बाबूराव पेंटर

भारतीय चित्रपट दिग्दर्शक
(पेंटर, बाबूराव या पानावरून पुनर्निर्देशित)

बाबुराव पेंटर यांचा जन्म ३ जून १८९० या दिवशी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकलाशिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.

बाबूराव पेंटर [मेस्त्री]

पूर्ण नावबाबूराव कृष्णराव मेस्त्री
जन्म ३ जून १८९०
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १६ जानेवारी १९५४
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला, चित्रपटनिर्मिती, चित्रपटदिग्दर्शन, रेखाटन, शिल्पकला, प्रकाशचित्रण
वडील कृष्णराव मेस्त्री
पत्नी लक्ष्मीबाई
अपत्ये यमुताई,अक्काताई,रवींद्र ,अरविंद,कुमुदिनी,नंदिनी,विनोदिनी,शशिकला,विजयमाला ,आशालता
Muraliwala (1927)
Sati Savitri(( (1927)

जीवन आणि कार्य

संपादन

१९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आलेल्या बाबूराव पेंटर यांनी १९५४ मध्ये जगाचा निरोप घेतला. कलामहर्षी बाबुराव पेंटर : कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकाम, लोहारकाम करणे हा होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला, चित्रकला या कलांचे ज्ञान मिळत गेले. या कामात आनंदराव पेंटर या त्यांच्या आतेभावाचीदेखील त्यांना सोबत मिळाली. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वतःचे असामान्य कौशल्य सिद्ध कले. शिल्पकलेच्या कामासाठी त्यांनी स्वतःची फॅक्टरी देखील सुरू केली होती. शिल्पकलेतील मातीचे असो वा धातूचे ओतकाम असो, बाबुराव स्वतः ही कामे करत. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी तयार केलेली शिल्पे कोल्हापूरमध्ये आजही पाहण्यास मिळतात.

चित्रपट

संपादन

आनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचबरोबर छपाई यंत्र, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. दि. १ डिसेंबर, १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. स्त्रीपात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला, तो म्हणजे ‘सैरंध्री’. पुण्यातील ‘आर्यन’ थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील भीमकीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवाद्वितीय दिग्दर्शक होते. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. त्यांनी १९२० ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लँप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट होय. पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्यचित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटापासूनच करमणूक कर बसविण्यात आला. याच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी शिलामुद्रण केलेली ३.४८ x ६.९६ मीटर (१॰ x २॰ फूट) लांबी-रुदीची भित्तिपत्रके तयार केली होती. ती चांगलीच प्रभावी ठरली. त्या दृष्टीनेही चित्रपटांच्या भित्तिपत्रकांचे जनकत्व बाबूरावांकडेच जाते.

अडचणी

संपादन

वत्सलाहरणाच्या निर्मितीनंतर त्यांनी मार्कंडेयाचे चित्रीकरण सुरू केले; परंतु ६नोव्हेंबर १९२२रोजी चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निर्मितिगृहाला एकाएकी आग लागून त्याची राखरांगोळी झाली; तथापि त्या राखेतूनही पुनश्च आपला चित्रपटसंसार बाबूरावांनी उभा केला व चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली. त्याकाळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही एक अग्रगण्य चित्रपटसंस्था मानली जाई. चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने कालोचित ठरणारी वेशभूषा व वातावरण निर्माण करण्याची बाबूरावांची हातोटी अनन्यसाधारण होती. असे असले, तरी त्यांचा मुख्य भर बाह्य नेपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक असे. त्यामुळेच त्या काळी मूकपटातील उपशीर्षके प्रायः हिंदीतून देण्यात येत असली, तरी बाबूरावांना हे फारसे पसंत नसे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळक्यांनी घातला असला, तरी बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून दिले. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही. शांताराम, एस्. फत्तेलाल, विष्णूपंत दामले व केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालविला.

चित्रकला

संपादन

बाबूरांवांच्या चित्रकलेवर वॅट्स, रॉझेटी, बर्न्स व लॅडशियर इ. पाश्चिमात्य चित्रकारांची छाप दिसून येते. त्रिंदाद, आगासकर, नागेशकर, पत्रावळे व हळदणकर या नावाजलेल्या भारतीय चित्रकारांनी हाताळलेली तंत्रे ते अभ्यासत व आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत.

शिल्पकला

संपादन

शिल्पकलेत मृद्-शिल्पांपासून ते ब्रॉंझच्या ओतकामापर्यंतची सर्व कामे ते स्वतःच करीत. नंतर त्यांनी त्यासाठी स्वतःची ओतशाळाही उभारली होती. त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

पुरस्कार

संपादन

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. सई परांजपे आणि श्याम बेनेगल यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन