नाथ संप्रदाय
नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. "नाथ" या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला "नाथ संप्रदाय" असे नाव मिळाले, असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर "नाथ" हा शब्द जोडता येतो.
नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली, आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला.
नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सुमारे ८व्या ते १२वे शतकात) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. नवव्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारूपाला आणले.
नवनाथ ब्रम्हाच्या विर्यापासून उत्पन्न झाले म्हणून समस्त नाथसंप्रदाय नाथपंथी नाथसमाज हिंदू वर्ण व्यवस्था मधे मोडला जात नाही. व ब्रम्हाच्या द्वारे त्यांना देह प्राप्त झाला व त्या देहात नवनारायण यांनी प्रवेश केला. श्री दत्तगुरू यांनी नवनाथाना नाथसंप्रदाय मध्ये त्यांना महत्वपूर्ण स्थान दिले.
गुरू मच्छिंद्रनाथाना संजीवनी मंत्राची दीक्षा प्राप्त आहे. दैत्यगुरू शुक्राचार्य यांना प्रसन्न करून त्यांच्या कडून गुरू मच्छिंद्रनाथानी संजीवनी मंत्राची दीक्षा मिळवून घेतली. व नंतर ही दीक्षा गुरू गोरक्षनाथाना देण्यात आली. चुकीचा वापर होऊ नये म्हणून संजीवनी मंत्राची दीक्षा नाथानी गुप्त स्वरूपात ठेवली. नाथसंप्रदाय मध्ये गृहस्थ जीवन पद्धती सुरू करण्यासाठी गुरू गोरक्षनाथानी स्त्री व पुरुष यांची मातीचे पुतळे निर्माण करून त्यात संजीवनी मंत्र व महा मृत्युंजय मंत्रांनी मातीचे पुतळ्यात जीव निर्माण केला. त्यांनंतर अनेक स्त्री व पुरुष निर्माण करून त्यांचे विवाह करून त्यांना (सामाजिक बांधिलकी, प्रेम, त्याग, भक्ती, काम, भोग, मोक्ष) गृहस्थ जीवनाचा सुलभ व सुखी जीवनाचा मार्ग दाखविला. नाथसंप्रदायची नाथपंथी नाथसमाज सुरुवात झाली. नाथसंप्रदाय हा भारतातील एक हिंदू धार्मिक नाथ समाज आहे.
'नाथसंप्रदाय मधले मुख्य दैवत
श्री शिवशक्ती - महादेव व आदिशक्ती व श्रीहरि विष्णू नारायण आणि श्री दत्तगुरू व श्री हरी विष्णू नारायण नवनाथ (नवनारायण) आणि वैष्णोवी देवी धाम येथील भैरवनाथ हे नवनाथ यांचे अग्रज मानले जातात.
नाथ संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही भूमिका.. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत एकमत नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. नाथ संप्रदाय वर्णव्यवस्थेला मानत नाही. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरूपात संबंध आलेला दिसतो. बौद्ध धर्माच्या भारतातील शेवटच्या काळात महायान पंथात तांत्रिक कर्मकांड रूढ झाले होते. त्याचाच वारसा नाथ संप्रदायाने पुढे चालवला असे म्हणता येईल. या संप्रदायाच्या रूपनाथ येथील मंदिराशेजारी सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे.
परंपरा
संपादननाथांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्टय़ा जरी दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांमध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांकरिता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरू दत्तात्रेयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते. नाथांच्या परंपरेमध्ये अनेकदा हा संप्रदाय म्हणूनच नाथमत, अवधूतमत, अवधूत संप्रदाय, सिद्धमत इत्यादी नावांनी देखील ओळखला गेला आहे.
नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मत्स्येन्द्रनाथ (मच्छिन्द्रनाथ) आणि गोरक्षनाथ या गुरुशिष्यांचे नाव घ्यावे लागेल. या दोहोंचा जन्म, त्यांचे चमत्कारांनी भरलेले आयुष्य, त्यांनी केलेले कार्य या विषयांशी संबंधित अनेक कथाही जनमानसात प्रचलित आहेत. मत्स्येन्द्रनाथांनी त्यांच्या मासळी- आईच्या पोटात असतानाच शिव-पार्वती संवाद दैवयोगाने कानी पडल्यावर प्राप्त करून घेतलेले ज्ञान, गाईच्या शेणाच्या ढिगातून गोरक्षनाथांचा झालेला जन्म, मत्स्येन्द्रांना खाव्याशा वाटलेल्या वडय़ाकरिता गोरक्षनाथांनी आपला एक डोळा काढून देऊन दाखविलेली पराकोटीची गुरुभक्ती, मंत्रजप करताना हाती असलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीपूर्ण जन्म अशा त्यांच्या असंख्य कथा महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्या आहेत.
