अनुवाद

(भाषांतर या पानावरून पुनर्निर्देशित)

एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत , त्या शब्दांतील, वाक्यांतील आणि लिखाणातील भाव, विचार आणि दृष्टिकोन ह्यांच्यासहित नेमकेपणाने व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अनुवाद होय.

अनुवाद म्हणजे भाषांतर नव्हे

संपादन

बरेचदा भाषांतर आणि अनुवाद ह्यांना एकसारखेच स्थान दिले जाते. मात्र तसे नाही. भाषांतर आणि अनुवाद ह्यांच्यातला फरक खरेतर तसा सूक्ष्म आहे, पण फार मोठ्या अर्थाचा अनर्थसुद्धा करू शकतो. भाषांतर करताना मूळ शब्द अथवा वाक्यरचना जशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जसे एका भाषेतील शब्दाला दुसऱ्या भाषेतील शब्द योजने. एकेका शब्दापुरते भाषांतर मर्यादित असल्यास विशेष बाब नाही. मात्र शब्दसमूह अर्थात वाक्यरचनांचे भाषांतर करत असताना, शब्दाला शब्द हा दृष्टिकोन ठेवल्यास मूळ वाक्यांच्या आणि लिखाणाच्या भावार्थाचा ऱ्हास घडून येतो. अनुवादात मूळ लेखनाचे शब्दशः रूपांतर न करता त्यातला मथितार्थ समजून घेणे व सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती योग्य रितीने अनुवादात उतरवणे, आवश्यक असते.[१]

अनुवाद आणि शब्दशः भाषांतर ह्यांच्यातील फरक दाखवणारा हा छोटासा नमुना पहा -

'I Love you' चे शब्दशः भाषांतर मी प्रेम तू असे होते. (खरे तर हे भाषांतरही नव्हे, पण नमुन्यादाखल दिले आहे.)

मात्र अनुवादात I Love you चा अनुवाद माझे तुझ्यावर प्रेम आहे. असा होतो.

खरेतर हे अतिशय साधे उदाहरण आहे, मात्र मोठमोठ्या वाक्यांचे, साहित्य कृतींचे अनुवाद करताना ही बाब दुर्लक्षित केल्यास मोठ्या चुका घडून अनुवादाचा / लिखाणाचा विचका होऊ शकतो. अशा चुका टाळण्यासाठी अनुवादकांना विशेष दक्षता घ्यावी लागते. मूळ लेखक, त्यांचे दृष्टिकोन, लेखनामागचा उद्देश, स्रोत भाषा, भाषेची मांडणी, भाषेचे सौंदर्य अशा नानाविध गोष्टी लक्षात घेऊन, त्या वाक्यांचा वरवर लक्षात येणारा अर्थ, त्यांचा लक्ष्यार्थ अर्थात अर्थाचा मूळ गाभा , आत्मा जाणून घेऊन जो अनुवाद करू शकतो, तो खरा आणि उत्तम अनुवादक होतो. नवागत अनुवादकांनी हे धोरण लक्षात ठेवूनच अनुवाद केला पाहिजे.[२]

सोप्या भाषेत अनुवाद हे भाषांतराचे पुढचे पाऊल म्हणावे लागेल.

अनुवादप्रक्रिया

संपादन

अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा अथवा स्रोत भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात.[१]

चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी लागते. त्याचा दोन्ही भाषांचा सखोल अभ्यास असावा लागतो. त्याचे शब्दज्ञान आणि शब्दसंग्रह परिपूर्ण असावा लागतो. अर्थात हे काम करताना आणि अभ्यासाने हे ज्ञान वाढत जाते.[१]

अनुवादकाला दोन्ही भाषांतील व्याकरणाचेही ज्ञान असावे लागते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुवादकाला स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा बोलणाऱ्या समूहाची किंवा समाजाची भाषिक , सांस्कृतिक जाण, बोलीभाषा-पद्धती ह्यांचीही आवश्यक ती माहिती, समज असायला पाहिजे. [३]

मुळात अनुवादक हा अतिशय सृजनक्षम आणि संवेदनशील असावा लागतो. कारण प्रत्येक भाषा वेगळी असते. प्रत्येक भाषेची धाटणी - मांडणी वेगवेगळी असते. तिच्यातील शब्दांच्या समूहरचनेची अर्थात वाक्यरचनेची पद्धतसुद्धा वेगळी असते. त्या शब्दसमूहांच्या मांडणी-बदलातून घडून येणारे अर्थही त्यामुळे बरेचदा भिन्न होत जातात. जसे काही काही वाक्ये द्व्यर्थी असतात वा सरळ सरळ अर्थ न सांगणारी असतात - उदा. म्हणी, वाक्प्रचार, प्रांतीय / पारंपारिक संदर्भांनी सजलेली वाक्ये . काही म्हणी वा वाक्प्रचार तर असे असतात, जे केवळ त्या त्या प्रांतीय भाषेतच उपलब्ध असतात. त्यांचे संदर्भही तसेच मर्यादित असतात. अशा वाक्यरचना वा असे लिखाण असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. अशा वाक्यांचा अनुवाद हा त्यातला मूळ उद्देश, सौंदर्य बिघडू न देता अतिशय खुबीने करावा लागतो. त्यातला तो विशेष अर्थ अनुवाद वाचणाऱ्या वाचकाला नीट समजून यावा म्हणून विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनुवादकांचे काम सोपे अजिबात नाही. मात्र जो हे काम करू लागतो, त्याचे भाषाविश्व आणि शब्दविश्व अधिकाधिक समृद्ध होत जाते.[४]

अनुवादाऐवजी भाषांतर घडले असल्यास ती वाक्ये, माहिती, जाहिरातीतील गाण्यांच्या ओळी, सिनेमातले संवाद निश्चितपणे खटकतात. ही बाब हेच दाखवते की, अनुवादकाच्या कामात काही गडबड आहे.

थोडक्यात म्हणजे अनुवाद असा हवा की, जरी एकप्रकारे अनुवाद हा ' मूळ प्रतीची कॉपी' अर्थात 'मूळ लेखनाची प्रतिप्रत' असला तरीही निर्माण होणारी अनुवादित कलाकृती ही नवनिर्मिती वाटली पाहिजे, मूळ भाषेतील मसुद्याप्रमाणेच ही कलाकृती सुंदर, नाविन्यपूर्ण, आनंददायी आणि शैलीदार असायला हवी. म्हणूनच म्हटले आहे की, तो अनुवादक सृजनक्षम असावा लागतो. तरच निर्माण होणाऱ्या साहित्य-कृतीतून अनुवादक आणि वाचक दोघांनाही आनंद मिळू शकतो.

ज्या लेखकांनी अनुवाद करण्याचे काम केले आहे, त्यांचे अनुभवसुद्धा नवोदितांना मार्गदर्शक ठरू शकतात.

भाषांतर

संपादन

साधारणपणे जिथे मूळ अर्थात फारसा फरक पडणार नाही, अशा गोष्टी भाषांतरात येऊ शकतात. जसे सरकारची वा संस्थेची नियमावली, वस्तूंच्या याद्या, अकाउंट्समधील आकडे /हिशोब /गणिते / पद्धती / नमुने / विज्ञानशाखेतील समीकरणे, अर्थशास्त्रातील नियम - सिद्धान्त वगैरे गोष्टींचा अनुवाद नाही, तर भाषांतर होऊ शकते.

ज्या पद्धतीचे काम करायचे आहे, त्यानुसार आपण अनुवाद करायचा आहे की, भाषांतर, हे समजून घेऊन काम करावे लागते.[१]

वर उल्लेख केल्याप्रमाणे, अनुवाद हा ललित साहित्यकृतींचा (जसे - पुस्तके, कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक, विवेचन, ललित लेख, गाणी, चरित्र, टीका-टिपण्या, शैक्षणिक माहिती, अग्रलेख आणि तत्सम सर्व गोष्टी ज्या साहित्य प्रकारात येतात त्यांचा) होऊ शकतो.

हे क्षेत्र विस्तृत आहे. आज वरील साहित्य प्रकारांसोबतच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये ( जसे- जाहिराती, सिनेमा, मालिका वगैरे) जाणत्या अनुवादकांची गरज निर्माण झाली आहे. वैश्विकिकरणामुळे इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढलेले आहे. सर्व अद्ययावत माहिती इंग्रजी भाषेमध्ये असल्यामुळे इंग्रजीला जगाची ज्ञानभाषा म्हणतात. स्वभाषेलाच महत्त्व देणाऱ्या प्रगत राष्ट्रांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये लेखन होते. इतर देशांत वा प्रांतात ते लिखाण पोहोचवण्यासाठी अनुवादक फार मोठे कार्य जबाबदारीने पार पाडत असतात.[५]

सरकारी तसेच विविध खाजगी क्षेत्रांतील आवश्यकता आणि उपलब्धता

संपादन

भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे इथे प्रांतिक तसेच जागतिक भाषेतही अनुवाद होत असतात. अनुवादाला पर्यायाने अनुवादकांना तसेच भाषांतरकार ह्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर सरकारने या अनुवाद कार्यासाठी स्वतंत्र भाषा संचालनालय[६] निर्माण केले आहे. भाषा सल्लागार मंडळाची स्थापना केली.[७] त्यांच्या अथक प्रयत्नांमधून प्रशासनिक मराठी भाषेचा विकास झालेला आहे हे सर्वज्ञात आहे. आज सरकारच्या सर्व व्यवहारात, विधान मंडळाच्या कामकाजात सर्वत्र मराठीचा वापर होतो. त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व असणाऱ्या आणि मराठी भाषेचा पदव्युत्तर अभ्यास केलेल्या मुलामुलींना भाषा संचालनालय, विधान मंडळ इत्यादी ठिकाणी भाषांतरकार आणि अनुवादक म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.[८]

कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असू शकते - [९]

 • अर्थसंकल्पीय तसेच प्रशासनिक व नियम पुस्तिकांचा अनुवाद करणे
 • विधिविषयक अनुवाद व परिभाषा तयार करणे
 • अल्पसंख्यांक भाषांतून अनुवाद करणे.

न्यायव्यवहार

संपादन

सरकारी व्यवहाराप्रमाणे न्यायव्यवहारातही राजभाषा मराठीचा वापर अनिवार्य झाल्यामुळे न्यायव्यवहार क्षेत्रांमध्ये, न्यायालयांमध्ये भाषांतरकार आणि अनुवादकांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झालेली आहे. इथे केवळ मराठीमध्ये भाषांतर / अनुवाद करणाऱ्यांचीच नाही तर मराठीतून किंवा अन्य भारतीय भाषांमधून इंग्रजीमध्ये भाषांतर / अनुवाद करणाऱ्या करणाऱ्यांचीही गरज आहे. तसेच नोकरी न करता स्वतंत्रपणे हे काम करूनही अर्थार्जन करता येईल.

प्रसारमाध्यमे

संपादन

वृत्तपत्रे, नियतकालिके, रेडियो, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्येही अनुवादकांची सातत्याने निकड भासत असते. जाहिरातक्षेत्रही झपाट्याने विकसित होत असल्याने या क्षेत्रात अनुवादकांची सातत्याने गरज वाढते आहे. याव्यतिरिक्त विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक इत्यादींसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्षेत्रांमध्येही अनुवादकांची गरज असते. इंग्रजीमधून सातत्याने प्रस्तृत होणारे अद्ययावत ज्ञान मराठी भाषेमध्ये किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेमध्ये आणणे हे अतिशय अवघड काम आहे. अभ्यासू अनुवादकांची या क्षेत्रात खूप गरज आहे.

परिभाषा

संपादन

वैज्ञानिक आणि तांत्रिक विषयांचे लेखन, कायद्याचे लेखन हे परिभाषानिष्ठ लेखन असते. त्यामुळे अशा प्रकारच्या लेखनाचा अनुवाद करण्यासाठी अनुवादकाकडे त्या त्या विषयाच्या परिभाषेचे ज्ञान असावे लागते तसेच वेळप्रसंगी गरज पडल्यास पारिभाषिक शब्द तयार करण्याची क्षमता असायला हवी. कारण अशा प्रकारच्या लेखनात परिभाषेचा अचूक वापर करावा लागतो, विचार निःसंदिग्धपणे मांडावे लागतात. वाक्ये सुटसुटीत लिहून अनावश्यक क्लिष्टता, बोजडपणा टाळावा लागतो. प्रशिक्षणाने आणि नंतर अनुवादकाच्या व्यक्तिगत अभ्यासाने, सरावाने हे जमू लागते.

अनुवाद - एक कलाविष्कार

संपादन

थोडक्यात म्हणजे अनुवाद ही कला आहे, तसेच त्याचे शास्त्र आणि तंत्रही आहे. सृजनशीलता आणि अभ्यास यांच्या योगाने या क्षेत्रात यश मिळवता येते. सुयोग्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून अनुवादकांना प्रशिक्षण दिल्यास अनुवाद प्रशिक्षक म्हणूनही यशस्वी व्यवसाय करणं शक्य आहे.

दळणवळणाच्या साधनांनी जसे जगातले अंतर दिवसेंदिवस कमीकमी होते आहे, तसेच अनुवाद आणि भाषांतरामुळे जग जवळ येते आहे. आज अनुवादाचे महत्त्व सगळ्यांना पटले आहे. त्यामुळे या क्षेत्रात अर्थार्जनाच्या आणि स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करण्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्यांचा सुजाणपणे विचार करायला हवा.

पुस्तके

संपादन
 • अनुवाद : अवधारणा और आयाम (हिंदी लेखसंग्रह, संपादक : सुरेश तायडे, विजय लोहार)
 • Emjoying Liturature (मराठी भाषांतरावरील इंग्रजी पुस्तक,लेखिका : प्रा. सहस्रबुद्धे-देशपांडे)
 • भाषांतर (सदा कऱ्हाडे)
 • भाषांतर आणि भाषा (विलास सारंग)
 • भाषांतर चिकित्सा (डॉ. मधुकर मोकाशी)
 • भाषांतर शास्त्र की कला? (म.वि. फाटक, रजनी ठकार)
 • भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य (वा.के. लेले)

संदर्भ

संपादन
 1. ^ a b c d अनुवाद कसा करावा - माहिती, साधने, कौशल्ये आणि नियम https://pandharyavarachekale.wordpress.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/
 2. ^ अनुवाद कसा करावा - https://www.loksatta.com/career-vrutantta-news/opportunity-in-translation-41229/
 3. ^ अनुवाद कार्यशाळा अनुभव https://ppkya.wordpress.com/2017/03/31/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/
 4. ^ https://www.loksatta.com/career-vrutantta-news/opportunity-in-translation-41229/
 5. ^ अनुवाद क्षेत्रातील संधी https://www.loksatta.com/career-vrutantta-news/opportunity-in-translation-41229/
 6. ^ भाषा संचालनालय , महाराष्ट्र राज्य - अधिकृत संकेतस्थळ https://bhasha.maharashtra.gov.in/Default.aspx Archived 2018-04-18 at the Wayback Machine.
 7. ^ भाषा सल्लागार समिती https://bhasha.maharashtra.gov.in/Upload/Bhashasallagarsamiti.pdf Archived 2016-10-20 at the Wayback Machine.
 8. ^ भाषा संचालनालय - संपर्क - https://bhasha.maharashtra.gov.in/ContactUs.aspx Archived 2018-04-05 at the Wayback Machine.
 9. ^ भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई - https://bhasha.maharashtra.gov.in/AboutUs.aspx#4 Archived 2018-09-03 at the Wayback Machine.

बाह्य दुवे

संपादन