केसरी (वृत्तपत्र)

मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र
(केसरी, वृत्तपत्र या पानावरून पुनर्निर्देशित)

केसरी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. जानेवारी ४, इ.स. १८८१ रोजी बाळ गंगाधर टिळकांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली.



केसरी
विकिस्रोत लोगो बाळ गंगाधर टिळक यांचे, अथवा यांच्या बद्दलचे साहित्य मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:

केसरीच्या पहिल्या अंकाचे मुखपृष्ठ
प्रकारदैनिक

मालककेसरी वृत्तपत्र समूह
स्थापनाजानेवारी ४, इ.स. १८८१
भाषामराठी
मुख्यालयभारत पुणे, महाराष्ट्र, भारत

संकेतस्थळ: डेलीकेसरी.कॉम


स्थापना

संपादन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृतीचा एक महत्त्वाचा भाग या विचारांनी १८८१ मध्ये 'केसरी' हे वृत्तपत्र सुरू केले. 'केसरी'चे प्रथम संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ पर्यंत काम केले.

गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पाहू लागले.[]

वाटचाल

संपादन

स्वतंत्र्य लढ्यातील योगदान

संपादन

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात टिळक व गांधी या दोन्ही पर्वात आणि त्यानंतरच्या कालखंडात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, राज्यातील जी वैचारिक वर्तमानपत्रे समाज जागृतीच्या कार्यात अग्रेसर होती, त्यात 'केसरी' वृत्तपत्रास जनमानसाने सातत्याने प्रातिनिधिकरीत्या वैशिष्ट्यपूर्ण स्थान दिले, ही या वृत्तपत्राची खासीयत आहे. 'केसरी'ने राज्यातील जनतेच्या विविध प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचे कामही केले आहे. 'केसरी' वृत्तपत्राने वर उल्लेखिल्याप्रमाणे त्या कालखंडात जे महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यास तोड नाही. 'केसरी', 'ज्ञानप्रकाश' व 'नवा काळ' ही वृत्तपत्रे साधारणतः तालुका वजा शहरात येत असत; परंतु दळणवळणांच्या सीमित सोयीमुळे त्या काळच्या मुंबई राज्यात सर्वच ठिकाणी वृत्तपत्रे उपलब्ध नसत. त्या काळात हल्ली इतके वर्तमानपत्र वाचावयास मिळणे हे सहज सुलभ नव्हते. ठराविक व्यक्तींकडेच व वर्तमानपत्रांच्या दुकानांतही मोजक्याच प्रती असत. राजकीय संक्रमणाचा कालखंड असल्यामुळे उपलब्ध वर्तमानपत्रांवर वाचकांची गर्दी होत असे.

'केसरी'च्या वृत्तपत्रीय कार्याचा आजपर्यंतच्या १३० वर्षांच्या या प्रदीर्घ काळातील वाटचालीचे अवलोकन करता इतिहासाचा अधिक धांडोळा घेणे मला क्रमप्राप्त वाटते. यातील जवळ जवळ ८० वर्षांच्या कालावधीत प्राधान्याने स्वातंत्र्यप्राप्ती व त्यानंतरचे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या वातावरणात 'केसरी'चा काळ व्यतीत झाला आहे.

त्या काळात दृक्‌श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. अगदी १९६० पर्यंत रेडिओसुद्धा ग्रामीण भागात फारच दुर्मिळ होते. त्यामुळे जनसामान्यांसाठी प्रसारमाध्यमांचे काम 'केसरी' व इतर काही वृत्तपत्रांनी पार पाडले. स्वातंत्र्यप्राप्ती व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या व्यतिरिक्त देशात व राज्यात इतरही खूपच समस्या व प्रश्न होते. या प्रश्नांना ऐरणीवर आणण्याचे काम 'केसरी'ने केले. मुंबई-पुण्यासारखी मोठी शहरे वगळता तालुकास्तरीय व ग्रामीण भागात बहुसंख्य जनतेला जीवन जगतांना प्लेग, देवी, नारू यांसारख्या रोगांच्या साथी, वैद्यकीय सुविधांचा अभाव, वारंवार पडणारे तीव्र दुष्काळ, तगाई, चारा खावटी, कर्जवसुली, सावकारी पाश, चलनांची टंचाई, अत्यंत अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, दळणवळणांसाठी आवश्यक असणाऱ्या पक्क्या रस्त्यांची आवश्यकता, अंधश्रद्धा, जुन्या कालबाह्य चालीरीती, रूढी परंपरा, बालविवाह, केशवपन, सतीची चाल, पुनर्विवाह व सामाजिक विषमता, तुटपुंजे संशोधन, लोकजागृतीमधील अभाव इत्यादी भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत होता. ग्रामीण भागातून मुख्यत्वे धान्यटंचाई, अपुरे चलन व निरक्षरता या सर्वांत मोठ्या समस्या होत्या. एकूण समाजातील मूठभर सधन व थोडाफार शिक्षित नोकरवर्ग सोडला तर सर्वत्र सामाजिक समस्यांनी, प्रश्नांनी घेरलेले, अशी राज्य व राष्ट्राची परिस्थिती होतीच होती. या सर्व सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक व आर्थिक पातळ्यांवर बहुसंख्य सामान्य जनतेचे जीवनमान असहाय स्थितीत होते. याचीही आजच्या चंगळवादी जीवनशैलीत जगणाऱ्यांना व जगू पाहणाऱ्या समाजाला कल्पना करता येणार नाही; परंतु यातील काही थोडाफार काळ मी पाहिलेला आहे. 'केसरी'ने त्या काळातील या समाज जीवनाच्या स्थितीवर सातत्याने, प्रसारमाध्यमाची जी अत्यावश्यक भूमिका असावी लागते, ती 'केसरी' या वृत्तपत्राने सातत्याने मांडलेली आहे. मी या बाबीत माझ्या विद्यार्थिदशेपासून साक्षीदार राहिलेलो आहे. लोकमान्यांची 'केसरी'बाबतची भूमिका, राजकीय चळवळीस हातभार लागून राजकीय स्वातंत्र्याच्या उद्दिष्टपूर्तीनंतर सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याचे प्रवाह या राष्टात व राज्यात वाहू लागणे अपेक्षित होती. 'केसरी'ने केवळ वृत्त किंवा लोकशिक्षण हे उद्दिष्ट न ठेवता जनतेला राष्टअभ्युदयासाठी कार्यप्रवण करणे हेही महत्त्वाचे कार्य पार पाडले आहे. 'केसरी'ने विचारवंतांवर छाप पाडली असे खास करून म्हणता येईल. टिळक युगात वृत्तपत्रातून ब्रिाटिश साम्राज्यशाही विरुद्ध स्वातंत्र्यचळवळीस अनुकूल विचार मांडीत राहणे ही खासच धैर्याची बाब होती. भारतात ब्रिाटिश राज्यकर्त्यांची भूमिका वृत्तपत्र स्वातंत्र्याला खुलेपणाची नव्हती. टिळकांनी ब्रिाटिशांशी झगडून वृत्तपत्र स्वातंत्र्य मिळविले. त्याबाबत त्यांच्यावर खटलेही झाले. या बिकट परिस्थितीतून 'केसरी'ची वाटचाल सुरूच होती.

टिळक युगानंतर 'केसरी'ने गांधीयुगातून जात स्वातंत्र्य मिळेपर्यंत कठीण परिस्थितीतून लोकजागृतीचे महत्त्वाचे कार्य सुरूच ठेवले. न. चि. केळकरांनीही विविध विषयांशी संबंधित वैचारिक लिखाण करून 'केसरी'ची प्रतिष्ठा वाढविली. त्याद्वारे सामाजिक विचारधनात मोलाची भर घातली. आचार्य जावडेकर यांनी गांधी आणि टिळक या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या विचारांचा सुयोग्य समन्वय घडवून समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला.

देशाला स्वातंत्र्य मिळाले. 'केसरी' व इतर बऱ्याच वृत्तपत्रांची जनजागृतीच्या पर्वाची विजयी सांगता झाली. लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक तसे १९४५ पासून 'केसरी'च्या कामात संपादन करीत होते; परंतु देशात फाळणीच्या दंगली, गांधीहत्या या घटना घडून राष्टाला स्थिरतेचे वातावरण मिळाले नव्हते. तशातच १९६० च्या दशकात 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या चळवळीने जोर धरला. त्या काळात 'केसरी'ने संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह महाराष्ट्रातील जनतेच्या भावभावना प्रतिबिंबित केल्या. १ मे १९४६ रोजी झालेल्या बेळगाव येथील साहित्य संमेलनात ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रथम ठराव सर्वप्रथम १४ मे १९४६ला प्रकाशित केला. त्यानंतरची ही चळवळ पुढे सुरू राहून १ नोव्हेंबर १९५६ला गुजरात-महाराष्ट्राचे संयुक्त द्विभाषक राज्य स्थापन झाले. या चळवळीत एकंदर १०५ जण हुतात्मा झाले. नंतर १ मे १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. हा इतिहास एवढ्या विस्ताराने सांगण्याचे कारण, की स्वातंत्र्य चळवळीनंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची चळवळ हीदेखील महत्त्वाची चळवळ होती. यासाठीही 'केसरी'ने मोठी भूमिका बजावली.

'केसरी'च्या कार्यभारात दीपक जयवंतराव टिळक व त्यांचे पुत्र रोहित टिळक यांचा मोठा वाटा आहे. जयंतराव टिळकांनी किल्ल्यांच्या परिक्रमाची आवड जोपासली होती. वाचकांमध्येही किल्ल्याविषयीच्या पर्यटनासाठीची आवड त्यांनी निर्माण केली. दीपक टिळकांनी जयंतरावांची विचारधारा टिकवून ठेवत, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत 'केसरी'चे रूप पालटविले. व हा केसरी लोकांना खूप उपयोगी झाला[]

ऐतिहासिक दस्तावेज

संपादन

लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख हे इतिहासाच्या अवलोकनासाठी आणि संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांचे हे संदर्भमूल्य जाणून केसरी-मराठा संस्था आणि राज्य मराठी विकास संस्था यांनी संयुक्त प्रकल्प हाती घेऊन या १९२२ पासून १९३० पर्यंत प्रसिद्ध झालेलल्या लेखांचे ४ खंड डिजिटल स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.[][][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ लेले, रा. के. (१९७४). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉंटिनेंटल प्रकाशन.
  2. ^ Google's cache of शंकरराव कोल्हे Archived 2008-10-12 at the Wayback Machine. It is a snapshot of the page as it appeared on 9 Jan 2010 05:35:56 GMT.
  3. ^ "लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख - खंड १ ला" (PDF). राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख - खंड २ रा" (PDF). राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख - खंड ३ रा" (PDF). राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ. १९ ऑगस्ट २००१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  6. ^ "लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख - खंड ४ था" (PDF). राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे

संपादन