नागपंचमी

हिंदू सण आणि व्रत

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे.[] या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.[][] कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.[]

नागपंचमी पूजा करताना महिला आणि पुरुष

दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.

नागपंचमी पूजन

आख्यायिका

संपादन

एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही.[] कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.[]

अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.

मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत.

वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥
-- (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)

सांस्कृतिक महत्त्व

संपादन

भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते.[][] नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले.[] कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षणकर्ते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो.[१०]

  • स्त्रिया व नागपंचमी सण
 
मेंदी

या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे.[११] नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात.[१२][१३] पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.

पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या.

या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळतात.[१४]

पूजेचे स्वरूप

संपादन
 
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करताना महिला

या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात.[१५] भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दूध- लाह्या [१६] ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.[१७] पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे.

बत्तीस शिराळा येथील नागपंचमी

संपादन

सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेला बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध होते.[१८]

पुणे - बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना, पेठ नाका (इस्लामपूर)पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. तेथून साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गसमृद्ध आहे. बत्तीस शिराळ्यापासून जवळच चांदोली अभयारण्य, चांदोली धरण आहेत.

जेेव्हा पूर्वी नागपंचमीचा हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेव्हा नागपंचमीच्या एक महिना आधी येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहीम फत्ते करत असे. पकडलेल्या नाग, साप, यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई.

नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित होत. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत. यांतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २ वर्षाच्या बालकापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालून फोटो काढत.

शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे तर परदेशांतही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली.

त्यामुळे काही वर्षांपासून बत्तीस शिराळ्यात फक्त प्रतीकात्मक मिरवणूक काढली जाते.

आधुनिक काळात नागपंचमीचे व्रत कसे करावे?

संपादन
 
नागपंचमी सण (पुणे) २०२२
  • आजचे नागपंचमीचे व्रत नागप्रदेशातील एका तरी व्यक्तीशी संपर्क निर्माण करून करता येईल.
  • दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबविणे.
  • नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत 'धामण पाळानी धान्योत्पादन वाढवा ' अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना खूप आनंद होतो. मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे, अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा.[१७]
  • नाग पंथाचा इतिहास आणि त्यासंबंधी विविध कलांची माहिती घेणे.[१९]

भारताच्या विविध प्रांतात

संपादन

राजस्थान येथे नागपंचमी उत्साहाने साजरी केली जाते.[२०] गुजरात प्रांतात ही नागपंचमी साजरी केली जाते.[२१] नाग पूजनाची परंपरा भारताच्या केरळ, तामिळनाडू महाराष्ट्र या राज्यातही आढलते.

परदेशात

संपादन

प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत नाग नृत्याचा प्रचार असलेला दिसून येतो. या नृत्याचा संबंध सर्जनशक्तीशी मानला जातो. नागाचा आणि पृथ्वीचा एकमेकांशी असलेला पवित्र संबंध या संस्कृतींनी मान्य केला आहे.[२२]

लोकगीते

संपादन

नागभाऊरायाला नैवेद्य :

नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा
नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा[२३]

चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला ।
ताज्या लाह्या वेचायाला वेचायाला, हळदकुंकू व्हायायाला व्हायायाला

या गं या गडयिनी या गं या मैतरणी
तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई

जमूनिया साऱ्या जनी जाऊ बाई म्हणा
चल गं सये वारुळाला वारुळाला [२३]

नाग भाउराया तुला वाहते दूधलाह्या
दर्शनाला येती शेजारच्या आयाबाया [२४]

नागपंचमीच्या सणाला बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिचा बंधू यायचा. माहेरी जाण्याकरिता परवानगी घेण्यासाठी तिला सासू-सासरे, दीर-नणंदा, पतिराज यांची आर्जवे करावी लागत. अशावेळी ती या लोकगीतातून सासूरवाशीण सासूला म्हणते _ _ _ _ _

पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात नियाला ।

बंधू आल्यात नियाला, रजा द्या मला जायला ।

सासू म्हणते, मला काय विचारतीस? विचार तुझ्या सासऱ्याला ।

सासरा म्हणे, मला काय विचारतीस? विचार तुझ्या पतीला ।.......

