श्रीपाद नारायण पेंडसे

मराठी लेखक
(श्री.ना. पेंडसे या पानावरून पुनर्निर्देशित)


श्रीपाद नारायण पेंडसे (जन्मजानेवारी इ.स. १९१३; मृत्यू २३ मार्च इ.स. २००७) हे मराठी भाषेतील एक कथालेखककादंबरीकार होते.[ संदर्भ हवा ]

श्रीपाद नारायण पेंडसे
जन्म नाव श्रीपाद नारायण पेंडसे
जन्म जानेवारी ५, १९१३
मुर्डी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू मार्च २३, २००७
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र कादंबरीकार
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत
अपत्ये पुत्र: अनिरुद्ध पेंडसे
कन्या: नंदा काटदरे, सरोज दीक्षित
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, मास्टर दीनानाथ स्मृति पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन गौरव, जनस्थान पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान पुरस्कार

बालपण आणि प्रभाव

संपादन

पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१3 मध्ये रत्‍नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत 'शिरूभाऊ' म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

संपादन

मुंबईच्या बेस्ट कंपनीत सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी करून या संस्थेच्या आत्मीयतेपोटी त्यांनी १९७२ मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तकही लिहिले.[ संदर्भ हवा ]

साहित्यिक लेखन

संपादन

प्रारंभी आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां.नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. फडके, खांडेकर प्रभावित मराठी कादंबरी एका आवर्तात फिरत असताना पेंडसे यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.[ संदर्भ हवा ]

कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री.ना.पेंडसे यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली.[ संदर्भ हवा ] नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक.[ संदर्भ हवा ]

‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे त्यांच्या लेखनामागील प्रधान सूत्र होते. त्यांना सुचलेल्या कादंबऱ्या या बहुशः त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

पेंडसेंची पहिली कादंबरी ‘एल्गार’ १९४९ मध्ये प्रकाशित झाली.[ संदर्भ हवा ]

‘एल्गार’ने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या. ‘एल्गार’ (१९४९) पाठोपाठ ‘हद्दपार’ (१९५०) आणि ‘गारंबीचा बापू’ (१९५२) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘गारंबीचा बापू’ ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी, चेटूक करणारी कादंबरी ठरली. याच तीन कादंबऱ्या समोर ठेवून गंगाधर गाडगीळांनी ‘हर्णैचा दीपस्तंभ’ हा लेख लिहून पेंडसेंचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले होते.[ संदर्भ हवा ]

सातत्य आणि प्रयोगशीलता हे कादंबरीकार म्हणून पेंडसे यांच्या प्रकृतीचे एक वैशिष्टय सांगता येईल. मधल्या काळात ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९) या तीन कादंबऱ्या आणि ‘यशोदा’ व ‘राजेमास्तर’ ही दोन नाटके त्यांनी लिहिली. १९६२ मध्ये त्यांची ‘रथचक्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांच्या यशात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला. ‘रथचक्र’ला १९६३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]

‘रथचक्र’ला अभिजात कलाकृतीचे परिमाण प्राप्त झाले. ‘रथचक्र’नंतर ‘लव्हाळी’ आली त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील जीवनजाणिवा, क्षुद्रत्व हा आशय मांडण्यासाठी त्यांनी दैनंदिनीची शैली स्वीकारली. त्यांनी ‘लव्हाळी’नंतर ‘आकांत’ नावाची आणखी एक कादंबरी लिहिली. पण त्यानंतर १९८८ मध्ये १३५८ पृष्ठांची ‘तुंबाडचे खोत’ ही त्यांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली. पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मराठीतील ही एकमेव मोठी कादंबरी होती.[ संदर्भ हवा ]