नवनाथांच्या परंपरेमध्येच आपल्याला चौऱ्याऐंशी सिद्धांचा उल्लेख सापडतो. ही ८४ सिद्धांची कल्पना मूलत: वज्रयान परंपरेतील आहे. संशोधकांचे असे मत आहे की, बौद्ध धर्माच्या ऱ्हासाच्या काळात गोरक्षनाथांच्या प्रभावाने अनेक बौद्धानुयायी ज्या वेळी नाथपंथात सामील झाले, त्या वेळी त्यांच्याकडील ८४ सिद्धांची ही संकल्पना नाथांकडे रूढ झाली असावी. या सिद्धांची देखील विस्तृत नामावली उपलब्ध असून त्यापैकी ८४ सिद्ध नेमके कोणते, याबद्दल मितभिन्नता आढळते. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, नवनाथांचा संप्रदाय अनेकांनी स्वीकारून सिद्धपद प्राप्त केले. या सिद्धांकडून आणि त्यांच्या शिष्यांकडून विविध लोकांना सांप्रदायिक उपदेश मिळाला आणि यातून पुढे नाथ संप्रदायातील अनेक गुरु-शिष्य परंपरांचा जन्म झाला. यातील काही परंपरांमध्ये प्रामुख्याने मंत्र-तंत्रविषयक ज्ञान आहे. काही परंपरा तत्त्वज्ञानप्रधान असून त्यामध्ये योग आणि ध्यान या उपासना पद्धतींचा अवलंब केला जातो. महाराष्ट्रातील भक्तीमार्गातही नाथ परंपरा रुजली असून अनेक भक्त मंडळी गुरुपदिष्ट मार्गाने नामसंकीर्तन, गुरुपूजन इत्यादीद्वारे मोक्षप्राप्ती करून घेण्याची मनीषा बाळगतात.
शिवशक्ति आणि दत्तात्रेय ही नाथ संप्रदायातील महत्त्वाची दैवते होत. याशिवाय ज्या विविध संप्रदायांनी नाथांचा मार्ग अनुसरला त्यांनी प्रायः आपापली दैवतेही सोबत आणली असावीत. त्यामुळेच बहुधा, इतर अनेक देवतांच्या मंत्रांचा समावेश नाथपरंपरेत झाल्याचे आढळते. दुर्गा, भैरव, नरसिंह, राम, हनुमान अशा अभिजनांच्या दैवतांसोबतच लोकधर्मातील म्हसोबा, वेताळ यासारख्या दैवतांचा, तसेच मुस्लिम पीर आणि फकिरांचा उल्लेख असणारे अनेक मंत्र नाथपरंपरेत सापडतात. ज्या ठिकाणी नवनाथांची वस्ती झाली अगर त्यांनी मठ स्थापिले ती ठिकाणे नाथांची तीर्थक्षेत्रे असून नाथपरंपरेतील जोगी अशा ठिकाणची यात्रा करतात. त्र्यंबकेश्वर, द्वारका, पुष्कर, रामेश्वर, हिंगळजा, गिरनार, गोरखपूर, पैठण अशी असंख्य ठिकाणे नाथांशी संबंधित असल्याचे प्रसिद्ध आहे. नाथ परंपरेमध्ये एकूण १२ पंथ विद्यमान असून त्यातील काही आदिनाथाने प्रवर्तित केले तर काही गोरक्षनाथांनी, अशी मान्यता आहे.
इतर नावे : योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, अवधूत संप्रदाय, दर्शनी पंथ, गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय, गुरू संप्रदाय.
उगमस्थान
संपादनत्र्यंबकेश्वर हे नाथसंप्रदायाचे पहिले मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही संबोधन आहे.
अनुपम शिळा महत्त्व
संपादनब्रह्मगिरीवरील कौलगिरीच्या पोटाला अनुपम शिळा आहे. या अनुपम शिळेविषयीची नाथांची धारणा अशी एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात साठ हजार ऋषी सध्या जिला अहिल्या नदी म्हणतात तेथे स्नान करीत होते. गुरू गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही स्नान करू लागले. त्या वेळी त्यांनी "हर हर गंगे‘ अशी हाक दिली. बाकीचे ऋषी म्हणू लागले की ही गंगा नाही, गोदावरी आहे. तू तिला गंगा कसे काय म्हणतोस? त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. त्या वेळी ऋषींनी विचारले, महाराज तुम्ही कोण आहात. तेव्हा गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. तेव्हापासून नाथसंप्रदाय तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहल्या-गौतमी संगम म्हणतात, त्यालाच नाथसंप्रदायाचे साधू गंगा-गौतमीचा संगम मानतात.
नागपंचमीचे महत्त्व
संपादनदर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ याच गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. साठ हजार ऋषींच्या विनंतीवरून गुरू गोरक्षनाथांनी त्यांना येथे उपदेश देण्याचे मान्य केले होते. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. त्यातील गुरू गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा नऊ जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून ८४ जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा.
नवनारायण नवनाथ
संपादनप्रमुख नाथांची संख्या ही नऊ असून ते नऊ नारायणाचे अवतार आहेत असे मानले जाते. जेव्हा ब्रम्हदेव यांनी सृष्टी ब्रम्हांडाची निर्मिती केली त्यावेळेस भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्यांचे अंश स्वरूपात ब्रम्हांडमध्ये अवतार स्थापन केले. यांना नवनारायण असेही म्हणतात. त्यामुळे सृष्टीला अलोकिक स्वरूप प्राप्त होते.
नवनाथांची यादी, मूळ अवतार आणि त्यांचे गुरू पुढील प्रमाणे आहेत.
नवनाथ | नव नारायण (विष्णू अवतार) | गुरू |
---|---|---|
मच्छिंद्रनाथ | कविनारायण | दत्तात्रेय |
गोरक्षनाथ | हरिनारायण | मच्छिंद्रनाथ |
गहिनीनाथ | करभाजन नारायण | गोरक्षनाथ |
जालिंदरनाथ | अंतरिक्ष नारायण | दत्तात्रेय |
कानिफनाथ | प्रबुद्ध नारायण | जालिंदरनाथ |
भर्तरीनाथ | द्रुमिल नारायण | दत्तात्रेय |
रेवणनाथ | चमस नारायण | दत्तात्रेय |
नागनाथ | आविर्होत्र नारायण | दत्तात्रेय |
चरपटीनाथ | पिप्पलायन नारायण | दत्तात्रेय |
८४ सिद्ध
संपादन१. ज्वालेन्द्रनाथ | २५. श्री मञ्जुनाथ | ४९. शाबरनाथ | ७३. प्रभुदेवनाथ |
२. कपिलनाथ | २६. भद्रनाथ | ५०. दरियावनाथ | ७४. नारदेवनाथ |
३. विचारनाथ | २७. गोरक्षनाथ | ५१. सिद्धबुधनाथ | ७५.टिण्टिणिनाथ |
४. बालगुंदईनाथ | २८. वीरनाथ | ५२. कायनाथ | ७६. पिप्पलनाथ |
५. कानीपानाथ | २९. चर्पटनाथ | ५३. एकनाथ | ७७. याज्ञवल्क्यनाथ |
६. श्रृंगेरीपानाथ | ३०. चक्रनाथ | ५४. शीलनाथ | ७८. सुरतनाथ |
७.रत्ननाथ | ३१. वक्रनाथ | ५५. दयानाथ | ७९. पूज्यपादनाथ |
८. श्री महासिद्ध मस्तनाथ | ३२. प्रोढ़नाथ | ५६. नरमाईनाथ | ८०.पारश्वनाथ |
