पंडित बाळकृष्ण बुवा स्मृतिमंदिर

(पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

पंडित बाळकृष्णबुवा स्मृती मंदिर हे हिंदुस्तानी संगीताचे प्रख्यात गायक पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे स्मारक इचलकरंजी येथे १९७९ साली बांधण्यात आले.[१] ९ फेब्रुवारी १९७९ रोजी पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या ५२ व्या पुण्यतिथीच्या दिवशी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.या स्मारकामार्फत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केले जाते.

पार्श्वभूमी आणि स्थापना संपादन

उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा महाराष्ट्रात आणणारे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे इचलकरंजी संस्थानाचे दरबारी गायक होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलन १९७५ साली इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून बोलताना सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मारकाची उणीव बोलून दाखवली.[१] त्याचा गांभीर्याने विचार करून इचलकरंजीतील साहित्य आणि संगीतप्रेमी लोकांनी एकत्र येऊन असे स्मारक उभे करून त्याद्वारे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ठरवले. यासाठी अनेक सामाजिक, सहकारी संस्थांनी हातभार लावला. शं.बा.माळी मास्तर यांनी या स्मारकाच्या बांधकामासाठी अल्प मोबदल्यात आणि काही जागा देणगीदाखल दिली. तसेच गावातील शिक्षक श्री.पी.एम.रानडे सर यांनी १९७५ साली त्यांच्या नागरी सत्काराच्या वेळी मिळालेली रू.५०,००० ही संपूर्ण रक्कम या बांधकामासाठी देणगी म्हणून दिली.[१] इतर हजारो हात मदतीसाठी पुढे आले आणि १९७७ साली पायाभरणी होऊन १९७९ साली स्मारकाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. १९७९ साली पं.बाळकृष्णबुवा यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारीला पहिला तीन दिवसीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला. विख्यात गायक पं.मल्लिकार्जुन मन्सूर या स्मारकाचे उद्घाटक होते, तर पंडित कुमार गंधर्वांच्या हस्ते बाळकृष्णबुवांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला स्मारकाची संकल्पना सुचवणारे पु.ल.देशपांडे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हापासून दरवर्षी ९ फेब्रुवारीच्या दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करून बाळकृष्णबुवांना आदरांजली वाहिली जाते.
इचलकरंजी सारख्या लहान शहरात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करून गायक कलाकार आणि कानसेन तयार करण्याचे काम या संस्थेने केले. अनेक ख्यातनाम गायक, वादकांच्या कलेचा आस्वाद येथील नागरिकांना घेता आला.

इमारतीची वैशिष्ट्ये संपादन

स्मारकाच्या इमारतीचा आराखडा कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध वास्तुविशारद बेरी आणि बेरी यांनी बनवलेला आहे. गायनाच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने मुख्य सभागृह वर्तुळाकार आहे. सभागृहात बाळकृष्णबुवांचा अर्धाकृती पुतळा आहे. साधारण १५० व्यक्ती भारतीय बैठकीत बसू शकतात, इतके मोठे सभागृह आहे. मध्ये खांब नसल्यामुळे कलाकार सर्व प्रेक्षकांना व्यवस्थित दिसू शकतात. प्रतिध्वनी येऊ नये म्हणून जवळ जवळ निम्म्या सभागृहाला पूर्णपणे उघडता येतील अशा खिडक्या, शटर आहेत. संवादिनी, तबला, तानपुरा इ. वाद्ये ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलाकारांच्या निवासासाठी दोन खोल्या आहेत.

काणे बुवांचे योगदान संपादन

बाळकृष्णबुवांच्या गायन परंपरेतील इचलकरंजीतील विख्यात शास्त्रीय संगीत गायक पं. द.वि. काणे बुवा यांनी आपले मुंबईतील संगीत शिक्षण संपवून इचलकरंजी येथे संगीत प्रसार आणि प्रचाराच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी १९६७ साली पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळाची स्थापना करून या मंडळाच्या माध्यमातून देशातील ख्यातनाम गायकांचे कार्यक्रम इचलकरंजी येथे आयोजित करण्यास सुरुवात केली.[१]

विविध कलाकारांचे कार्यक्रम संपादन

१९७७ पासून विविध कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये पं.भीमसेन जोशी, पं.मल्लिकार्जुन मन्सूर, पं.जसराज, पं.कुमार गंधर्व, पं.राजन साजन मिश्रा, मालिनी राजूरकर, किशोरी आमोणकर, डॉ.प्रभा अत्रे, परवीन सुलताना, शोभा गुर्टू, पद्मा तळवलकर, वीणा सहस्रबुद्धे,पं.प्रभाकर कारेकर या दिग्गजांचा समावेश आहे.[१]

नवीन पिढीतील शौनक अभिषेकी,मुकुल शिवपुत्र, आरती अंकलीकर-टिकेकर, रेवा नातू यांनी सुद्धा येथे आपली कला सादर केली आहे. पं. बाळकृष्ण बुवा हे संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव असल्यामुळे सर्व कलाकार येथे सेवा भावनेने आपली संगीत कला सादर करतात. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य सादर केले जातात.

इतर उपक्रम संपादन

बाळकृष्णबुवांच्या पुण्यतिथीबरोबरच, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांची पुण्यतिथी, आषाढी एकादशी, गुरू पौर्णिमा, कै. मोहनराव उत्तुरकर स्मृती युवा महोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, चैत्रपहाट गुढीपाडवा, दीपोत्सव (दिवाळी पाडवा) या प्रसंगी कार्यक्रमांच्या माध्यमातून संगीत प्रसाराची गंगा अखंड वाहते आहे. तसेच तबला, संवादिनी, सुगम आणि शास्त्रीय संगीताचे नियमित वर्गही चालवले जातात.

परिसर संपादन

स्मारक परिसरात वावळा, बहावा, गगनजाई, कैलासपती इ. वृक्ष आहेत. तसेच रातराणीचे ताटवे आहेत.

हे सुद्धा पहा संपादन

पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ a b c d e "सर्वकार्येषु सर्वदा : संगीतसाधनेचा पारिजातक". Loksatta. 2020-08-29. 2020-08-29 रोजी पाहिले.