अलेक्से‌ई मॅक्झिमोविच पेश्कोव्ह (मार्च २८, १८६८ - जून १८, १९३६) हा एक रशियन लेखक व राजकीय कार्यकर्ता होता. त्याला मॅक्झिम गॉर्की (रशियन: माक्सिम गोर्की) या टोपणनावाने ओळखले जाते. तो समाजवादी सत्यवाद या साहित्यपद्धतीच्या जनकांपैकी एक मानला जातो. त्याचा जन्म निझ्नी नोव्होगोरोड येथे व मृत्यू मॉस्को येथे झाला. १९०६ ते १९१३१९२१ ते १९२९ हा काळ त्याचे परदेशी, मुख्यत्वेकरून काप्री येथे वास्तव्य होते. सोवियत संघामध्ये परतल्यावर त्याने तेथील सांस्कृतिक नियम मान्य केले. यानंतरही त्याला देश सोडण्याची परवानगी नव्हती.गोर्कि या शब्दाचा अर्थ 'कटू' असा होतो.मॅक्सिम गोर्कि यांच्या आयुष्यात अनेक कटू प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले.यावरून। कदाचित त्यांनी हे टोपण नाव निवडले असावे.गोर्कि एका स्टीमर मध्ये काम करीत असतांना तेथील एका स्वयंपाक्याकडून त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांनी 'मकरचुद्रा' नावाची एक कथा लिहिली व ती मॅक्सिम गोर्कि या टोपण नावाने छापली.पुढे त्यांचे हेच नाव कायम राहिले.

मॅक्झिम गॉर्की
Maxim Gorky authographed portrait.jpg
मॅक्झिम गॉर्कीचे स्वाक्षरीकृत व्यक्तिचित्र
जन्म नाव अलेक्से‌ई मॅक्झिमोविच पेश्कोव्ह
टोपणनाव मॅक्झिम गॉर्की
जन्म मार्च २८, १८६८
निझ्नी नोव्होगोरोड, रशियन साम्राज्य
मृत्यू जून १८, १९३६
मॉस्को, सोव्हिएत संघ
कार्यक्षेत्र लेखक
चळवळ समाजवादी सत्यवाद

जीवनसंपादन करा

नऊ वर्षाच्या वयात पोरके झालेल्या गॉर्कीचा त्याच्या आजीने सांभाळ केला. त्याची आजी गोष्टी सांगण्यात चतुर होती. तिच्या मृत्यूचा गॉर्कीला फार धक्का बसला. त्याने डिसेंबर १८८७ मध्ये आत्महत्येचा एक फसलेला प्रयत्नही केला. यापुढील पाच वर्ष तो वेगवेगळी कामे करत रशियन साम्राज्यामध्ये पायी भटकला. या काळात पाहिलेल्या घटना व गोष्टींचा त्याला पुढे लिखाणास उपयोग झाला.

१८९२ मध्ये तिफ्लिसमध्ये "द कॉकेशस" या वृत्तपत्रात काम करत असताना त्याने "गॉर्की" (अर्थ: कडवट) हे टोपणनाव वापरण्यास सुरुवात केली. त्याने १८९८ मध्ये लिहिलेले Очерки и рассказы (निबंध व गोष्टी) हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरले आणि गॉर्की एक सुप्रसिद्ध लेखक बनला.

गॉर्कीला झारच्या (रशियन त्सार) सत्तेला खुला विरोध दर्शविण्यामुळे बऱ्याच वेळा अटक देखील झाली. गॉर्कीचे बऱ्याच क्रांतिकारकांशी देखील संबंध होते. १९०२ साली त्याची लेनिनशी भेट झाली व ते दोघेही चांगले मित्र बनले. गॉर्कीने वृत्तपत्रांवरील सरकारी पकड दाखवून दिली व तिचा निषेधही केला. १९०२ साली गॉर्कीची रशियन साहित्य अकादमीवर सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली, परंतु झार निकोलस दुसरा याने ही निवड रद्द करण्यास अकादमीस भाग पाडले. या कृत्याच्या विरोधात आंतोन चेखवव्लादमीर कोरोलेंको यांनी अकादमी सोडली.

१९०५ सालच्या फसलेल्या राज्यक्रांतीच्या काळात तुरूंगामध्ये असताना गॉर्कीने सूर्याची पिल्ले हे नाटक लिहिले. या नाटकाची गोष्ट जरी १८६२ सालात दाखवली असली तरीही ते खरेतर तेव्हाच्या सद्य परिस्थितीवरच आधारित होते. याच वर्षी पुढे गॉर्कीने अधिकृतपणे बोल्शेविक पक्षात प्रवेश केला.

