen Lane. p. 117. ISBN 978-0670083886.
  7. ^ A.B.Purani (1959). Evening Talks with Sri Aurobindo. Pondicherry: Sri Aurobindo Society. pp. 24–25. ISBN 81-7060-093-6.
  8. ^ Nolini Kanta Gupta and K.Amrita (1969). Reminiscences. Pondicherry: Mother India, Sri Aurobindo Ashram. p. 02.
  9. ^ a b "Personalia / Sarala Devi Ghosal (Chaudhurani)". sri-aurobindo.co.in. 2023-04-07 रोजी पाहिले.
  10. ^ Mookerjea-Leonard, Debali (2017). Literature, Gender, and the Trauma of Partition: The Paradox of Independence. New York: Taylor & Francis. p. 188. ISBN 978-1-317-29389-7.

अधिक वाचन

संपादन

बाह्य दुवे

संपादन