‘एक होती आजी’ (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे’, ‘रंगमाळी’ (२००२) आणि लोकमान्यांच्या जीवनावरील ‘हाक आभाळाची’ (२००७) या पेंडसेंनी आपल्या उत्तरायुष्यात लिहिलेल्या कादंबऱ्या होत. कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या हयातीत अकरा नाटके लिहिली. त्यातील ‘राजेमास्तर’, ‘यशोदा’, गारंबीचा बापू, ‘असं झालं आणि उजाडलं’ आणि रथचक्र ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय ‘महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’,‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दार’ ही वेगळ्या पिढीतली नाटके.[ संदर्भ हवा ]

त्यांची नाटके आणि कादंबऱ्या या दोन्हीही सारख्याच लोकप्रिय आहेत.त्यांच्या नाटकात कोणतीना कोणती समस्या असते. प्रेक्षकांच्या विचारशक्तीला चालना देणारे विचार त्यांच्या नाटकात असतात. संवाद मोठे प्रभावी व सहज सुंदर असतात. एखाद्या समस्येच्या मुळाशी खोल खोल जाणे हा त्यांच्या प्रतिभेचा विशेष होता.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार

संपादन

श्री. ना. पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार (हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत व चक्रव्यूह), साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊण्डेशनचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदíशनी पुरस्कार, लाभसेटवार साहित्यसन्मान पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (2001) हे काही उल्लेखनीय पुरस्कार म्हणता येतील.[ संदर्भ हवा ]

http://www.kusumagraj.org/pratishathan/jansthan.php

१९ मार्च २००७ला त्यांची लोकमान्य टिळकांवरची ‘हाक आभाळाची’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि २3 मार्च २००७ रोजी त्यांचे निधन झाले.[ संदर्भ हवा ]

श्री.ना. पेंडसे यांनी लिहिलेली पुस्तके[ संदर्भ हवा ]

संपादन
  • असं झालं आणि उजाडलं (नाटक)
  • आकांत
  • एक होती आजी
  • एल्गार
  • कलंदर
  • कामेरू
  • खडकावरील हिरवळ
  • गारंबीचा बापू
  • घागर रिकामी रे
  • चक्रव्यूह
  • जुम्मन
  • तुंबाडचे खोत
  • पंडित ! आता तरी शहाणे व्हा
  • बेस्ट उपक्रमाची कथा
  • महापूर
  • यशोदा
  • रंगमाळी
  • रथचक्र (कादंबरी आणि नाटक)
  • राजेमास्तर (नाटक)
  • लव्हाळी
  • शोनार बांगला (नाटक)
  • श्री.ना. पेंडसे - लेखक आणि माणूस
  • संभूसाच्या चाळीत (नाटक)
  • हत्या
  • हद्दपार
  • हाक आभाळाची
  • डॉ. हुद्दार (नाटक)

श्री.ना.पेंडसे यांचे अन्य भाषांत अनुवादित झालेले साहित्य[ संदर्भ हवा ]

संपादन
  • गुजराती : हद्दपार, गारंबीचा बापू, हत्या, कलंदर, रथचक्र
  • हिंदी : गारंबीचा बापू, रथचक्र
  • तेलगू : जुम्मन, रामशरणची गोष्ट
  • इंग्रजी : गारंबीचा बापू (Wild bapoo of Garambi) : भाषांतर: इएन रेसाइड; युनेस्को प्रकाशन, हद्दपार : (Sky is the Limit): अप्रकाशित; भाषांतर: ज्ञानेश्वर नाडकर्णी[]

श्री.ना. पेंडसे यांना मिळालेले पुरस्कार[ संदर्भ हवा ]

संपादन
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
  • प्रियदर्शिनी पुरस्कार
  • महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार
  • लाभसेटवार साहित्यसन्मान पुरस्कार
  • साहित्य अकादमी पुरस्कार आणि इतर.

संदर्भ

संपादन

संदर्भसूची

संपादन
  • श्री.ना., पेंडसे. श्री.ना.पेंडसे लेखक आणि माणूस.
  • Snell, Rupert; Raeside, Ian, eds. (1998). Classics of Modern South Asian Literature. p. 181. ISBN 9783447040587.