वि.घ. देशपांडे

(विष्णू घनश्याम देशपांडे या पानावरून पुनर्निर्देशित)

विष्णू घनश्याम देशपांडे, अर्थात वि. घ. (जानेवारी १५, इ.स. १९१२ - डिसेंबर ७, इ.स. १९७५) हे लोकप्रिय मराठी खासदार, आमदार आणि हिंदू महासभेचे सरचिटणीस होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी राष्ट्रकार्याला समर्पित केले होते. त्याग, तपस्या, धैर्य राष्ट्रनिष्ठा याची त्यांनी आयुष्यभर आत्यंतिक कष्ट व हालअपेष्टा सोसून जपणूक केली. राष्ट्रीय धार्मिक व सामाजिक लढय़ात आयुष्याची अनेक वर्षे त्यांनी कारावासात घालवली.

वि. घ. देशपांडे
जन्म नाव विष्णू घनश्याम देशपांडे
टोपणनाव वि. घ.
जन्म जानेवारी १५, इ.स. १९१२
मृत्यू डिसेंबर ७, इ.स. १९७५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र खासदार, आमदार आणि हिंदू महासभेचे सरचिटणीस
वडील घनश्याम देशपांडे
पत्नी विभावरी देशपांडे

बालपण

संपादन

वि.घ. देशपांडे(विष्णूपंत देशपांडे) यांना लहानपणी ‘टिल्या’ म्हणत. बुलढाणा जिल्ह्य़ातील साखरखेर्डा येथील सुप्रसिद्ध देशपांडे घराण्यात त्यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध कवी ना.घ. देशपांडे हे त्यांचे वडील बंधू होत. साखरखेर्डा हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. तो काळ म्हणजे स्वदेशीच्या चळवळीचा व बाळ गंगाधर टिळकांच्या राजकीय जीवनाच्या पूर्वाधारींचा काळ होता. त्याच काळात, बंगाल, पंजाब व महाराष्ट्रातही क्रांतिकारक चळवळींचा प्रारंभ झाला होता. स्वातंत्र्यार्थ सुरू झालेल्या या विविधस्वरूपी आंदोलनात मागील पिढी वावरत होती. देशपांडे साखरखेर्डेकर घराण्यातील अनेकांनी त्या आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता. त्याच वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर सतत होत होते. त्यांचे बालमन या स्वातंत्र्याच्या लढय़ाकडे ओढ घेत होते. विष्णूपंतांचे वडील घनश्यामपंत ऊर्फ देसाई यांनी स्वदेशीच्या चळवळीत शालेय शिक्षण सोडले होते. त्यांचे मामा, रा.व्य. तथा भाऊसाहेब देशमुख शेंदरजनकर यांनी तर सुरत काँग्रेससाठी शिक्षणाला रामराम ठोकला व स्वातंत्र्यलढय़ात उडी घेऊन युवकांचे नेतृत्व केले. देशभक्तीने व प्रेमाने, भारावलेल्या या अशा वातावरणात त्यांचे बालपण तारुण्याकडे वाटचाल करीत होते. त्याकाळी राष्ट्रीय चळवळीचा भाग म्हणून राष्ट्रीय शिक्षणाची शाळा गावोगाव सुरू झाली होती. मेहकरलाही राष्ट्रीय शाळा निघाली होती. महाराजांना इंग्रजी शाळेत घालण्यासाठी आमचे काका घेऊन गेले. शाळेत जाऊन हेडमास्तरांच्या खोलीत पाहतात तो काय महाराज कुठे दिसेनात, म्हणून परत घरी यायला लागले. तर गावातील राष्ट्रीय शाळेत ते जाऊन बसलेले त्यांना आढळले. इंग्रजी शाळेत जाणारच नाही, असा हट्ट त्यांनी धरला. ते राष्ट्रीय शाळेतच गेले. लहानपणापासूनच त्यांची महत्त्वाकांक्षेची झेप फार उंच होती. वक्तृत्वाची चमकही बालवयापासूनच दिसत होती.