भावगीत

संपादन

चित्रपटगीत

संपादन

चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - ग.दि. माडगूळकर; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)[२६]

हे सुद्धा पहा

संपादन

श्रावण

संदर्भ

संपादन
  1. ^ Verma, Manish (2013). Fasts and Festivals of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788171820764.
  2. ^ सिंह, नीतू (2016). Faizabad Sanskritik Gazetteer (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789352295715.
  3. ^ Bhatt, S. C. (2005). Land and people of Indian states and union territories : (in 36 volumes). 10. Himachal Pradesh (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353661.
  4. ^ Alter, Joseph S. (1992-08-03). The Wrestler's Body: Identity and Ideology in North India (इंग्रजी भाषेत). University of California Press. ISBN 9780520912175.
  5. ^ "Google Books". google.co.in. 2018-06-28 रोजी पाहिले.
  6. ^ Dwivedi, Dr Bhojraj (2006). Religious Basis of Hindu Beliefs (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788128812392.
  7. ^ Jasta, Hariram (1982). Bhåarata meòm Nåagapåujåa aura paramparåa (हिंदी भाषेत). Sanmåarga Prakåaâsana.
  8. ^ Morgan, Diane (2008). Snakes in Myth, Magic, and History: The Story of a Human Obsession (इंग्रजी भाषेत). Praeger. ISBN 9780313352928.
  9. ^ जोशी , होडारकर, महादेवशास्त्री,पद्मजा (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड ४. भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन.
  10. ^ Footprint India (इंग्रजी भाषेत). Footprint Handbooks. 2007.
  11. ^ Mullatti, Leela (1989). The Bhakti Movement and the Status of Women: A Case Study of Virasaivism (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 9788170172505.
  12. ^ Śahara Puṇe: ekā sã̄skr̥tika sañcitācā māgovā--. Niḷubhāū Limaye Phauṇḍeśana. 2000.
  13. ^ Cendavaṇakara, Sadānanda (1966). Bhāratīya saṇa āṇi utsava. Nirṇaya Sāgara Buka Prakāśana.
  14. ^ "झिम्मा-फुगडी.., नाच गं घुमा.. आणि पिंगा..." www.esakal.com. 2019-08-02 रोजी पाहिले.
  15. ^ Gajrani, S. (2004). History, Religion and Culture of India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788182050648.
  16. ^ Man in India (इंग्रजी भाषेत). A. K. Bose. 1943.
  17. ^ a b लेले, यशवंत (२००७). नागपंचमी. साप्ताहिक विवेक.
  18. ^ "नागपंचमीवर कोरोनाचं सावट; सांगलीतील बत्तीस शिराळ्यात यंदा नागपंचमी उत्सव नाही". My Mahanagar. 2021-08-06 रोजी पाहिले.
  19. ^ Kaul, P. K. (2008). Nāga Cult and Wooden Art in India (इंग्रजी भाषेत). Eastern Book Linkers. ISBN 978-81-7854-138-9.
  20. ^ Dādhīca, Rāmaprasāda (1979). Rājasthānī lokasāhitya: adhyayana ke āyāma (हिंदी भाषेत). Jainasansa.
  21. ^ Gujarat (India) (1979). Gujarat State Gazetteers: Vadodara (इंग्रजी भाषेत). Directorate of Government Print., Stationery and Publications, Gujarat State.
  22. ^ NAIR, G. RAVINDRAN (2017-09-08). Snake Worship in India (इंग्रजी भाषेत). Publications Division Ministry of Information & Broadcasting. ISBN 978-81-230-2568-1.
  23. ^ a b बाबर, सरोजिनी. माझिया माहेरा जा.
  24. ^ Babar, Sarojini Krishnarao (1985). Śrāvaṇa, Bhādrapada. Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīcyāvatīne Mahārāshṭra Śānācyā Śikshaṇa Vibhāgā.
  25. ^ जिप्सी. "गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)".
  26. ^ "गदिमा".