विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २०१४
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे.
हा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. तसेच जून २००८ मध्ये नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी अकाराचे असून ते साउथ पोल - ऐटकेन बेसिन या सद्ध्याच्या ज्ञात सर्वांत मोठ्या विवरापेक्षा चारपट मोठे आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.
१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळायान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरिक्षण करतांना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडद पट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले. तसेच मंगळावरील काही निमूळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता. नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ दृष्टीभ्रमामुळे ते दिसतात असे स्पष्टिकरण देण्यात आले. पण तरीही, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. सध्या मंगळाभोवती तीन कृत्रिम उपग्रह परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे मार्स ओडेसी, मार्स एक्सप्रेस व मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर होत. पथ्वी वगळता इतर ग्रहांमध्ये हा आकडा मंगळासाठी सर्वांत जास्त आहे. तसेच मंगळाच्या पृष्ठभागावर स्पिरिट व ऑपॉर्च्युनिटी ही दोन कार्यरत स्वयंचलित परीक्षण याने (रोव्हर)[मराठी शब्द सुचवा] व अनेक मृत यशस्वी तसेच अयशस्वी रोव्हर व लॅंडर[मराठी शब्द सुचवा] आहेत. फीनिक्स या यानाने नुकतीच मंगळाच्या पृष्ठभागावरील आपली मोहीम पूर्ण केली. या यानांनी जमा केलेले भूशास्त्रीय पुरावे असे सुचवितात की मंगळावर पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि केवळ एका दशकापूर्वी छोट्या गरम पाण्याच्या फवार्यांच्या स्वरूपात पाणी अस्तित्वात होते. नासाच्या मार्स ग्लोबल सर्व्हेयरने केलेल्या निरिक्षणांतून मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फ कमी होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
हा ग्रह लालसर तांबडा रंगाचा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जिवंत आहेत. ऑलिम्पस मॉन्स ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे. तिची उंची तब्बल १६.४ किमी. आहे. मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत, यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी एक दरी आहे ती आपल्याला पृथ्वीवरुन शक्तीशाली दुर्बिणीतून सुध्दा दिसते. या दरीला मरिना दरी असे म्हणतात. मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणत: २० अंश सेल्सीयस तर विरुध्द भागाचे तापमान -१८० अंश सेल्सीयस असते. पुढे वाचा...