केवळ अभ्यास हाच विष्णूपंतांचा मार्ग नव्हता, तर धाडस, धडाडी, उडय़ा मारणे, मुले गोळा करून शेतात हिंडणे वगैरे त्यांचे खेळ असत. सर्वसाधारण मुले खेळतात त्याहून वेगळेच खेळ करणाऱ्या या मुलाच्या खेळाबद्दल, हा त्याचा व्रात्यपणाच होय, असे मोठय़ा माणसांना वाटे. भीती, घाबरणे व फार विचार करणे हे लहानपणापासूनच त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांनी आपल्या जीवनात वेदांपासून ते अनेक शास्त्रे, पुराणे यांचा अभ्यास केला.

खामगावच्या मिडलस्कूलमध्ये विष्णूपंतांचे पुढील शिक्षण सुरू झाले. नागपूरच्या पटवर्धन विद्यालयातून ते मॅट्रिक झाले. नंतर मॉरिस कॉलेजमध्ये ते शिकत होते. तेथेही केवळ शिक्षण हे त्यांचे ध्येय नव्हते, तर कॉलेजच्या विविध विद्यार्थी-कार्यक्रमात ते अग्रेसर होते. तेथे त्यांनी मराठी शारदा मंडळाची भरीव कामगिरी केली व मॉरिस कॉलेज विद्यार्थी युनियनद्वारा विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले. कॉलेज जीवनात दरवर्षी त्यांनी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा वगैरेमध्ये भाग घेऊन पारितोषिके पटकावली होती. एवढेच नव्हे तर पु.भा. भावेंसारखे मित्रवर्यही त्यांना या वक्तृत्व स्पर्धेतूनच लाभले होते. त्यावेळचे मॉरिसचे प्रिन्सिपॉल गांगुली यांनी विष्णूपंतांना दिलेल्या प्रशस्तिपत्रकात ‘लीडर ऑफ स्ट्यूडन्ट्स’ म्हणून त्यांचा गौरव केला होता.

कारकीर्द

संपादन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘युथ लीग’ या संस्थेचे विष्णूपंत सचिव होते. त्याच काळात राजकारणात आवश्यक अशी पत्रकारिताही त्यांनी ‘स्वच्छंद’ नावाचे साप्ताहिक काढून चालवली. कॉलेज जीवनात असतानाच त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता. गुप्त रीतीने बुलेटिन छापणे व वाटणे हे त्यांचे काम असे. यात त्यांना पोलिसांनी पकडलेही होते, पण अत्यंत कौशल्याने ते बुलेटिनसह त्यातून निसटले. १९३५ साली धर्मवीर डॉ. मुंजे यांच्या प्रचारासाठी ते बैतुल भागात गेले होते. त्यावेळी एका भागाचे पूर्ण काम त्यांच्याकडे सोपवले गेले होते. डॉ. मुंजे व बॅ. अभ्यंकरांच्या निवडणुकीत या तरुणाने बॅ. अभ्यंकरांना प्रचंड मोठय़ा भरसभेत अनेक प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडले होते. नागपूरला नानकचंद नावाचे एक व्यापारी राहत असत. त्यांनी डय़ुटी न भरता आगपेटय़ांचा भरपूर स्टॉक आपल्याजवळ ठेवला, असा प्रवाद होता. आपल्याला काही शिक्षा होऊ नये म्हणून त्या वेळच्या इंग्रज स्टेन्ट नावाच्या साहेबाच्या बायकोला एक मोठा सोन्याचा हार त्याने प्रेझेंट केला होता, असे लोक बोलत असत. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, महाराजांनी आपल्या ‘स्वच्छंद’ साप्ताहिकात अक्कडबाज मिशांचा फक्कड नानकचंद’ या शीर्षकाखाली एक व्यंगोक्तिपूर्ण लेख लिहिला होता. अशा अनेक चळवळीत सक्रिय असतानाही त्यांनी विद्यार्जन यशस्वीपणे पार पाडले. बी.ए.च्या परीक्षेत नागपूरच्या विश्वविद्यालयातर्फे त्यांना दोन पारितोषिके मिळाली. एक मराठीत पहिले आल्याबद्दल व दुसरे सर्व भाषांतून पहिले आल्याबद्दल! एम.ए.च्या परीक्षेत पहिले आल्याबद्दल त्यांना ‘सुवर्णपदक’ मिळाले होते. नंतर शासनातर्फे त्यांना ‘मॉरिस मेमोरियल’ फेलोशिपही मिळाली होती. प्रा. बनहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली "origin of marathi Language" या विषयावर महाराजांनी संशोधन केले. मॉरिस महाविद्यालयात व हिस्लॉप कॉलेजमध्येही ते काही काळ प्राध्यापक होते. एक अत्यंत मेधावी, कर्तव्यदक्ष व प्रज्ञावंत अशा आमच्या या ‘महाराजांना’ नागपूरच्या शासकीय मुद्रणालयातील एक वरिष्ठ जागा सहजासहजी मिळाली होती. पण, अशा महत्त्वाच्या गौरवास्पद व पगारदार जागेवर लाथ मारून ते सरकारी नोकरीतून बाहेर पडले. त्यावेळच्या त्यांच्या अधिकाऱ्यांनाही या गोष्टीचे दुःख झाले व त्यांनी विष्णूपंतांना या विचारापासून परावृत्त करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

१९३५ साली मेहकर येथील भाऊराव पांडे यांची सुकन्या ‘शांता’ हिच्याशी वि. घ. देशपांडे यांचे लग्न झाले. शांता पांडे - सौ. विभावरी देशपांडे झाली. त्यांना एक मुलगा झाल्यावर लगेच त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन भागानगरच्या सत्याग्रहांत उडी घेतली. भागानगर सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. आपल्या घणाघाती वक्तृत्वाने त्यांनी अनेक तरुण गोळा केले. १०० तरुण सत्याग्रहींसह ते भागानगरला सत्याग्रहासाठी गेले होते. हैद्राबाद शहराच्या मध्यवस्तीत सभा घेऊन त्यांनी सत्याग्रह केला. त्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले व अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. रझाकार चळवळीच्या वेळेस, हैद्राबाद संस्थानातील अनेक तरुणांनी ‘वंदेमातरम्’ चळवळीचे आंदोलन केले, त्यामुळे त्यांना विद्यापीठातून काढण्यात आले, अशा हजारो तरुणांना नागपुरात आणले गेले. त्या सर्व तरुणांना नागपूरला आणून नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेस बसू देण्याची व्यवस्था करण्यास वि.घ.नी नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. केदार यांना प्रवृत्त करून मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देण्याची खबरदारी घेतली. १९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनात त्यांनी फार मोलाची व भरीव कामगिरी केली. नागपूरचे त्या काळचे सुप्रसिद्ध कामगार पुढारी रामभाऊ रुईकर आणि प्रा. वि.घ. देशपांडे ते याच नावाने समाजात लोकात ज्ञात होते. यांनी चिटणीसपार्कात प्रचंड सभा घेऊन लोकांमध्ये जागृती आणली. विष्णूपंतांनी भूमिगत चळवळ सुसूत्रपणे चालवली होती. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून नाशिकच्या जेलमध्ये ठेवले होते. खामगावला "Prince of Berar"च्या विरुद्ध केलेल्या आंदोलनातही त्यांच्यावर बंदूक रोखून त्यांना पकडण्यात आले. १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पं. कानडेशास्त्री यांच्या विरोधात हिंदूमहासभेकडून ते अकोल्याहून उभे राहिले होते व फार मोठय़ा प्रमाणात त्यांनी मतेही मिळवली होती. १९४४ साली त्यांनी संपूर्ण भारताचा विस्तृत दौरा केला. कराचीला तर त्यांची प्रचंड मोठी सभा झाली. कराची महानगरपालिकेने त्यांचा बहुमान करून त्यांना मानपत्र बहाल केले. ‘स्वच्छंद’ साप्ताहिक बंद झाल्यावर ते ‘सावधान’च्या संपादनात सहभागी झाले. त्या ‘सावधान’च्या समुदायातील मावकर, वासुदेवराव फडणीस, जगन्नाथप्रसाद वर्मा, पु.भा. भावे, बाळशास्त्री हरदास, अ‍ॅड. चलपे आणि शंकरराव बूट या सर्वानी मिळून ‘सावधान’ साप्ताहिक चालविले. त्यातील लिखाण अत्यंत ज्वलज्जहाल व तेजस्वी असे. ही सारी तरुण मंडळी त्यावेळेस हिंदुमहासभेचे कार्य जोमाने करीत असत. धर्मवीर डॉ. मुंजे यांना वि.घ. गुरुस्थानी मानीत. डॉ. परांजपे, विश्वनाथराव केळकर, बाबुराव वाघ, बळवंतराव मंडलेकर, बाळासाहेब घटाटे यांचाही विष्णूपंतांना सक्रिय पाठिंबा होता. ‘सावधान नंतर त्यांनी ‘आदेश’ वर्तमानपत्र काढले. समाजातील व राजकारणातील अनेक दुष्कृत्ये ‘आदेश’द्वारे त्यांनी चव्हाटय़ावर आणली. आदेशमधील पु.भा. भावे आणि फडणीस यांचे लेख आजही संस्मरणीय आहेत.

वि.घ. देशपांडे त्यावेळेस हिंदुमहासभेचे जनरल सेक्रेटरी झाल्यामुळे त्यांना दिल्लीस राहण्यास जावे लागले. कुटुंबाचा व्याप वाढता होता, उत्पन्नाचे काहीच साधन नव्हते. विभावरीबाई अतिशय कौशल्याने व हिंमतीने संसाराचा गाडा रेटीत होत्या. देशपांड्यांचे जीवन भिंगरीसारखे फिरणारे होते. म्हणून त्या मेहकरला स्थायिक झाल्या. विष्णूपंत दिल्लीला गेल्यावर भाई परमानंद, डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी, आशुतोष लहिरी सारख्या महान पुढाऱ्यांसोबत त्यांनी काम केले. स्वातंत्र्य मिळतेय पण, ते खंडित होऊन याची लक्षणे दिसू लागल्याबरोबर त्यांनी अखंड भारत रहावा व देशाची फाळणी टळावी म्हणून जीवाचे रान केले. साऱ्या भारतभर त्यांचा झंझावाती संचार, लोकांना झड्झडून जागे करण्यासाठी सुरू होता. फाळणीच्या धामधुमीत ते लाहोर शहरातच होते. त्यावेळेस हिंदूंना वाचवण्याचे त्यांनी आत्यान्तिक प्रयत्न केले. १४ ऑगस्ट १९४७ला त्यांना लाहोरला अटक करण्यात आली. नौखालीचाही त्यांनी पुष्कळ प्रवास केला. १९४८ साली गांधी हत्येनंतर त्यांना ३-४ वर्ष कारावास भोगावा लागला. हत्येच्या कटात गोवण्यासाठी तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ झाला. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी गुणा व ग्वाल्हेर या दोन मतदारसंघातून प्रचंड मतांनी जिंकून येण्याचा विक्रम केला, आणि ग्वाल्हेर लोकसभेच्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. ना.भा. खरे हे तेथून पुढे निवडून आले. गोवा, मुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेणारे ते पहिलेच लोकसभा सदस्य होते. त्यांची लोकसभेची कारकीर्द अविस्मरणीय झाली. त्यांची भाषणे अतिशय अभ्यासपूर्ण, विनोदप्रचुर ओजस्वी व श्रवणीय अशी असत. त्या काळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे विष्णूपंतांचे अत्यंत चाहते होते. पुढील निवडणुकीत जेव्हा विष्णूपंत लोकसभेवर निवडून आले नाहीत, तेव्हा पहिल्या सत्रांत नेहरूंनी उद्गार काढले की, ‘आता मला पार्लमेंटमध्ये फार अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. एक अभ्यासू व खळखळणारे वक्तृत्व यानंतर ऐकावयास मिळणार नाही.’ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत वायुसेनेचा उपयोग अंतर्गत सुरक्षेसाठी करण्यात येऊ नये, ही त्यांची उपसूचना सरकारला मान्य करावी लागली.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही या देशात झालेल्या राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक लढय़ात वि.घ. सदैव अग्रेसर असत. काश्मीरचा सत्याग्रह, भागानगर सत्याग्रह, काशी- विश्वेश्वर मुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, विदर्भ कृषी विद्यापीठ आंदोलन, कच्छ कराराच्या सत्याग्रहापासून ते थेट आणीबाणीपर्यंत ते सतत संघर्षरत राहिले. वादळवाऱ्यासारखे झंझावाती जीवन होते विष्णूपंतांचे! आपले व्यक्तिमत्त्व जोपासण्याची किंवा आपल्या शरीराची वा संसाराची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. १९६२ साली ते शिमोग्यात अखिल भारतीय हिंदुमहासभेचे अध्यक्ष म्हणून गेले तत्पूर्वी त्यांना हृदयविकाराचा अतिशय जोरदार झटका आला होता. पण, ते स्ट्रेचरहून प्रवास करून शिमोग्याला अधिवेशनाला गेले. नेणाऱ्यांचीही व जाणाऱ्यांचीही धन्यच होती! त्यांचे ते अध्यक्षीय भाषण अतिशय प्रभावी झाले.

१९६७ साली त्यांनी जनसंघात प्रवेश केला व पक्षात एका हिंदुत्वनिष्ठ नेत्याची अनमोल भर पडली. हिंदुमहासभा व जनसंघाचे एकत्रीकरण व्हावे यासाठी विष्णूपंत अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. याच उदात्त भावनेने त्यांनी जनसंघात प्रवेश केला. त्यावेळेस त्यांची कुठलीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यानंतरच्या अल्पमुदतीच्या काळातही पक्षात त्यांनी फार मोलाची कामगिरी केली. १९६८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. विधान परिषदेतील त्यांची भाषणे ऐकण्यास इतर पक्षातील लोक मुद्दाम हजर राहात असत. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा व विद्वत्तेचा आपल्यालाही लाभ व्हावा म्हणून विविध पक्षातील लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरिता जात. त्यांच्या मनमिळावू व विनोदप्रचुर, निगर्वी बोलण्यामुळे राजकारणाच्या क्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. लहानातल्या लहान माणसालासुद्धा त्यांच्याजवळ आपले मनोगत व्यक्त करता येत असे. छोटय़ा मोठय़ा कामांसाठी महाराज लोकांना सतत मदत करीत असत. साऱ्या देशाचे राजकारण जरी त्यांनी केले, तरी आपला गाव, आपले नातेवाईक, आपले गावकरी, देव, धर्म, साधूसंत याचा त्यांना कधीच विसर पडला नाही. हिंदूसमाजवादाचा एक नवा विचार त्यांनी राष्ट्राला दिला. हुंडाबंदी, अस्पृश्यता, अंधश्रद्धा यावर विष्णूपंत कडाडून हल्ले करीत व ते दूर करण्यासाठी प्रयत्नशील असत.

आणीबाणीच्या काळात ते २५ व्यांदा तुरुंगात गेले होते. तुरुंगातून सुटल्यावर ७-८ दिवसांनी ते मेहकरला गेले. गेल्याबरोबर सत्याग्रहींची तुकडी पकडली गेल्याचे विष्णूपंतांना कळले. ते प्रवासातून आलेले पण, क्षणाचीही उसंत न घेता ते टेकडी चढून पोलीस चौकीत सत्याग्रहींना भेटायला गेले. घरी परत आल्यावर त्यांनी विश्रांतीसाठी अंग टाकले, अन् खरोखरीच त्यांनी ७ डिसेंबर १९७५ रोजी चिरविश्रांती घेतली.