हे पसरट वाढणारे झुडुप मूळचे वेस्ट इंडीजमधील असून त्याचा प्रसार भारत,

पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, तसेच मेक्सिको, मध्य अमेरिका व उष्ण कटिबंधातील उत्तर अमेरिकेचा भाग, वेस्ट इंडीज इ. प्रदेशांत आहे. रातराणीच्या प्रजातीत एकूण सु. १५० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त ८ जाती आढळतात. सर्वच जाती मूळच्या उष्ण कटिबंधीय अमेरिकेतील आहेत. रातराणीची उंची सु. १·२५ – ३·७५ मी. असून फांद्या फिकट भुरकट, बारीक, लवहीन व काहीशा लोंबत्या असतात. त्यामुळे हिचा विस्तार बराच मोठा होतो. हिची पाने साधी, एकाआड एक, अंडाकृती-लांबट, पातळ, केशहीन, सु. १० सेंमी लांब व ४ सेंमी. रुंद, चकचकीत असून टोकास निमुळती असतात. फुले हिरवट पिवळी किंवा मलईसारखी पिवळी, सु. २ सेंमी लांब असून जुलै-सप्टेबंरमध्ये कक्षास्थ (पानांच्या बगलेत) व अग्रस्थ (शेंड्याकडील) चामरकल्प (चवरीसारख्या) मंजिरीवर येतात . पुष्पमुकुट खाली नळीसारखा असून पाकळ्या अंडाकृती, लहान, उभट व टोकास बोथट असतात. पुं-केसरांचे तंतू दातेरी असतात . मृदुफळ लंबगोल असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ सोलॅनेसी अगर धोत्रा कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फुले रात्रीच्या वेळी उमलतात त्यांचा मंद शीतल सुगंध सर्वत्र दरवळतो व वातावरण भारून टाकतो. त्यावरून रातराणी हे नाव पडले असावे. या वनस्पतीचा अर्क विशेषतः अपस्मारात आकडीरोधक (आचके न येऊ देणारा) म्हणून देतात. फुलांपासून अत्तर काढतात. रातराणी समुद्रसपाटीपासून उंचसखल प्रदेशापर्यंतच्या सर्व प्रदेशांत येते. हिची बागेत लागवड केलेली आढळते. ती कुंपणाच्या कडेनेही लावतात. हिला बागेतील सर्वसाधारण जमीन चालते. जमीन खणून, खड्डे करून त्यांत खत घालून रोपे, छाटकलमे किंवा गुटी कलमे लावून पावसाळ्यात लागवड करतात. फुलांचा बहार जानेवारी ते एप्रिलमध्ये येतो व तो दोन-तीन आठवडे टिकतो.

फुलांचा बहार संपल्यावर साधारणपणे एक महिना विसावा देऊन जास्त वाढलेल्या फांद्यांची व मुळ्यांची खरड छाटणी केल्यास पुढे भरपूर फुले येतात.

रातराणीला मावा आणि पिठ्या ढेकणांचा उपद्रव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी १०% बीएचसी भुकटी पिस्कारतात अथवा पाण्यात मिसळणारी ५०% बीएचसी फवारतात.