विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०११
खंडोबा हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा,बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र ; चतुर्भुज; कपाळाला भंडारा असे रूप असते.
एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुस-या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.
कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तण्ड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.
जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. याशिवाय रगडा भरीत आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात. खंडोबाचे उपासक सर्व जातींमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने अनेक नवस केले जातात नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.