गायमुख देवस्थान, भंडारा

महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गायमुख हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावाच्या टोकावर अत्यंत पवित्र भगवान शिवाचे मंदिर आहे. मध्यप्रदेशातील पंचमढी येथील भगवान शिव मंदिर ‘मोठा महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे. तर गायमुख हे देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लहान महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. गाईच्या मुखातून पर्वतीय झरा सतत वाहून एका जलकुंभात पडते. यावरून या स्थळाचे नाव गायमुख असे पडले आहे.

यात्रा

संपादन

सातपुडा पर्वत रांगेत निसर्गसौंदर्याने नटलेले गायमुख प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, तुमसर शहरापासून केवळ २० किलोमीटर अंतरावर आहे. येथे दरवर्षी माघ महिन्याच्या माधकृष्ण चतुर्थदशीला[] म्हणजेच महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. ही यात्रा ६ दिवस चालते. या यात्रेला २०० वर्षांचा इतिहास आहे. नागपूर येथील रघुजी राजे भोसले आणि भंडारा येथील भोसलेचे सुभेदार यादवराव पांडे यांनी ही यात्रा सुरू केली. यांच्या काळापासून यात्रा भरत असून, पांडे यांची नवीन पिढी व जिल्हा प्रशासनातर्फे येथे यात्रेची संपूर्ण व्यवस्था करण्यात येते. या यात्रेच्या निमित्ताने येथे महादेवाचा पोहा घेऊन लाखो भाविक येतात. महाशिवरात्री निमित्त पाच दिवस भरणाऱ्या यात्रेत विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक नवस फेडण्यासाठी यात्रेत येत असतात. या यात्रेत शेतकऱ्यांना उपयोगी शेती अवजारे, घरोपयोगी साहित्य, पूजेचे साहित्य, खेळणी, हॉटेल्स, खाद्यपदार्थ, फळे, चहानाश्ता, रसवंती, कपडे, सौंदर्य प्रसाधने, भांडी, करमणुकीचे साहित्य अशा नानाविध प्रकारची दुकाने सायकल स्टँड स्थानिक व परिसरातील नागरिक लावतात. येणारे भाविक उत्साहाने साहित्य खरेदी करतात. त्यामुळे आदिवासीबहुल गावकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळते.[]

भगवान शिवाच्या प्रति श्रद्धा असणारे भक्त अपत्य होण्यासाठी नवस बोलतात. भक्तांची ही मागणी पूर्ण झाली की, आपल्या मित्रपरिवारासह फुल महाशिवरात्रीला महादेवाच्या यात्रेकरिता जातात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने गायमुख यात्रेला जाणाऱ्या भाविक भक्तांच्या समूहाला "पोहा"[] या नावाने संबोधले जाते. हा भक्त मंडळींचा पोहा गावातून निघत असताना संपूर्ण गावातील मंडळी यात्रेनिमित्त जाणाऱ्या भक्तांना नमस्कार करून योग्य ती दान-दक्षिणा करतात. त्यासोबत यात्रेनिमित्त जाणाऱ्या महिला भक्तांना त्यांच्या झोळीत पोहे टाकून त्यांनाही योग्य ते दान दिले जाते केली जाते. यात्रेला जाणाऱ्या भक्तांना 'भगत' या नावाने संबोधले जाते. या भगतांच्या झोळीत गावातील लोक पाहे व गूळ देन म्हणून घालतात. या भक्तांच्या पोह्यामध्ये एका नंदीचाही समावेश असतो. हा नंदी यात्रेला न्यावे किंवा नाही हे त्यांच्या नवसाच्या स्वरूपावर अवलंबून असते. ‘पोहा’ मध्ये नंदीबाईल (पवित्र बैल), हलगी आणि बासरी यासारख्या वाद्यांचा आवाज आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या भाविकांचा समूह, जेव्हा ते शिव मंदिराकडे जातात तेव्हा जयघोष करतात. विदर्भातील प्रसिद्ध शिव मंदिरांमध्ये भाविक लाखोंच्या संख्येने नवस फेडण्यासाठी पोहा घेऊन जातात.[] महादेवाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात.

इतिहास

संपादन
 
सातपुडा पर्वताच्या रांगांतून गाईच्या मुखातुन पडणारे पानी

प्राचीन काळात गायमुख जवळ असलेल्या जंगलात एक ऋषी तपश्चर्या करत होते. ते शिवाचे निश्चिम भक्त होते. त्यांच्या तपश्चर्यलेला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिला. या ठिकाणी सातपुडा पर्वताच्या रांगांतून झिरपणारे पाणी गाईच्या मुखातुन पडते. म्हणूनच या ठिकाणचे गायमुख हे नाव प्रसिद्ध झाले. गाईच्या मुखातुन पडणाऱ्या या जलधारेच्या खाली भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने स्नान करतात. येथे पंचमुखी भोला शंकर मंदिरापासून पुढे, पंचमुखी भोलाशंकर, हनुमान, अंबाबाई, गोरखनाथ यांची मंदिरांचे मंदिर आहे. येथील पंचमुखी भोलाशंकराचे मंदिर भारतातील विद्यमान १८ मंदिरांपैकी एक आहे.पहाडावर गोरखनाथ मंदिरात जायला येथे एक छोटासा पायऱ्यांचा रस्ता सुरू आहे. या पायऱ्या चढून भाविक पहाडावर पोहचतात याला "चौऱ्यागड" असे म्हणतात. भक्त चौऱ्यागडावर जातात, पूजा करतात.[][]

१९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने या स्थळाला ‘क’ वर्ग म्हणून १९९९ मध्ये मंजूरी देण्यात आली आहे. महाशिवरात्रीला येथे मध्य प्रदेश व विदर्भातून मोठ्या संख्येने येथे भाविक येतात.[] येथे पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत.[]

पार्वतीचा विवार

संपादन

सातपुडा पर्वतावर येथे एक पुरातन लेणी आहे. या लेण्याला ‘पार्वतीचा विवार’ किंवा 'पार्वतीचा हिवर' म्हणून ओळखले जाते. नैसर्गिक गुहा ग्रॅनाइट आणि सिलिकाच्या जोडीने बनलेली आहे. या गुहेत ८० फूट लांबीचे दोन बोगदे आहेत. गुहेत पार्वतीच्या मूर्ती आहेत. हा पार्वतीची प्राचीन विहीर पहाडावर असून, भाविक येथे दर्शनासाठी लांब अंतर पायी चालून पोहचतात.[]

विदर्भाचे नैनिताल

संपादन

भंडारा जिल्ह्यातील भाविक भक्तांना या स्थानाबद्दल माहिती असली तरीही घनदाट जंगलात असल्यामुळे गायमुख हे ठिकाण फारसे प्रसिद्ध नाही आणि महाराष्ट्रातील लोकांना या स्थानाबद्दल फारशी माहिती नाही. या जागेला "विदर्भाचे नैनिताल" म्हणूनही मानले जाते, कारण उन्हाळ्यातील या ठिकाणचे तापमान विदर्भातील सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत खूपच कमी असते. मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे.[]

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Marathi, TV9 (2022-02-28). "Gaimukh Temple| यंदाही आईपासून दूर, गायमुख यात्रा रद्द, देवळाच्या दरवाजाजवळ पूजा करून भाविक आल्या पावली परत". TV9 Marathi. 2023-01-06 रोजी पाहिले.
  2. ^ author/lokmat-news-network (2021-03-13). "इतिहासात पहिल्यांदा महाशिवरात्रीलाच गायमुख देवस्थान कुलूप बंद". Lokmat. 2023-01-06 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d author/lokmat-news-network (2018-02-14). "पोहा चालला महादेवा. महादेवाला जातो गा." Lokmat. ६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ ‎खबरबात. "सुप्रसिद्ध, ऐतिहासिक प्रतापगड यात्रेवर कोरोणाचे सावट". www.khabarbat.in (english भाषेत). 2023-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-01-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Gaimukh 'Nainital' of Vidarbha waiting for development". www.thehitavada.com (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  6. ^ author/lokmat-news-network (2022-02-28). "लहान महादेव गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला". Lokmat. 2023-01-06 रोजी पाहिले.
  7. ^ author/lokmat-news-network (2020-08-21). "तुमसर तालुक्यातील ऐतिहासिक व पौराणिक पर्यटनस्थळ दुर्लक्षित". Lokmat. 2023-01-06 रोजी पाहिले.