गाब्रिएल बोनर "कोको" शनेल(फ्रेंच:Gabrielle Bonheur "Coco" Chanel;) (ऑगस्ट १९, इ.स. १८८३ - जानेवारी १०, इ.स. १९७१), ही नामांकित फ्रेंच फॅशनकार, फॅशन-संकल्पक होती. तिची नवमतवादी विचारसरणी, पुरुषांच्या कपड्यांच्या धाटणीवर बेतलेल्या फॅशनी आणि तिच्या उत्पादनांमधून डोकावणारा 'महागडा साधेपणा' इत्यादी बाबींमुळे ती विसाव्या शतकातील एक महत्त्वाची व्यक्ती मानली जाते. आज जगप्रसिद्ध असलेल्या शनेल या ब्रॅंडाची ती संस्थापक होय. टाईम मासिकाच्या 'शतकातील १०० महत्त्वपूर्ण व्यक्तीं'च्या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव फॅशनकार होती, इतका तिचा फॅशनजगतात दबदबा होता.

जीवन संपादन

कोको शनेल हिचा जन्म सोम्युअर, फ्रान्स येथे झाला. अल्बर्ट शनेल आणि ज्यॅन्न देवॉय या कष्टकरी वर्गातील दांपत्याची कोको ही दुसरी मुलगी होय. तिच जिथे जन्म झाला, त्या इस्पितळातील कर्मचारी अशिक्षित होते. त्यांना तिच्या आडनावाचे योग्य स्पेलिंग न सांगता आल्याने तिचे आडनाव 'शास्नेल' असे नोंदले गेले. कोको शनेल पुढे प्रसिद्ध झाल्यावर या चुकीमुळे तिच्या चरित्रकारांना तिची मूळ माहिती शोधून काढणे जवळपास अशक्य झाले होते.

तिच्य आईवडिलांचा विवाह इ.स. १८८३मध्ये झाला. तिला १. ज्युली (इ.स. १८८२ - इ.स. १९१३) २. आन्त्वानेत (जन्मः इ.स. १८८७) ३. अफ्फांस (जन्मः इ.स. १८८५) ४. लूशीअन (जन्मः इ.स. १८८९) ५. ऑगस्टीन (जन्म आणि मृत्यू: इ.स. १८९१) अशी पाच भावंडे होती. इ.स. १८९५ साली, कोको १२ वर्षांची होती तेव्हा तिची आई क्षयाने वारली आणि वडिलांनी कुटुंबाचा त्याग केला. यामुळे कोको शनेल हिने पुढली सहा वर्षे ओबॅझिन येथील रोमन कॅथलिक मॉनेस्टरीच्या अनाथाश्रमात व्यतीत केली व तिथे तिने शिवणकामाचे शिक्षण घेतले. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये ती नातेवाइकांकडे राहावयास जाई तेव्हा नात्यातल्या बायकांनी तिला शिवणकामातले बरेच बारकावे शिकविले.

कोको अठरा वर्षांची झाल्यावर नियमांप्रमाणे तिला अनाथाश्रम सोडावा लागला. ती मूलॉं सर्कशीत कॅबरे गायिका म्हणून रुजू झाली. या काळात तिने विची व मूलॉं येथील मद्यालयांमध्ये कार्यक्रम केले आणि येथेच तिला 'कोको' हे टोपणनाव मिळाले.

बाह्य दुवे संपादन

  • "शनेल ब्रॅंडाचे अधिकृत संकेतस्थळ" (फ्रेंच, इंग्लिश, and बहुभाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "फॅशन संकल्पक प्रोफाइल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)