खंडा

(खड्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

खंडा, अर्थात खड्ग, हे भारतीय उपखंडातील हे दुधारी, सरळसोट पात्याचे शस्त्र आहे. ऐतिहासिक काळापासून प्रचलित असलेले हे शस्त्र अनेक ऐतिहासिक भारतीय राज्या-साम्राज्यांनी, तसेच आधुनिक इतिहासकाळातील राजपूत, मराठे, जाट, शीख इत्यादी लढाऊ जमातींनी सातत्याने वापरले आहे.

राजपूत बनावटीचा खंडा

याचे पाते रुंद असून शस्त्राच्या मुठीपासून टोकाकडे पाते काहीसे रुंदावत जाते. पात्याचे टोक अग्राकडे एकदम वळून संपते. याच्या मुठीच्या बुडापासून एक मोठा काटा पात्याच्या विरुद्ध दिशेने फुटतो. जगभरात अन्यत्र आढळणारी सरळ पात्याची खड्गे प्रामुख्याने अग्राद्वारे भोसकण्यासाठी वापरतात; मात्र खंड्याचा मुख्यत्वेकरून वापर पात्याच्या धारदार कडांनी लक्ष्यास खांडण्यासाठी केला जातो.

प्राचीन किंवा ऐतिहासिक कथानकांवर आधारिक नाटका-खेळांमध्ये खंडा व तत्सदृश सरळ पात्याची खड्गे गतकाळाचे चित्र उभे करण्यासाठी आजही दाखवली जातात. महाराष्ट्रात खंडोबाच्या व साधारणपणे भारतभरात कालीच्या मूर्ती हातात खंडा घेऊन उभ्या असलेल्या दिसतात. शंकराचे शस्त्र म्हणून राजपुतांमध्ये खंड्यास वंद्य मानले जाते.