विष्णु दिगंबर पलुसकर

हिंदुस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार
(विष्णू दिगंबर पलुस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)

विष्णु दिगंबर पलुसकर (ऑगस्ट १८, १८७२ - ऑगस्ट २१, १९३१) हे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, संगीतकार होते. उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर होत. विष्णू दिगंबर हे त्यांचेच शिष्य होत.[ संदर्भ हवा ]

विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर संगित घराण्याचे होते. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे मोठे योगदान आहे.[ संदर्भ हवा ] त्यांनी संगीतविषयक क्रमिक पुस्तके लिहिली.[ संदर्भ हवा ] स्वरलिपी तयार केली जी 'पलुसकर-पद्धती' म्हणून ओळखली जाते. १९०१ साली "लाहोर" येथे त्यांनी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हिंदुस्तानी रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली.[ संदर्भ हवा ] १९२१ साली त्यांनी काळाराम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तित्वात आहे. विष्णू दिगंबर पलुसकर ह्यांना बालपणी अंधत्व आले होते.[ संदर्भ हवा ] पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे निधन ऑगस्ट १९३१ मध्ये झाले.[] ग्वाल्हेर परंपरेचेच लोकप्रिय गवई पं दत्तात्रेय विष्णू तथा बापूराव पलुसकर हे त्यांचे सुपुत्र होत.

सर्वोत्तम कीर्तनकार

संपादन

संस्थानिक मिरजकरांना विष्णूबुवांचा सत्कार करायचा होता, पण त्यासाठी त्यांनी पलुसकरांना नरसोबाची वाडी येथील देवस्थानाच्या कमिटीवरील अधिकाऱ्यांकडून देवाच्या अंगावरची वस्त्रे इनाम म्हणून मिळवायची अट घातली. पलुसकरांनी नरसोबाची वाडी येथे कीर्तने करून लोकांची आणि देवस्थानाच्या कमिटी सभासदांची मने जिंकली. चातुर्मास संपल्यावर देवस्थानाच्या व्यवस्थापकांनी देवाचा प्रसाद म्हणून काय हवे याची विचारणा केली. विष्णूपंतांनी देवाच्या अंगावरची वस्त्रे मागितली. अधिकाऱ्यांनी बरीच चर्चा करून ही वस्त्रे विष्णूबुवांना दिली. श्रीमंत मिरजकरांनी ती पाहून महाराष्ट्रातील सर्वोत्तम कीर्तनकार म्हणून पलुसकरांचा सत्कार केला. हीच वस्त्रे घालून विष्णू दिगंबर पलुसकरांनी पुढे अनेक वर्षे कीर्तने केली.[ संदर्भ हवा ]

वंदे मातरम्‌

संपादन

जाहीर सभा संपल्यानंतर वंदे मातरम्‌ म्हणावयाची प्रथा विष्णू दिगंबर पलुसकरांनी सुरू केली, ती आजतागायत चालू आहे.[ संदर्भ हवा ]

  1. ^ लोकमत-रसिका(७/९/२०००)