दोरजी खांडू

भारतीय राजकारणी

दोरजी खांडू हे भारतातील अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

दोरजी खांडू

कार्यकाळ
९ एप्रिल २००७ – ३० एप्रिल २०११
मागील गेगांग अपांग
पुढील जारबोम गमलीन

जन्म ३ मार्च, १९५५ (1955-03-03)
नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी
मृत्यू ३० एप्रिल, २०११ (वय ५६)
तवांग जिल्ह्यात लोबोथांगजवळ
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म बौद्ध

जीवनपट

संपादन

दोरजी खांडू यांचा जन्म- ३ मार्च , १९५५ ग्यानखार येथे झाला. मोनपा जमातीचे दोरजी खांडू राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागात कार्यरत होते. तिथे सात वर्ष काम केलं. बांगलादेश युद्धाच्या वेळी त्यांनी विशेष गुप्तचर विभागासाठी केलेल्या अतुलनीय कामाकरता त्यांना सुवर्णुपदकाने गौरवण्यात आलं. १९८२ साली दोरजी सांस्कृतिक आणि सहकारी सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या विशेष पुढाकारामुळे तवांग जिल्ह्यात सांस्कृतिक आणि सहकारी सोसायट्यांची स्थापना झाली. दोरजी यांच्या प्रयत्नांमुळेच तवांगमधील सांस्कृतिक चमूला १९८२ साली दिल्लीत भरलेल्या एशियाडमध्ये सहभागी होता आलं. याकरता त्यांना रौप्यपदकही मिळाले.

राजकारणात प्रवेश

संपादन

१९९० मध्ये अरुणाचल प्रदेशच्या पहिल्यावहिल्या विधानसभा निवडणुकीत थिंगबू-मुक्तो मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाली. १९९५ साली झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतही ते बिनविरोध निवडून आले व मंत्रिमंडळामध्ये २१ मार्च , १९९५ रोजी सहकार खात्याचे मंत्री झाले. १९९६ साली पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय तसंच डेअरी विकास खात्याच्या कॅबिनट मंत्री झाले. १९९८ साली ते ऊर्जा मंत्री झाले. १९९९ साली अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेवर निवडून गेले व २००२ ते २००३ या कालावधीत दोरजी खांडू खाण , मदतकार्य आणि पुर्नवसन खात्याचे मंत्री होते. २००३ मध्ये ते मदतकार्य आणि पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री झाले. २००४ मध्ये मुक्तो मतदारसंघातून त्यांची अरुणाचल प्रदेश विधानसभेवर बिनविरोध निवड झाली व ते ऊर्जा , एनसीईआर , पुर्नवसन खात्याचे मंत्री झाले. ९ एप्रिल २००७ला दोरजी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. जीऑंग अपांग यांच्याकडून त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं.[]

२००९ साली त्यांची पुन्हा एकदा मुक्तो मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आणि २५ ऑक्टोबर २००९ रोजी ते पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

मृत्यू

संपादन

३० एप्रिल २०११ला दोरजी खांडू आणि अन्य चौघे पवनहंस हेलिकॉप्टरनं इटानगरकडे रवाना झाले होते. सकाळी ९.५६ वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील २० मिनिटांतच हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. हेलिकॉप्टर भरकटलं की कोसळलं हे कळायला मार्ग नव्हता. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री असल्यानं लष्कराचे दोन हजार ४०० जवान, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे १५० जवान, सीमा रस्ते संघटना, आयटीबीपी, एसएसबी आणि अरुणाचल प्रदेश पोलीस तात्काळ लष्कराची दोन चेतक आणि हवाई दलाचे एक एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या मदतीने कामाला लागले होते. परंतु, खराब हवामानामुळे ही शोधमोहीम अत्यंत मंद गतीनं सुरू होती. पूर्व कामेंग जिल्ह्याच्या सीमेजवळ काही हेलिकॉप्टरसदृश अवशेष विखुरल्याचे दोन सुखॉय विमानं आणि इस्रोच्या उपग्रहाने टिपले. तसंच, काही स्थानिकांनी विमानसदृश आकृती पाहिल्याची माहिती दिल्यानंतर शोधपथकाची वाटचाल त्या दिशेनं सुरू झाली. नागाजिजी या डोंगराळ भागात ६६ किमीच्या परिघातच शोधकार्य केंद्रीत केलं गेलं. ४ मे २०११ला तवांग जिल्ह्यात लोबोथांगजवळ त्यांच्या पवनहंस विमानाचे अवशेष आणि मृतदेह सापडले, त्यात त्यांच्यासह वैमानिक जे.एस. बाबर, टी.एस. मामिक, खांडू यांचे सुरक्षा अधिकारी येशी चोड्डाक आणि येशी लामू यांचा मृत्यू झाला.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा परिचय". 2011-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-04 रोजी पाहिले.
  2. ^ अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा मृत्यू[permanent dead link] सकाळ २०११-०५-०४
  3. ^ दोरजी खांडू यांचा अपघाती मृत्यू[permanent dead link] मटा ऑनलाइन वृत्त ४ मे २०११