तोकाइदो शिनकान्सेन
तोकाइदो शिनकान्सेन (जपानी: 東海道新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. १९६४ सालापासून कार्यरत असलेला हा जगामधील सर्वप्रथम द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. ५१५ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग जपानची राजधानी तोक्योला ओसाका ह्या प्रमुख शहरासोबत जोडतो. तसेच सॅन्यो शिनकान्सेन मार्गाद्वारे तोक्योपासून थेट फुकुओका शहरापर्यंत प्रवास करता येतो.
तोकाइदो शिनकान्सेन | |||
---|---|---|---|
फूजी पर्वताच्या जवळून जाणारी तोकाइदो शिनकान्सेन | |||
स्थानिक नाव | 東海道新幹線 | ||
प्रकार | शिनकान्सेन | ||
प्रदेश | जपान | ||
स्थानके | १७ | ||
कधी खुला | १ ऑक्टोबर १९६४ | ||
चालक | मध्य जपान रेल्वे कंपनी | ||
तांत्रिक माहिती | |||
मार्गाची लांबी | ५१५.४ किमी (३२० मैल) | ||
गेज | १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज | ||
विद्युतीकरण | २५ किलोव्होल्ट एसी | ||
कमाल वेग | २८५ किमी/तास | ||
|
इतिहास
संपादनदुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जपान देशाने झपाट्याने प्रगती केली व तेथील नॅरोगेजवर चालणारी रेल्वेसेवा अपूरी पडू लागली. तोक्यो ते कोबेदरम्यान धावणारी तोकायदो मार्गिका १९५० च्या दशकामध्ये पूर्णपणे वापरली जात होती व जपान रेल्वेचा तत्कालीन अध्यक्ष शिंजी सोगा ह्याने विजेवर धावणाऱ्या द्रुतगती रेल्वेची कल्पना उचलून धरली. एप्रिल १९५९ मध्ये तोक्यो ते ओसाकादरम्यान पहिल्या शिनकान्सेन रेल्वेच्या बांधकामाचे काम सुरू झाले. सुमारे २०,००० कोटी येन इतका खर्च अपेक्षित असलेल्या ह्या मार्गासाठी आलेला वास्तविक आलेला खर्च ४०,००० कोटी येन इतका होता. १ ऑक्टोबर १९६४ रोजी १९६४ उन्हाळी ऑलिंपिकच्या बरोबर १० दिवस आधी पहिली शिनकान्सेन रेल्वे धावली व तिने तोक्यो ते ओसाकादरम्यानचे ५१५ किमी अंतर ४ तासांत पार केले, ज्यासाठी विद्यमान रेल्वेगाडीला ६ तास ४० मिनिटे लागत असत. १९६५ साली हा वेळ तीन तास १० मिनिटांवर आणण्यात आला. तोकाइदो शिनकान्सेनमुळे ह्या दोन शहरांदरम्यान वाहतूकीमध्ये अमुलाग्र बदल घडून आला ज्यामुळे व्यापाराला प्रचंड चालना मिळाली. जलदगतीने वेळेवर धावणारी व अत्यंत आरामदायी प्रवासाचा आनंद देणारी शिनकान्सेन जपानी जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली व केवळ तीन वर्षांत सुमारे १० कोटी प्रवाशांनी शिनकान्सेनने प्रवास केला होता. २०१४ साली शिनकान्सेनच्या ५०व्या वर्धापन वर्षामध्ये तोकाईदो शिनकान्सेनवरील दैनंदिन प्रवासीसंख्या ३.९१ लाख इतकी होती.
प्रमुख शहरे
संपादनतोकाइदो शिनकान्सेन मार्ग जपानच्या तोक्यो, कानागावा, शिझुओका, ऐची, शिगा, गिफू, क्योतो व ओसाका ह्या राजकीय प्रदेशांमधून धावतो व जपानमधील खालील प्रमुख शहरांना राजधानी तोक्योसोबत जोडतो.
इंजिन व डबे
संपादनआजच्या घडीला तोकाइदो शिनकान्सेनवर १६ डबे असलेल्या ७०० प्रणालीच्या रेल्वेगाड्या वापरण्यात येतात. ह्या गाडीचा कमाल वेग ३०० किमी/तास इतका असून वळणावर देखील ही गाडी २७० किमी/तास इतक्या वेगाने जाऊ शकते. ह्यामुळे नोझोमी ही सर्वाधिक गतीची रेल्वेगाडी तोक्यो ते ओसाकादरम्यानचे अंतर केवळ २ तास व २२ मिनिटांमध्ये पार करते.