बालगंधर्व रंगमंदिर (पुणे)

(बालगंधर्व रंगमंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील अग्रगण्य नाट्यगृह आहे. हे पुण्यातील जंगली महाराज रोडवर आहे. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन २६ जून १९६८ रोजी झाले. या नाट्यगृहाची मालकी सार्वजनिक असून त्याची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. नाट्यगृहाचे सभागृह बंदिस्त असून वातानुकूलित आहे. नाट्यगृहाच्या आवारात कलाकारांच्या निवासाची सोय आहे. रंगमंच ३०’ x ४४’ x २२’ या आकाराचा असून मंचासमोर मोठा दर्शनी पडदा आहे. प्रेक्षागृहाची क्षमता तळमजल्यावर ६६९ आसने व सज्ज्यात ३२० आसने इतकी आहे. नाट्यगृहाला लागून वरच्या मजल्यावर एक मोठे कलादालनही आहे, तेथे नित्यनियमाने पुस्तकांची, चित्रांची व अन्य कला वस्तूंची प्रदर्शने भरत असतात. नाट्यगृहाचे आवार बरेच मोठे असून तिथे थोडीफार बाग केली आहे. आवारात रिकामी जागाही भरपूर असून तिथे मौसमी वस्तूंच्या विक्रीची दुकाने भरवली जातात.