पहिल्या महायुद्धाच्या काळात गॉर्कीचे पेट्रोग्राड (रशियन पेत्रोग्राद) येथील घर बोल्शेविक पक्षाचे कार्यालय म्हणून वापरण्यात आले. परंतु या काळात त्याचे साम्यवाद्यांबरोबरचे संबंध हळूहळू बिघडू लागले. १९१७ सालच्या ऑक्टोबर क्रांतीनंतर त्याने लिहिले "लेनिन व ट्रॉट्स्की यांना स्वातंत्र्यमानवाधिकार याची कल्पनादेखील नाही. सत्तेच्या जहाल विषाने त्यांना कधीच भ्रष्ट करून टाकले आहे. ज्या लाजिरवाण्या रितीने त्यांनी भाषणस्वातंत्र्य व लोकशाहीला प्रिय असणाऱ्या इतर सर्व नागरी स्वातंत्र्यांचा निरादर केला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसते." लेनिनने १९१९मध्ये गॉर्कीला लिहिलेल्या पत्रांमध्ये धमक्या आहेत: "माझा तुला सल्ला - तुझी परिस्थिती, तुझी मते, तुझी कृत्ये बदल नाहीतर आयुष्य तुझ्यापासून दूर जाईल."

१९२१च्या ऑगस्टमध्ये गॉर्कीचा मित्र व लेखक निकोलाय गुमिल्योव याला पेट्रोग्राडमध्ये गुप्त पोलिसांनी त्याच्या राजसत्तेला असलेल्या पाठिंब्यामुळे अटक केली. गॉर्कीने स्वतः घाईने मॉस्कोला जाऊन त्याच्या सुटकेसाठीचे पत्र स्वतः लेनिनकडून मिळवले. परंतु पेट्रोग्राडला परतल्यावर त्याला समजले की गुमिल्योवला अगोदरच गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. या घटनेनंतर ऑक्टोबरमध्ये गॉर्कीने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने इटलीला स्थलांतर केले, कारण होते क्षयरोग.

अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनच्या म्हणण्यानुसार गॉर्कीच्या सोवियत संघात परतण्याची कारणे भौतिक होती. इटलीमध्ये सोरेंटो येथे गॉर्कीलाना पैसाना मान अशा परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. १९२९ नंतर त्याने सोवियत संघाच्या अनेक वाऱ्या केल्या. १९२९ मध्ये त्याने सोलोव्स्की बेटावरील श्रमतुरुंगास भेट दिली व श्रमतुरुंगांच्या पद्धतीबद्दल स्तुतीपर लेख लिहिला. एव्हाना श्रमतुरुंगांच्या पद्धतीस पाश्चिमात्य देशांमध्ये अगोदरच वाईट नाव मिळाले होते. अखेर १९३२मध्ये जोसेफ स्टालिनने गॉर्कीला स्वतः सोवियत संघात परतण्याचे निमंत्रण दिले.

फॅसिस्ट इटलीमधून गॉर्कीचे परतणे ही सोवियत संघाच्या दृष्टीने प्रचाराची मोठीच संधी होती. त्याला "ऑर्डर ऑफ लेनिन" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला राहण्यास घरे देण्यात आली व मॉस्कोमधील एका रस्त्यास त्याचे नाव देण्यात आले.

पुढे स्टालिनच्या अत्याचारांमध्ये झालेली वाढ व डिसेंबर १९३४ मधील सर्जेई किरोव्ह याची हत्या या पार्श्वभुमीवर गॉर्कीला त्याच्या घरी नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. त्याला प्रावदा वर्तमानपत्राची खास आवृत्ती देण्यात येत असे ज्यामध्ये अटक व राजकीय हत्या यांच्या बातम्या गाळलेल्या असत.

१९३५च्या मे महिन्यामध्ये गॉर्कीचा मुलगा मॅक्सिम पेश्कोव्ह याचा अचानक मृत्यु झाला. यानंतर जून १९३६ मध्ये गॉर्कीदेखील मरण पावला. दोघांचेही मृत्यु संशयास्पद परिस्थितीमध्ये झाले पण त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे अंदाज कधीच सिद्ध होउ शकले नाहीत. गॉर्कीची शवपेटी स्वतः स्टालिन व मोलोटोव्ह यांनी वाहून नेली.

साहित्यसंपादन करा

मॅक्झिम गोर्की हे एक कामगारवर्गिय लेखक होते. त्यांच्या निष्क्रीय व भांडवलदारांच्या बाजूने उभ्या असलेल्या लेखकांना व कलाकारांना आपल्या लेखांमधून "संस्कृतीच्या मिरासदारांनो, तुम्ही कोणाबरोबर आहात?" असा खडा सवाल विचारला. रशियन समाजवादी क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य म्हणजे उत्तम दस्तावेज आहेत. त्यांच्या साहित्यिक निर्मिती खालीलप्रमाणे आहेत

  • "निबंध आणि लघुकथा" (कथासंग्रह)
  • "फोमा गोर्देयेव" (कादंबरी)
  • "तिघे" (कादंबरी)
  • "वादळी पक्षाचे गाणे" (कविता)
  • "छोटी माणसे" (नाटक)
  • "आणखी खोल पाताळात" (नाटक)
  • "आई" (कादंबरी)
  • "संस्कृतीच्या मिरासदारांनो, तुम्ही कोणाबरोबर आहात?" (लेखसंग्रह)