रिंगणनाट्य हे नाटकाचा एक प्रकार आहे. रिंगणनाट्य हे पथनाट्यासारखे असते.

अतुल पेठे व राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंगमंच रिंगणनाट्याची स्थापना झाली.

रिंगणनाट्याचा इतिहाससंपादन करा

अतुल पेठे, राजू इनामदार व अश्विन फडके यांनी कार्यकर्त्यांना नाटकाबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी काही कार्यशाळा घेण्याचे ठरविले. शिराळा-सांगली, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर अशा चार ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. कार्यशाळांत एकूण २५० कलाकार - कार्येकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट पाडून अंधश्रद्धेचे परिणाम, कारणे, उपाय लिहिण्यास सांगितले गेले. ते लिहिल्यानंतर प्रत्येक गटाने त्याचे सादरीकरण केले. त्‍यानंतर शब्द कसे स्पष्ट उच्चारावे यासाठी व्यायाम घेण्यात आला. व्यायामानंतर एकेका गटाला नाटकांचे विषय देण्यात आले. प्रत्येक गटाने नाटके लिहिली आणि बसविलीदेखील. शेवटी बसविलेल्या नाटकांची सादरीकरणे झाली. अतुल पेठे व राजू इनामदार यांनी त्या नाटकांना योग्य साच्यात बसविले व मूर्त रूप दिले. या नाटकांना रिंगणनाट्य असे नाव दिले गेले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर, त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्यासाठी रिंगण नाट्य चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली आणि दोन वर्षांत ती फोफावली. २७-२-२०१६ रोजी पुण्यात या चळवळीतील अंनिसच्या इस्लामपूर शाखेच्या 'सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम' या रिंगणनाट्याचा १२०वा, पिंपरी-चिंचवड शाखेच्या 'अस्लमबाबा' नाट्याचा १००वा आणि पुणे शाखेच्या 'ऐसे कैसे झाले भोंदू' चा ६५वा प्रयोग सादर झाला.

काही प्रसिद्ध रिंगणनाट्येसंपादन करा

  • अंधश्रद्धा
  • अस्लमबाबा (१००हून अधिक प्रयोग)
  • आधुनिक अंधश्रद्धा
  • ऐसे कैसे झाले भोंदू (६५हून अधिक प्रयोग)
  • चेटूक
  • सॉक्रिटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम
  • सापडलं रे सापडलं

रिंगणनाट्य (पुस्तक)संपादन करा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध ‘महाराष्ट्र अंनिस’ लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला. रिंगणनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी हा निषेध करण्यात आला. या रिंगणनाट्याच्या निर्मितीसाठी ज्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी घेतल्या, त्या कार्यशाळांचा आणि रिंगणनाट्यांचा वेध ‘रिंगणनाट्य’ या पुस्तकात घेण्यात आला आहे.