वीट हे इमारत बांधकामासाठी वापरायचे एक साहित्य आहे. तिचा वापर भिंतींच्या बांधकामात होतो. पारंपरिकरीत्या वीट म्हणजे लाल मातीपासून बनवून भट्टीत भाजलेला ९ इंच लांब, व ४ इंच रुंद व ३ इंच जाड मापाचा आयताकार घन ठोकळा. पण आजकाल सिमेंटच्या मसाल्याने बांधलेल्या कोणत्याही आयताकार ठोकळ्याला वीट म्हणतात. ही वीट माती, रेती, दगड, कॉक्रीट, औष्णिक विद्युत केंद्रातील राख अथवा चुना यांच्यापासून बनलेलीही असू शकते. विटा या अनेक पदार्थानी, अनेक वर्गीकरणांत, अनेक आकारमानांत व प्रकारांत बनविल्या जातात. या सर्व गोष्टींत स्थानांनुसार व कालावधीनुसार बदल संभवतो. विटांचे दोन मुख्य प्रकार म्हणजे भाजलेल्या व न-भाजलेल्या विटा होय.

पारंपारिक वीट भट्टी
पारंपारिक वीट भट्टी परीसराचे दृश्य

साधारण विटेपेक्षा वेगळ्या साहित्याची व वेगळ्या आकारमानाची वीट थोडी वजनी असते. तिला हलकी करण्यास मधे एक पोकळी ठेवतात.

भाजलेल्या विटा हे पुष्कळ काळ टिकणारे व मजबूत बांधकाम साहित्य आहे. त्यांचा उल्लेख 'कृत्रिम दगड' असाही कधीकधी करण्यात येतो. विटांचा उपयोग ५००० ख्रिस्तपूर्व या काळापासून करण्यात येत आहे. न-भाजलेल्या व नुसत्या हवेत वाळवलेल्या विटांचा इतिहास तर त्याहीमागे जातो. त्यांत एक जास्तीचे साहित्य म्हणून तणस अथवा गवत भरलेले असे. ते वापरून बनवलेली वीट एकसंध रहात असे व ती पाण्याने ओघळण्याची शक्यता अतिशय कमी रहात असे.

बांधकामादरम्यान विटा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने रचण्यात येतात. त्यांना एकत्रितपणे सांधण्यासाठी वापरण्यात येणारा 'बंधक' (बांधणारा या अर्थाने) (अथवा स्थानिक भाषेत मसाला) हा वेगवेगळ्या पदार्थापासून बनविण्यात येतो. मसाल्यामुळे या विटांची बांधणी होते व एक बांधकाम उभे राहते.

विटाभट्टी