यशवंत आंबेडकर

(भैयासाहेब आंबेडकर या पानावरून पुनर्निर्देशित)


यशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ - १७ सप्टेंबर १९७७), भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.

यशवंत भीमराव आंबेडकर

यशवंत भीमराव आंबेडकर
टोपणनाव: भैय्यासाहेब
जन्म: १२ डिसेंबर इ.स. १९१२
मृत्यू: सप्टेंबर १७, इ.स. १९७७
संघटना: भारतीय बौद्ध महासभा (द्वितीय अध्यक्ष)
प्रमुख स्मारके: चैत्यभूमी (समाधी स्थळ)
धर्म: बौद्ध धर्म
वडील: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आई: रमाबाई आंबेडकर
पत्नी: मीराबाई आंबेडकर
अपत्ये: प्रकाश आंबेडकर
रमाबाई तेलतुंबडे
आनंदराज आंबेडकर
भीमराव आंबेडकर

यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले होते. १९ एप्रिल १९५३ रोजी त्यांचे लग्न मीराबाई सोबत झाले. भैय्यासाहेबांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.

यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो. आपटे लिखित बौद्धपर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.

भैय्यासाहेबांची इंग्रजी उत्तम होती, तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर केला जात असे.

स्मारके

संपादन

भैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली. पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी भुमीपूजन व २२ जून १९५८ रोजी उद्‌घाटन झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले. भैय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम महापौरांना दिली व ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. चवदार तळे येथे क्रांतीचे स्मारक व जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतिस्तंभ उभारण्यासाठीही यशवंतरावांनी पुढाकार घेतला. चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने २० मार्च १९५७ रोजी BMS(?)कडे ४० बाय ४०ची जागा मागितली, BMS ने ८ बाय ८ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भैय्यासाहेबांनी घेतला. अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४०ची जागा मान्य केली. जोपर्यंत शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष हे एकसंघ होते तोपर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भैय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले. १९६६ साली बाबासाहेबांची ७५वी जयंती येत असल्यामुळे हा 'अमृत महोत्सव' म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भैय्यासाहेबांनी ठरविले. या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक 'भीमज्योत' महूहून मुंबईला आणण्याचे ठरविले. २७ मार्च १९६६ रोजी ही भीमज्योत भारताचे तत्कालीन मजूर मंत्री जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीम-ज्योत महूहून इंदूर, भोपाळ, हुशंगाबाद, बैतूल, नागपूर, पुलगाव, औरंगाबाद, येवला, नाशिक, हरेगावनगर(?), संगमनेर, देहूरोड, पुणे, सातारा, वणी(?), पाचगणी, महाबळेश्वर, खेड, मंडणगड, दापोली, महाड, पेण, पनवेल, कल्याण, ठाणे, मुलुंड, राजगृहावरून दादरच्या चैत्यभूमीला आणण्यात आली. ह्या भीमज्योतीदरम्यान मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.

धार्मिक कार्य

संपादन

६ डिसेंबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. 'मी सारा भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैय्यासाहेबांनी काम सुरू केले. त्यांनी अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरू केला. १९६२ ते ६८ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) असतांना भैय्यासाहेबांनी विधानपरिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनाही भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथदिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या. खेड्यापाड्यातील बौद्ध विहारांचे उद्‌घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्म परिषद भरविण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून १४ वे दलाई लामा यांना बोलविण्यात आले. ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. बौद्ध जीवन संस्कार पाठ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भैय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते. त्यांचे नाव ‘महापंडित काश्यप’ असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये ब्रिटिश भिक्खू महास्थविर संघरक्षित लंडनहून आले असता त्यांनी भैय्यासाहेबांची भेट घेतली होती. वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडताना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही.

 
यशवंत भीमराव आंबेडकर यांचे विश्रामस्थान चैत्यभूमी.

बाबासाहेबांना एकूण चार मुले व एक मुलगी होती. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होते जे जगले. भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळविता आले नसले, तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्‍नांचाच परिपाक आहे. १९६२ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा ‘भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत’ असे गौरवोद्गार दादासाहेब गायकवाडांनी काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्त्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यांची मुले प्रकाश आंबेडकर, भीमराव यशवंत आंबेडकरआनंदराज आंबेडकर यांनी समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले.

पुस्तके

संपादन

आंबेडकरांवर लिहिली गेलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत :

  • "सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर" — लेखक: फुलचंद्र खोब्रागडे, संकेत प्रकाशन, नागपूर, २०१४
  • "लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर" — लेखक: प्रकाश जंजाळ, रमाई प्रकाशन, २०१९
  • "सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथ" / संपादक, ज,वि,पवार, प्रकाशक :- भारतीय बौद्ध महासभा, २०००

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन