सावता माळी

हिंदू संत
(सावंता माळी या पानावरून पुनर्निर्देशित)

संत सावता माळी (जन्म : इ.स. १२५०; समाधी : इ.स. १२९५) हे एक मराठी संतकवी होते. अरण (तालुका-माढा; जिल्हा-सोलापूर) हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले.

श्री संत सावता माळी
श्री संत सावता माळी

संत सावता माळी यांच्या बद्दल संत नामदेव म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।

सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. संत सावता माळी यांनी गायलेले अभंग त्यांचे समवयस्क अरणभेंडी गावातील गुरव समाजाचे संत काशीबा गुरव यांनी लिपीबद्ध केले आहेत त्या वेळी काशीबा महाराज यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याचे काम आपल्या अभंगाच्या माध्यमातून केले आहे व समाज जागृती करून एक चांगला समतामय समाज निर्माण करण्याचे कार्य केले आहे श्री संत सावता माळी यांच्या गायलेल्या अभंगाचे लिखाण त्यांनी आपल्या लेखणीतून लिपीबद्ध केले यावरून त्यांनी लिहिण्या वाचण्याचे ज्ञान घेतले आहे हे सिद्ध होते

अन्य माहिती

संपादन

संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५चा आहे. (संत ज्ञानेश्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.

ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते. परंतु या दिनांकाविषयी मतभेद आहेत असे कळते. कालनिर्णय दिनदर्शिकेत सावता माळी यांची पुण्यतिथी २५ जुलै (साल?) अशी दर्शवली आहे.

सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे सत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे.

लोकप्रिय अभंग

संपादन

‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’

'कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’'

’'लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’

अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती

‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.

‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।

हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो.
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’

चित्रपट

संपादन
  • फाउंटन एंटरटेनमेंटने ’संत सावतामाळी’ नावाची दक्‌श्राव्य सीडी काढली आहे.
  • सुमीत कॅसेट्‌स या कंपनीची ’संत सावता माळी कथा’ नावाची दृक्‌श्राव्य सीडी आहे.
  • संत सावता माळी हा एक प्रसिद्ध मराठी चित्रपट आहे. (पटकथालेखक-दिग्दर्शक राजू फुलकर; संगीत सुरेश वाडकर, अजित कडकडे)
  • झी टाॅकीजचा 'ही वाट पंढरीची' हा दूरचित्रवाणीपट
  • राजकमल कलामंदिरने निर्माण केलेला पहिला मराठी चित्रपट ' भक्तीचा मळा ' (प्रमुख भूमिका : मास्टर कृष्णराव, बेबी नलिनी, दिग्दर्शन - केशवराव दाते) (सन १९४४) हा संत सावता माळी यांच्या जीवनकहाणीवरील गाजलेला संतपट. याच मराठी चित्रपटाची 'माली' ही हिंदी आवृत्ती देखील राजकमलने निर्माण करून भारतभर प्रदर्शित केलेली होती. या मराठी व हिंदी दोन्ही भाषेतील चित्रपटांत संत सावता महाराजांची प्रमुख भूमिका संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांनी केली होती. याशिवाय मास्टर कृष्णराव यांनीच ह्या दोन्ही चित्रपटांना संगीत दिले होते आणि संत सावता माळी भूमिकेत त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे गायनदेखील त्यांनीच केले होते.

भक्तिचा मळा या चित्रपटातील सुमधुर गीते पुढीलप्रमाणे :- १)आमुचि माळीयाची जात, २)कुणीतरी सांगा हो सांगा, ३)जाऊ चला पंढरीला, ४)येऊन जा बिगी बिगी, ५)दयाळू धन्वंतरी श्रीहरी, ६)हरी वाजवि मंजुळ मुरली, ७)कांदा मुळा भाजी अवघी विठामाई माझी, ८)विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, ९)सोड सोड ना कान्हा, १०)नामाचिया बळे न भिऊ सर्वथा, ११)त्यो येनार येनार गं अपुल्या मळ्यांत गं, १२)राजा पंढरीचा हरी माझा आला

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन