अधिकमास
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विविध नावे
संपादनवैदिक काळात अधिक महिन्याला संसर्प, मलीमलूच असे म्हणले गेले आहे.[१] अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास,धोंड्याचा महिना असेही म्हणतात.
प्राचीन इतिहास-वैदिक काळ
संपादनअधिक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चांद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषींना हे लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय.[२]
धार्मिक महत्त्व
संपादनया मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे.[३] या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.[४][५]
अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या काळात उज्जैन येथे विशेष यात्रा भरते. भागवत पुरणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते. ब्राह्मणांना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात.[२]
अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे.[६]
अधिक मासात भारतभरात विष्णूच्या विविध मंदिरांत विशेष पूजाचे आयोजन केले जाते. भागवत पुराणाचे सप्ताह, दान, स्नान असे धार्मिक उपक्रम आयोजित केलेलं जातात. विविध यात्रा-जत्रा यांचे आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पुरुषोत्तम मंदिर आहे. तेथे अधिक मासात संपूर्ण महिना विशेष धार्मिक उत्सव आयोजित होतात.[७]
खगोलशास्त्रीय महत्त्व
संपादनपृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.[८][९]
भारतातील प्रांतानुसार
संपादनसूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.[५]
चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो.[९]
ज्यावर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणाऱ्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो.
काहीवेळा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशावेळी क्षयमास येतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाहीत, क्षयमास येतात. क्षयमासाच्या आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हातरी थोड्या अंतराने दोन अधिकमास येतात.
स्पष्टीकरण
संपादनचांद्र वर्ष आणि सूर्य(सायन) वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली.[९] म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. सूर्य एका राशीत साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव 'रिपीट' करण्यात येते.
मेषेत सूर्य असताना येणाऱ्या अमावास्येनंतर वैशाख महिना सुरू होतो हे सर्वसाधारणपणे खरे असले तरी जर त्यानंतरच्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण होत नसेल तर तो चांद्रमास वैशाख नसून अधिक वैशाख असतो. तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की चांद्रमासाचे नाव सूर्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या स्थितीवरून नव्हे तर त्याच्या अमावास्येच्या स्थितीनुसार ठरते. जसे सूर्य मेषेत असताना जी अमावास्या येते ती चैत्र अमावास्या. सूर्य मीनेत असताना जी अमावास्या येते ती फाल्गुन अमावास्या. अर्थात सूर्य मीनेत असताना अधिक चैत्र अमावास्या किंवा मेषेत असताना अधिक वैशाख अमावास्या (आणि याप्रमाणे इतरही) येऊ शकतात.
ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.
पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका (कृष्ण) पक्षानंतर अधिक मासाचे दोन पक्ष येतात, आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष (दुसरा पंधरवडा). त्या पंचांगातला अधिक मास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात.
हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्यांतल्या २४ एकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना 'कमला एकादशी' हेच नाव असते.
ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.
अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात.[ संदर्भ हवा ]
आणखी पद्धती
संपादन- माघी अमावास्या जर १४ ते २४ या तारखांदरम्यान असेल तर पुढच्या इंग्रजी महिन्यात अधिकमास असतो.
- जेव्हा विशिष्ट महिन्यात कृष्ण पंचमीच्या आसपाच्या दिवशी सूर्य रास बदलतो त्याच्या पुढल्या वर्षी त्या विशिष्ट महिन्याच्या आधीचा महिना अधिकमास असतो. उदा० १५ जून २००६, आषाढ़ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी सकाळी ९-४५ला सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला, म्हणून २००७ साली आ़षाढाच्या अलीकडचा ज्येष्ठ महिना अधिक आला होता.[ संदर्भ हवा ]
इसवी सनाच्या २०व्या शतकाच्या उत्तरार्धातील अधिकमास (अपूर्ण यादी)
संपादन- १३ जून १९४२ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १८६४
- १५ मार्च १९४५ पासून एक महिना : चैत्र शके १८६७
- १९ जुलै १९४७ पासून एक महिना : श्रावण शके १८६९
- १६ जून १९५० पासून एक महिना : आषाढ शके १८७२
- १४ एप्रिल १९५३ पासून एक महिना : वैशाख शके १८७५
- १८ ऑगस्ट १९५५ पासून एक महिना : भाद्रपद शके १८७७
- १७ जुलै १९५८ पासून एक महिना : श्रावण शके १८८०
- १५ मे १९६१ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १८८३
- १८ ऑक्टोबर १९६३ पासून एक महिना : कार्तिक शके १८८५
- १५ मार्च १९६४ पासून एक महिना : चैत्र शके १८८६. मधल्या काळातला मार्गशीर्ष हा क्षयमास.
