नरेंद्र दाभोलकर

बुद्धिवादी समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते
(डॉ.नरेंद्र दाभोलकर या पानावरून पुनर्निर्देशित)


नरेंद्र अच्युत दाभोळकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ - ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इ.स. १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र इ.स. १९८९ साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवार दि. २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्वर पूलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली.

नरेंद्र दाभोलकर
जन्म नरेंद्र
नोव्हेंबर १, इ.स. १९४५
सातारा
मृत्यू ऑगस्ट २०, इ.स. २०१३
पुणे
मृत्यूचे कारण मारेकऱ्यांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था मिरज वैद्यकीय महाविद्यालय
पेशा वैद्यकीय
प्रसिद्ध कामे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना
मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोली
ख्याती साधना (साप्ताहिक)
पदवी हुद्दा संपादक
कार्यकाळ १ मे १९९८ पासून निधन होईपर्यंत
पूर्ववर्ती वसंत बापट
धर्म हिंदू
जोडीदार शैला
अपत्ये मुक्ता दाभोळकर-पटवर्धन (कन्या)
डॉ. हमीद दाभोळकर (पुत्र)
वडील अच्युत लक्ष्मण दाभोळकर
आई ताराबाई अच्युत दाभोळकर
नातेवाईक डॉ. देवदत्त दाभोळकर व दत्तप्रसाद दाभोळकर (बंधू)
पुरस्कार पद्मश्री

वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोलकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. दाभोलकरानी शैला यांच्याबरोबर विवाह केला. त्याना मुक्ता आणि हमीद ही अपत्ये आहेत. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले. लग्न सोहळा व त्या मधील खर्च यावर ते सतत टीका करीत. आपल्या दोन्ही मुलांचे विवाह साध्या पद्धतीने केले.

शिक्षण

संपादन

नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.[]

सामाजिक कार्य

संपादन

बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 1998 पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा

संपादन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. []

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध ‘महाराष्ट्र अंनिस’ लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला. रिंगणनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी हा निषेध करण्यात आला. या रिंगणनाट्याच्या निर्मितीसाठी ज्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी घेतल्या, त्या कार्यशाळांचा आणि रिंगणनाट्यांचा वेध रिंगणनाट्य या पुस्तकात घेण्यात आला आहे.

साहित्य

संपादन
  • अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - राजहंस प्रकाशन
  • अंधश्रद्धा विनाशाय - राजहंस प्रकाशन
  • ऐसे कैसे झाले भोंदू - मनोविकास प्रकाशन
  • ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक - लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे साडेचारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.
  • झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
  • ठरलं... डोळस व्हायचंच - मनोविकास प्रकाशन
  • तिमिरातुनी तेजाकडे - राजहंस प्रकाशन
  • दाभोलकरांच्या दहा भाषणांची सी.डी.
  • प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे - डी.व्ही.डी, निर्माते - मॅग्नम ओपस कंपनी.
  • प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) - राजहंस प्रकाशन
  • भ्रम आणि निरास - राजहंस प्रकाशन
  • मती भानामती- राजहंस प्रकाशन (सहलेखक माधव बावगे)
  • विचार तर कराल? - राजहंस प्रकाशन
  • विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी - दिलीपराज प्रकाशन
  • श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)

दाभोलकरांच्या संस्था

संपादन

मृत्यू

संपादन

मला माझ्याच देशात पोलीस स्वतःच्या लोकांकडून संरक्षण घ्यायचे असेल तर मला काहीतरी चुकीचे वाटते, मी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत लढा देत आहे आणि हे कोणाविरुद्ध नाही तर सर्वांसाठी आहे.- पोलीस संरक्षण नाकारण्यावर दाभोलकर. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर (प्रचलित नाव ओंकारेश्वर पूल) अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालंगधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत.[]

मंगळवार २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी घरून निघाल्यावर दाभोलकर शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोलकर घटनास्थळीच कोसळले .
गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले
छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले. []

पुरस्कार

संपादन
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता.
  • समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्‍लब
  • दादासाहेब साखवळकर पुरस्कार
  • शिवछत्रपती पुरस्कार - कबड्डी
  • शिवछत्रपती युवा पुरस्कार - कबड्डी
  • पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तेर)
  • भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर)

दाभोलकरांच्या नावाचे पुरस्कार

संपादन
  • अमेरिकेतील न्यू यॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. पहिल्याच वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL)चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे.

दाभोलकरांच्या हत्येच्या घटनाक्रमावरील पुस्तके

संपादन
  • विवेकाच्या वाटेवर-उन्मादी कालखंडातील लढ्याची गोष्ट (डाॅ.हमीद दाभोलकर)

दाभोलकराँचे भूत

संपादन

श्याम पेठकर यांनी लिहिलेले दाभोळकरचे भूत या नावाचे एक नाटक हरीष इथापे यांनी दिग्दर्शित केले होते. समीर पंडित यांनी नाटकाची निर्मिती केली होती, आणि वैदर्भीय कलावंतांनी ते रंगभूमीवर आणले होते.

... उत्तर दाभोलकरांचे (पुस्तिका)

संपादन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सविस्तर मुलाखत त्‍यांच्या हत्येच्या तीन वर्षे आधी ‘प्रश्‍न तुमचा; उत्तर दाभोलकरांचे’ या शीर्षकांतर्गत झाली होती. श्रोत्यांच्या विविध शंकांचे त्यांनी नेमक्‍या शब्दांत निरसन केले होते. विनोद शिरसाठ यांनी ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीतल्या निवडक प्रश्‍नांचे संकलन या पुस्तिकेत करण्यात आले आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ दाभोलकर म्हणजेच अंनिस Archived 2015-09-28 at the Wayback Machine. या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  2. ^ "दाभोलकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार".
  3. ^ "नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या". 2013-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-20 रोजी पाहिले.
  4. ^ "... असा झाला नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला".
  • खरेखुरे (लेखसंग्रह), युनिक फीचर्स, २००६, संपादक सुहास कुलकर्णी, 'डॉ. नरेंद्र दाभोलकर', लेखक विनोद शिरसाठ, पाने ९५ ते ९९
  • ‘विवेकाच्या वाटेवर-उन्मादी कालखंडातील लढ्याची गोष्ट’ (डाॅ. हमीद दाभोलकर)

[[र्ग:पुण्यातील शास्त्रज्ञ ]]