९. धर्मनाथ (धोरम) | ३३. सिद्धासननाथ | ५७. भगाईनाथ | ८१. वरदनाथ |
१०. चन्द्रनाथ | ३४. माणिकनाथ | ५८. ब्रह्माईनाथ | ८२. घोड़ाचोलीनाथ |
११. शुकदेवनाथ | ३५. लोकनाथ | ५९. श्रुताईनाथ | ८३. हवाईनाथ |
१२. खेचरनाथ | ३६. पाणिनाथ | ६०. मनसाईनाथ | ८४. औघड़नाथ |
१३. भुचरनाथ | ३७. तारानाथ | ६१. कणकाईनाथ | |
१४. गंगानाथ | ३८. गौरवनाथ | ६२. भुसकाईनाथ | |
१५. गेहरावलनाथ | ३९. गोरनाथ | ६३. मीननाथ | |
१६. लंकानाथ | ४०. कालनाथ | ६४. बालकनाथ | |
१७. रघुनाथ | ४१. मल्लिकानाथ | ६५. कोरंटकनाथ | |
१८. सनकनाथ | ४२. मारकण्डेयनाथ | ६६. सुरानन्दनाथ | |
१९. सनातननाथ | ४३. ज्ञानेश्वरनाथ | ६७. निरंजननाथ | |
२०. सनन्दननाथ | ४४. निवृत्निनाथ | ६८. सिद्धनादनाथ | |
२१. नागार्जुननाथ | ४५. गहनीनाथ | ६९. चौरंगीनाथ | |
२२. सनत्कुमारनाथ | ४६. मेरूनाथ | ७०. सारस्वताईनाथ | |
२३. वीरबंकनाथ | ४७. विरूपाक्षनाथ | ७१. काकचण्डीनाथ | |
२४. धुन्धुकारनाथ | ४८. बिलेशयनाथ | ७२. अल्लामनाथ |
नाथपंथावरील मराठी पुस्तके
संपादन- अमनस्क योग
- अलख निरंजन शिव गोरक्ष (किशोर/उदयनाथ मंडलिक)
- गर्भगिरीतील नाथपंथ (टी.एन. परदेशी)
- श्री गुरुचरित्र ३९ वा अध्याय (डॉ. मधुसुदन घाणेकर)
- श्री गुरुचरित्र कथासार (अमोल प्रकाशन)
- श्रीमत् गुरुचरित्र (अमोल प्रकाशन)
- गोरक्षनाथ (नागेंद्रनाथ उपाध्याय )
- गोरक्ष संहिता (गोरखनाथ)
- श्री नवनाथ २ रा अध्याय (वि.के. फडके)
- श्री नवनाथ ५वा अध्याय (वि.के. फडके )
- श्री नवनाथ २८वा अध्याय (वि.के. फडके)
- श्री नवनाथ ४०वा अध्याय (वि.के. फडके )
- नवनाथ कथा (वि.के. फडके)
- श्री नवनाथ कथासार (अमोल प्रकाशन)
- श्री नवनाथ कथासार (सुभाषचंद्र वैष्णव)
- नवनाथचरित्र
- नवनाथ बोधामृत (नरेंद्र चौधरी)
- श्री नवनाथ भक्तिकथामृत (दास नारायण )
- नवनाथ भक्तिसार
- श्री नवनाथ भक्तिसार (अमोल प्रकाशन)
- श्री नवनाथ भक्तिसार (अध्याय ४० वा) : प्रोफिशियंट पब्लिशिंग हाऊस.
- नवनाथांच्या गोष्टी (बालसाहित्य, लेखक - रमेश मुधोळकर)
- नाथ अष्टांगयोग {पातंजल योगसूत्रांचा दिव्य-भावार्थ (डॉ. वृषाली पटवर्धन)
- नाथ गीता -अध्याय १ ते १८ (डॉ. वृषाली पटवर्धन
- नाथलीलामृत (रा.चिं .ढेरे)
- नाथ संप्रदाय : आचार व तत्त्वज्ञान
- नाथ संप्रदायाचा इतिहास (डॉ. रा.चिं. ढेरे)
- नाथ संप्रदायाची परंपरा : लोकसाहित्य (डॉ. धोंडीराम वाडकर)
- योग चिंतामणी (गोरखनाथ)
- योग बीज (गोरखनाथ)
- योग मार्तंड (गोरखनाथ)
- योग सिद्धान्त पद्धती (गोरखनाथ)
- सिद्ध सिद्धान्त पद्धती (गोरखनाथ)
- सिद्धान्तरहस्य (सत्यामलनाथ)
- ज्ञानदीपबोध
ग्रंथालय
संपादनजळगावला प्राचार्य शंकर कृष्णा जोगी यांनी नाथ संप्रदायांवरील सर्व जुन्या-नव्या-दुर्मीळ ग्रंथांचे, हस्तलिखितांचे एक संदर्भ वाचनालय स्थापन केले आहे.
चित्रपट आणि मालिका
संपादन- गाथा नवनाथांची - २१ जून २०२१ पासून सोनी मराठी या वाहिनीवर गाथा नवनाथांची या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादननवनाथ |
---|
मच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तृहरि • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ |