इटलीतील रिनैसाँ

(इटलीतील प्रबोधनकाळ या पानावरून पुनर्निर्देशित)

  

इटलीतील रिनैसाँ
वरुन घड्याळाच्या काट्यानिशी:
  1. मोना लिसा -- लिओनार्दो दा विंची
  2. रिनैसाँचे उगमस्थळ असलेले फिरेंझे शहर
  3. व्हेनेझियामधील पलाझ्झो दुकाले
  4. रोममधील सेंट पीटर्स बेसिलिका. रिनैसाँमधील सर्वात ख्यातनाम वास्तू.
  5. गॅलिलियो गॅलिली -- शास्त्रीय पद्धत रूढ करणारा तोस्कानाचा शास्त्रज्ञ, जस्टस सस्टेरमान्सने १६३६मध्ये काढलेले चित्र
  6. माकियाव्हेल्ली -- इल प्रिंत्सिपे (द प्रिन्स किंवा राजकुमार) ग्रंथाचा लेखक. सांती दि तितोने १५५५च्या सुमारास काढलेले चित्र
  7. क्रिस्तोफोरो कोलोम्बो -- दूरपूर्वेकडे जाण्यासाठी पश्चिमेकडून समुद्रीमार्गाने निघालेला जिनोआचा दर्यासारंग. याच्या सफरींनंतर अमेरिका खंडांवर पाश्चिमात्यांनी वसाहती केल्या. १५१९मध्ये सेबास्तियानो देल पिओंबोने काढलेले मृत्युपश्चात चित्र
  8. क्रिएझिओनी दि आदामो (आदमची निर्मिती) -- मिकेलेंजेलोने काढलेले चित्र
तारीख १४ वे शतक१७ वे शतक
स्थान इटली
सहभागी इटालियन लोक
Outcome

युरोपचे मध्य युगातून आधुनिक युगात अवतरण

इटलीतील रिनैसाँ( इटालियन:रिनास्सिमेंतो) हा इटलीच्या इतिहासातील १४वे ते १६व्या शतकादरम्यानचा काळ होता. हा कालावधी व्यापक युरोपीय रिनैसाँचा प्रारंभिक विकास समजला जातो. या रिनैसाँ किंवा पुनर्जागरणाद्वारे पश्चिम युरोप मध्य युगापासून आधुनिकतेकडे गेला. चिन्हांकित केले होते. काही संशोधकांच्या मते रिनैसाँ १३००-१६०० दरम्यानचा काळ होता. रिनैसाँ या फ्रेंच शब्दाचा अर्थ पुनर्जागरण किंवा पुनर्जन्म असा. इटलतील रिनैसाँच्या इतिहासकार जॉर्जियो व्हासारीने रिनासिटा (पुनर्जन्म) हा शब्द १५५० मध्ये त्यांच्या ले व्हिते दे पिउ एक्केलांती पित्तोरी, स्कुल्तोरी ए आर्कितेत्तोरी (सर्वोत्कृष्ट चित्रकार, शिल्पकार आणि वास्तुविशारदांचे जीवन) या पुस्तकात वापरला. ही संज्ञा १९व्या शतकात जूल्स मिशेलेट आणि जेकब बर्कहार्टच्या लेखनानंतर प्रचलित झाली

१५१२मध्ये लिओनार्दो दा विंची, इटलीचा बहुआयामी विद्वान

इटलीतील आणि पर्यायाने युरोपातील रिनैसाँची सुरुवात मध्य इटलीमधील तोस्काना प्रांतात झाली. यातही फिरेंझे शहरात हे केंद्रित होते. फिरेंझेचे प्रजासत्ताक हे इटलीच्या द्वीपकल्पातील अनेक शहर-राज्यांपैकी एक होते. युरोपीय राज्यकर्त्यांना पतपुरवठा करून आणि भांडवलशाही आणि बँकिंगमधील अनेक सुधारणांच्या जोरावर फिरेंझेने युरोपभर आर्थिक आणि राजकीय महत्त्व मिळवले होते. [] रिनैसाँ तेथून व्हेनिसमध्ये पसरले. भूमध्यसागरातील आर्थिक आणि राजकीय शक्तीचे केन्द्र असलेल्या या शहरातून पूर्वेकडील देशांशी होणारा सागरी व्यापार रिनैसाँचा अधिक प्रसार झाला. १२७१-९५ दरम्यानच्या मार्को पोलोच्या प्रवासामुळे रिनैसाँ पूर्वेकडील व्यापार मार्गांद्वारे पसरला. पोपच्या राज्यांवर आणि रोमच्या संस्कृतीवर रिनैसाँचा मोठा प्रभाव पडला. याच सुमारास दुसरा ज्युलियस आणि दहाव्या लिओ या मानवतावादी पोपनी रोमचेही पुनर्नवीकरण केले होते. या पोपनी वारंवार इटलीतील राजकारणात ढवळाढवळ केली होती.

चित्रकला, वास्तुकला, शिल्पकला, साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शोध यांतील झपाट्याने झालेल्या विकासासाठी इटालियन रिनैसाँ प्रसिद्ध आहे. 15 व्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन राज्यांमध्ये झालेल्या लोदीच्या तहकाळात (१४५४-१४९४) इटली या सर्व क्षेत्रांमध्ये युरोपातील आघाडीचा देश झाला. १६व्या शतकाच्या मध्यावर इटलीतील रिनैसाँ शिखरावर पोहोचले. त्यानंतर देशांतर्गत लढाया आणि परकीय आक्रमणांमुळे हा प्रदेश पुढील ६०-६५ वर्षे (१४९४-१५५९) अशांततेत गुंतला. तरीही इटलीतील रिनैसाँच्या कल्पना आणि आदर्श उर्वरित युरोपमध्ये पसरले. १५व्या शतकाच्या उत्तरार्धापासून रिनैसाँचा पुढील कालखंड समजला जातो. या काळात सागरी प्रजासत्ताकांतील इटालियन खलाशांनी युरोपीय सम्राटांच्या आश्रयाने, शोध युगाची सुरुवात केली. स्पेनच्या दुसऱ्या इसाबेलाने प्रायोजित केलेला क्रिस्तोफोरो कोलोंबोच्या तीन सफरी यांपैकी सर्वात प्रसिद्ध आहेत. त्यात्वारे अमेरिकेमध्ये युरोपीय वर्चस्वाचा पाया घातला. याशिवाय फ्रांसकडून जियोव्हानी दा व्हेराझ्झानो, स्पेनकडून अमेरिगो व्हेस्पुच्ची आणि इंग्लंडकडून जॉन कॅबट यांनी अनेक शोधमोहिमा केल्या. रिनैसाँ काळत इटलीमध्ये फॅलोप्पियो, तार्तालिया, गॅलिलिओ आणि टॉरिसेली यांसारख्या इटालियन शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली तर कोपर्निकस आणि वेसालिअस सारख्या परदेशी लोकांनी इटलीतील विद्यापीठांमध्ये काम केले. []

रिनैसाँ काळातील लिओनार्दो दा विंची, मिकेलेजेलो, राफेल, डोनाटेलो, जिओटो, मासासिओ, फ्रा अँजेलिको, पिएरो, पेरेउगॅलिनो यांसारख्या ख्यातनाम कलाकारांनी त्यानंतरची अनेक शतके युरोपीय कलांवर दाट प्रभाव टाकला. या काळातील स्थापत्यांमध्ये कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे, रोममधील सेंट पीटर बॅसिलिका आणि रिमिनीमधील तेम्पियो मालातेस्तियानो तसेच अनेक खाजगी घरांचा समावेश आहे. रिनैसाँ काळातील इटालियन संंगीतकारांत जियोव्हानी पियर्लुगी दा पॅलेस्ट्रिना आणि रोम आणि व्हेनेझिया शैलीच्या अनेकांचा समावेश आहे. याच वेळी फिरेंझेमध्ये क्लाउदियो माँतेव्हेर्दी या ऑपेरा गायकाने जम बसविला गॅलिलिओ, माकियाव्हेली, जिओर्डानो ब्रुनो आणि पिको देल्ला मिरांदोला सारख्या विचारवंतांनी निसर्गवाद आणि मानवतावादावर भर दिला आणि अंधविश्वास आणि विद्वत्वाद विद्वानवाद नाकारला.

मेदिचींच्या सत्ताकालातील फिरेंझे

संपादन

१४व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत फिरेंझे शहरावर आल्बिझ्झी घराण्याची सत्ता होती. १२९३मध्ये काढलेल्या अध्यादेशांद्वारे फिरेंझेचे प्रजासत्ताक तयार झाले. यानंतरच्या भरभराटीच्या काळात शहरात अनेक महाल आणि राजवाडे बांधले गेले. [] १२९८मध्ये बॉन्सिन्योरिस या युरोपमधील अग्रगण्य सावकार कुटुंबांने दिवाळे जाहीर केल्यावर युरोपमधील सावकारीचे केन्द्र सियेना शहरातून फिरेंझेला आले.

१५१८-१५२० दरम्यान याकोपो पोर्तोमो ने काढलेले कोसिमो दे मेदिचीचे व्यक्तिचित्र
लॉरेंझो दे मेदिची

फिरेंझेमध्ये मेदिची कुटुंबाने आल्बिझ्झींना आव्हान दिले. प्रथम जियोव्हानी दे मेदिची आणि नंतर त्याचा मुलगा कोसिमो दे मेदिची यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बांको दे मेदिची ही त्याकाळची युरोपातील सगळ्यात मोठी बँक चालवली आणि त्याद्वारे फिरेंझे आणि इतरत्र उद्योगांवर नियंत्रण ठेवले. १४३३मध्ये आल्बिझ्झींनी कोसिमोला हद्दपार केले. त्या पुढच्या वर्षी फिरेंझेमध्ये मेदिची समर्थकांचे बहुमत असलेले सिन्योरिया (प्रादेशिक प्रशासन) निवडून आल्यावर कोसिमो फिरेंझेला परतला. मेदिचींनी लगेचच शहरावर पकड घेतली आणि पुढची ३०० वर्षे ती तशीच राहिली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली फिरेंझेने इंग्लंड, नेदरलँड्स, फ्रांस यांच्याशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले, जे पुढे रिनैसाँ पसरविण्यास कामाला आहले []

फिरेंझेच्या प्रजासत्ताकावरील मेदिचींच्या सत्तेच्या शहरात स्थिरता आणि समृद्धी होती व विशेषतः कोसिमो आणि लॉरेंझे दे मेदिची नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. फ्रान्सिस्को स्फोर्झा यांच्यासोबत लोदीच्या शांततेसाठी वाटाघाटी करणे आणि मिलानबरोबरचे अनेक दशकांचे युद्ध संपवणे आणि उत्तर इटलीच्या बहुतांश भागात स्थिरता आणणे ही त्यांची सर्वात महत्त्वाची कामगिरी होती. कोसिमो हे कलांचे एक महत्त्वाचे संरक्षक होते, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे, त्यांनी मांडलेल्या प्रभावशाली उदाहरणाद्वारे.

लॉरेंझो दे मेदिची

१४६९मध्ये कोसिमोचा २१ वर्षीय नातू लॉरेंझोकडे फिरेंझेच्या सत्तेची सूत्रे गेली. मानवतावादी परंपरेत लहानपणापासूनच शिक्षण घेतलेल्या लॉरेंझोने रिनैसाँमधील कला व कलावंतांना भरभरून आर्थिक आणि इतर मदत केली. त्याच्या या निःस्वार्थ मदतीमुळे त्याला महान लॉरेंझो (लॉरेंझो इल मॅग्निफिको) म्हणतात. []

इटलीमधील रिनैसांचा अंत

संपादन

इटलीतील रिनैसाँचा अंत त्याच्या सुरुवातीप्रमाणेच कधी झाला हे स्पष्ट नाही. अनेक विद्वानांनुसार १४९४-९८ दरम्यानच्या रूढमतवादी धर्मगुरू गिरोलामो साव्होनारोलाने फिरेंझेची सत्ता बळकावल्यानंतर फिरेंझची भरभराट थांबली आणि त्याच बरोबर रिनैसाँचाही ऱ्हास सुरू झाला. इतर विद्वानांच्या मते मेदिची कुटुंबाने फिरेंझेवर परत सत्ता मिळवल्यावर रिनैसाँचा ऱ्हास सुरू झाला. तर इतरांच्या मते १६व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रेंच आक्रमणे आणि त्यानंतरच्या इटालियन भूभागाच्या नियंत्रणासाठीच्या फ्रांस आणि स्पॅनिश राज्यकर्त्यांमधील संघर्षामध्ये इटलीतील रिनैसाँचा शेवट असल्याचे मानतात.

साव्होनारोला फिरेंझेमधील धर्मनिरपेक्षता आणि रिनैसाँमधील चंगळवादाच्या विरोधातील जनमतावर सत्तेवर आला. त्याने फिरेंझेच्या मध्यवर्ती भागात फ्लॉरेन्सच्या मध्यभागी फालो देल्ले व्हानिता (भोंगळपणाची होळी) रचून त्यात अनेक मौल्यवान कलाकृती नष्ट केल्या. साव्होनारोलाचा लवकरच अंत झाला पण रिनैसाँविरुद्ध कारवाया चालूच राहिल्या. १५४२मध्ये मेदिची पुन्हा सत्तेवर आल्यानंतरही चर्चने या कारवाया चालू ठेवल्या. त्यांनी रिनैसाँ दरम्यान लिहिलेल्या अनेक साहित्यकृतींवर बंदी घातली. कॅथोलिक चर्चने चालविलेल्या दडपशाहीत आणि युद्धांच्या विध्वंसात रिनैसाँमध्ये पुनरुदयास आलेला मानवतावद पाखंडी मत ठरला. []


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Compre: Sée, Henri. "Modern Capitalism Its Origin and Evolution" (PDF). University of Rennes. Batoche Books. 2013-10-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 29 August 2013 रोजी पाहिले. The origin and development of capitalism in Italy are illustrated by the economic life of the great city of Florence.
  2. ^ Florman, Samuel C. (2015). Engineering and the Liberal Arts: A Technologist's Guide to History, Literature, Philosophy, Art and Music. Macmillan. ISBN 9781466884991. [...] Let us look for a moment at Europe just after the Treaty of Westphalia in 1648, almost two hundred years after the date that we choose to mark the transition from the Middle Ages to the Renaissance. [...] The religious war was over. The Reformation and the Counter-Reformation were things of the past. Truly we can say that the Renaissance had ended. [...]
  3. ^ "History of Florence". Aboutflorence.com. 2009-05-26 रोजी पाहिले.
  4. ^ Bernier, Olivier (1983). The Renaissance Princes. Stonehenge Press. p. 14. ISBN 0867060859.
  5. ^ Peter Barenboim, Sergey Shiyan, Michelangelo: Mysteries of Medici Chapel, SLOVO, Moscow, 2006. आयएसबीएन 5-85050-825-2
  6. ^ "Italian Renaissance". HISTORY (इंग्रजी भाषेत). 17 July 2020. 2020-11-13 रोजी पाहिले.