- १९ जुलै १९६६ पासून एक महिना : श्रावण शके १८८८
- १ जून १९६९ पासून एक महिना : आषाढ शके १८९१
- १४ एप्रिल १९७२ पासून एक महिना : वैशाख शके १८९४
- १८ ऑगस्ट १९७४ पासून एक महिना : भाद्रपद शके १८९६
- १७ जुलै १९७७ पासून एक महिना : श्रावण शके १८९९
- १५ मे १९८० पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९०२
- १८ सप्टेंबर १९८२ पासून एक महिना : आश्विन शके १९०४
- १३ फेब्रुवारी १९८३ पासून एक महिना : फाल्गुन शके १९०५. त्या आधीचा माघ महिना हा क्षयमास.
- १८ जुलै १९८५ पासून एक महिना : श्रावण शके १९०७
- १६ मे १९८८ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९१०
- १५ एप्रिल १९९१ पासून एक महिना : वैशाख शके १९१३
- १८ ऑगस्ट १९९३ पासून एक महिना : भाद्रपद शके १९१५
- १७ जून १९९६ पासून एक महिना : आ़षाढ शके १९१८
- ३१ मे १९९९ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९२१
इसवी सनाच्या २१व्या शतकातील अधिकमास (अपूर्ण यादी )
संपादन- १८ सप्टेंबर २००१ पासून एक महिना : आश्विन शके १९२३
- १८ जुलै २००४ पासून एक महिना : श्रावण शके १९२६
- १७ मे २००७ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९२९
- १५ एप्रिल २०१० पासून एक महिना : वैशाख शके १९३२
- १८ ऑगस्ट २०१२ पासून एक महिना : भाद्रपद शके १९३४
- १८ जून २०१५ पासून एक महिना : आषाढ शके १९३७
- १६ मे २०१८ पासून एक महिना (१३ जूनपर्यंत) : ज्येष्ठ शके १९४०
- १८ सप्टेंबर २०२० पासून एक महिना : आश्विन शके १९४२
- १८ जुलै २०२३ पासून एक महिना : श्रावण शके १९४५
- २०२६ :१७ जून २०२६ पासून एक महिना ज्येष्ठ शके १९४८
- २०२९ १६ मार्च २०२९ पासून एक महिना : चैत्र शके १९५१
- २०३१ :१९ आॉगस्ट पासून एक महिना भाद्रपद शके १९५३
- १७ जून २०३४ पासून एक महिना : आषाढ शके १९५६
- २०३७ :१६ मे २०३७ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९५९
- २०३९ १९ सप्टेंबर पासून एक महिना : आश्विन शके १९६१
- १८ जुलै २०४२पासून एक महिना : श्रावण शके १९६४
- १७ मे २०४५ ते १५ जून १९४५ : ज्येष्ठ शके १९६७
- १५ मार्च २०४८पासून एक महिना : चैत्र १९७०
- १८ ऑगस्ट २०५०पासून एक महिना : भाद्रपद १९७२
- १७ जून २०५३पासून एक महिना : आषाढ १९७५
- १६ एप्रिल २०५६ ते १४ मे २०५६ : वैशाख १९७८
- १९ सप्टेंबर २०५८पासून एक महिना : आश्विन १९८०
- १८ जुलै २०६१ ते १५ ऑगस्ट २०६१ : श्रावण शके १९८३
- १७ मे २०६४ ते १४ मे २०६४ : ज्येष्ठ शके १९८६
त्यापुढील काही तारखा
संपादन- १९ मार्च २२६५ पासून एक महिना : चैत्र शके २१८७
- २१ ऑगस्ट २२६७ पासून एक महिना : भाद्रपद शके २१८९.
सन १९०१पासूनच्या पुढल्या काही वर्षांतील अधिक मास
संपादनअधिक मास साधारणपणे दर तीन हिंदू वर्षांनी (अचूक ३२ महिने ६ दिवस ४ घटिकांनी) येतो. गेल्या काही ग्रेगरियन वर्षांतील व त्यांपुढील वर्षांतील अधिक मास : -
- १९०१ : श्रावण
- १९०४ : ज्येष्ठ
- १९०७ :फाल्गुन
- १९०९ : श्रावण
- १९१२ : आषाढ
- १९१५ : वैशाख
- १९१७ : आश्विन
- १९२० : श्रावण
- १९२३ : ज्येष्ठ
- १९२६ : फाल्गुन
- १९२८ : श्रावण
- १९३१ : आषाढ
- १९३४ : वैशाख
- १९३६ : भाद्रपद
- १९३९ : श्रावण
- १९४२ : ज्येष्ठ
- १९४५ : चैत्र
- १९४७ : श्रावण
- १९५० : आषाढ
- १९५३ : वैशाख
- १९५५ : भाद्रपद
- १९५८ : श्रावण
- १९६१ : ज्येष्ठ
- १९६३ : कार्तिक. नंतरचा मार्गशीर्ष हा क्षयमास.
- १९६४ : चैत्र
- १९६६ : श्रावण
- १९६९ : आषाढ
- १९७२ : वैशाख
- १९७४ : भाद्रपद
- १९७७ : श्रावण
- १९८० : ज्येष्ठ
- १९८२ : आश्विन
- १९८३ : फाल्गुन. आधीचा महिना माघ हा क्षयमास.
- १९८५ : श्रावण
- १९८८ : ज्येष्ठ
- १९९१ : वैशाख
- १९९३ : भाद्रपद
- १९९६ : आषाढ
- १९९९ : ज्येष्ठ
- २००१ : आश्विन
- २००४ : श्रावण
- २००७ : ज्येष्ठ
- २०१० : वैशाख
- २०१२ : भाद्रपद
- २०१५ : आषाढ
- २०१८ : ज्येष्ठ
- २०२० : आश्विन
- २०२३ : श्रावण
- २०२६ : ज्येष्ठ
- २०२९ : चैत्र
- २०३१ : भाद्रपद
- २०३४ : आषाढ
- २०३७ : ज्येष्ठ
- २०३९ : आश्विन
- २०४२ : श्रावण
- २०४५ : ज्येष्ठ
- २०४८ : चैत्र
- २०५० : भाद्रपद
- २०५३ :आषाढ
- २०५६ : वैशाख
- २०५८ : आश्विन
- २०६१ : श्रावण
- २०६४ : ज्येष्ठ
- एखाद्या ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आल्यास १९ वर्षांनी परत तो ज्येष्ठ महिन्यातच येतो. (उदा० सन १९४२, १९६१, १९८०, १९९९ व २०१८ आणि सन १९८८, २००७ व २०२६). ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आल्यास बहुधा १३ वर्षांनी भाद्रपद महिना हा अधिक मास येतो. (उदा० सन १९४२-५५, १९६१-७४, १९८०-९३, १९९९-२०१२, २०१८-३१). दोन भाद्रपद अधिक महिन्यांमध्ये बहुधा १९ महिन्यांचे अतर असते. (उदा० सन १९५५-१९७४-१९९३-२०१२-२०३१).
दर १९ वर्षांनी एक अधिक मास येतो. तपशीलवार पाहिले तर अंदाजे ३-५-८-११-१४-१६-१९ महिन्यांनी अधिक महिना येतो. उदा० १९३१-३४-३६-३९-४५-४७-५८. (अपवाद आहेत!)
सन १९०१ सालापासून विशिष्ट महिन्यात आधिकमास येण्याचे कालांतर
संपादन- चैत्र : ...१९४५-१९-१९६४-६५-२०२९-१९-२०४८....२२६५...
- वैशाख : ...१९१५-१९-१९३४-१९५३-१९-१९७२-१९-१९८१-२९-२०१०-४६-२०५६....
- ज्येष्ठ : ...१९०४-१९-१९२३-१९-१९४२-१९-१९६१-१९-१९८०-८-१९८८-११-१९९९-८-२००७-११-२०१८-८-२०२६-११-२०३७-८-२०४५-१९-२०६४.... २०८३...
- आ़षाढ : ...१९५०-१९-१९६९-२७-१९९६-१९-२०१५-१९-२०३४-१९-२०५३...
- श्रावण : ...१९०१-८-१९०९-११-१९२०-८-१९२८-११-१९३९-८-१९४७-११-१९५८-८-१९६६-११-१९७७-८-१९८५-१९-२००४-१९- २०२३-१९-२०४२-१९-२०६१...
- भाद्रपद : ...१९३६-१९-१९५५-१९-१९७४-१९-१९९३-१९-२०१२-१९-२०३१-१९-२०५०...२२६७....
- आश्विन : ...१९१७-६५-१९८२-१९-२००१-१९-२०२०-१९-२०३९-१९-२०५८...
- कार्तिक : ... १९६३...
- फाल्गुन : ... १९०७-१९-१९२६-५७-१९८३...
हे सुद्धा पहा
संपादनबाह्यदुवे
संपादन- अधिकमासाचे महत्त्व Archived 2012-08-30 at the Wayback Machine. - मराठीमाती
संदर्भ
संपादन- ^ Sacred Books of T He East: the Vedanta- Sutras (इंग्रजी भाषेत). Atlantic Publishers & Distri.
- ^ a b जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (मार्च २०१० (पुनर्मुद्रण)). भारतीय संस्कृती कोश खंड १. पुणे: भारतीय संस्कृतिकोष मंडळ. pp. १३७-१३८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Kapur, Kamlesh (2013-08). Hindu Dharma-A Teaching Guide (इंग्रजी भाषेत). Xlibris Corporation. ISBN 978-1-4836-4557-5.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Yatra 2 Yatra (इंग्रजी भाषेत). Yatra2Yatra. 2009.
- ^ a b Roy, Christian (2005). Traditional Festivals: A Multicultural Encyclopedia (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 978-1-57607-089-5.
- ^ SARV VIPRA MARTAND (हिंदी भाषेत). VIMLESH SHARMA. 2018-05-01.
- ^ author/lokmat-news-network (2018-05-15). "'येथे' आहे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर; अधिक मासात आहे अनन्यसाधारण महत्व". Lokmat. 2020-09-19 रोजी पाहिले.
- ^ Patil, Vimla (1994). Celebrations: Festive Days of India (इंग्रजी भाषेत). India Book House. ISBN 978-81-85028-81-1.
- ^ a b c Soni, Suresh (2009-01-01). India'S Glorious Scientific Tradition (इंग्रजी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-8430-028-4.