विनोबा भावे

अहिंसा आणि मानवाधिकाराचे भारतीय पुरस्कर्ता, भूदान चळवळीचे प्रवर्तक

विनायक नरहर भावे (सप्टेंबर ११, इ.स. १८९५ - नोव्हेंबर १५, इ.स. १९८२), विनोबा भावे नावाने लोकप्रिय, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिकभूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी भावेंची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ]

विनायक नरहर भावे

विनोबा भावे
टोपणनाव: विनोबा
जन्म: ११ सप्टेंबर १८९५
गागोदे, पेण, जि. रायगड
मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२
पवनार, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
भूदान चळवळ
पुरस्कार: भारतरत्न पुरस्कार (१९८३)
धर्म: हिंदू
प्रभाव: महात्मा गांधी
वडील: नरहर शंभूराव भावे
आई: रखुमाबाई नरहर भावे

सुरुवातीचे जीवन

संपादन

कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी ११ सप्टेंबर १८९५ रोजी विनोबा तथा विनायक नरहर भावे यांचा जन्‍म झाला. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भावे यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती[ संदर्भ हवा ]. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रखुमाबाई. वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या.[ संदर्भ हवा ] त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला व गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता.[ संदर्भ हवा ]

जीवन कार्य

संपादन

स्वातंत्र्य लढा

संपादन
 
महात्मा गांधींसोबत विनोबा भावे

भावे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२ मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.[ संदर्भ हवा ]

सामाजिक व धार्मिक कार्य

संपादन

वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे इ. विषयांचे अध्ययन केले.[ संदर्भ हवा ] माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी-शिवनामे, वि.का. सहस्रबुद्धे इत्यादी मंडळीही त्यांच्याबरोबर सहाध्यायी होती. दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते. प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुटीचा म्हणजे अनध्ययनाचा दिवस असे. त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक-विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंदस्वामींच्या समाधिस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक, तात्‍त्‍विक हे असतच; परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बाजूंनी मीमांसाही चालत असे.[ संदर्भ हवा ] दिनकरशास्त्री कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतीकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त कटाचे सदस्य होते. सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांच्याप्रमाणेच त्यांचेही वक्‍तृत्व अमोघ होते. अहिंसक क्रांताची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडीत असत.[ संदर्भ हवा ] १९१७ साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्‍‌भवली. कृष्णेच्या दक्षिण तीरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारून त्यांत प्राज्ञपाठशाळेचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ ४ महिने राहिले. वेदान्ताचे व इतर शास्त्रांचे पाठ त्यांतील एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत. विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे व शांकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करीत, हळूहळू सावकाश फेऱ्या मारीत असत. त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलनंदांच्या मनावर विनोबाजींच्या व्यक्तिमत्त्वाची खूप खोल छाप पडली, विनोबांनी वेदान्ताविषयामध्ये खूप वेगाने १० महिन्यांत प्रगती केली. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृतान्त त्यांनी महात्मा गांधींना कळवला. गांधीं हे वृत्तान्तपत्र वाचून अत्यंत विस्मित झाले. त्या पत्राच्या उत्तरात म. गांधींनी अखेर म्हणले की, " ए गोरख, तूने मच्छिंदरको भी जीत लिया है !".[ संदर्भ हवा ]

विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी १९१८ मध्ये परतले. १९१८ साली एन्फ्ल्यूएंझाची साथ देशभर पसरली. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले. त्यात विनोबांचे वडील, मातुश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले. ही गोष्ट महात्मा गांधीना कळल्यावर त्यांनी विनोबांना मातुश्रींच्या शुश्रूषेकरता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला. विनोबा तयार नव्हते. गांधीनी त्यांचे मन वळवले. आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. वडील बरे झाले. विनोबा सर्वांत ज्येष्ठ पुत्र, म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते. पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करवून घेणे विनोबांना मान्य नव्हते. म्हणून ते स्मशानात गेले नाहीत. वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला.[ संदर्भ हवा ]

१९२१ साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्यास केली. ८ एप्रिल १९२१ रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले. आतापर्यंत संबंध आयुष्य -१९५१ ते ७३ पर्यंतची भूदानयात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार ह्या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या ८ किमी. परिसरातच आहेत. दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले.[ संदर्भ हवा ] रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धान्त होता. 'शरीरश्रमनिष्ठा' हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होते. शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी महत्मा गांधीची मूलभूत राजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय-परिवर्तन करू शकतो, अशी गांधींची धारणा होती. २० ऑक्टोबर १९४० रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.[ संदर्भ हवा ]

१९३२ सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल वजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरुजी इ. मंडळी उपस्थित असत.[ संदर्भ हवा ]

या प्रवचनांचा मुख्य दृष्टिकोन 'गीता ही साक्षात भगवंताची उक्ति होय', असा होता. त्या उक्तीला पूर्ण प्रमाण मानूनच, त्यासंबंधी कसलीही साधकबाधक चर्चा न करताच त्यांनी ती १८ प्रवचने दिली. लो. टिळकांच्या गीतारहस्याचा मुख्य दृष्टिकोन त्यांनी मानला नाही. आद्य शंकराचार्याचाच मुख्य दृष्टिकोन मान्य केला, असे दिसून येते. मोहनिरास म्हणजे अज्ञाननाश हे गीतेचे मुख्य उद्दिष्ट त्यांनी मानले. अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करणे हा उद्देश गृहीत धरून केलेला कर्मयोगाचाच उपदेश गीतेत आहे, हा टिळकांचा दृष्टिकोन विनोबांनी स्वीकारली नाही. विनोबांनी निष्काम कर्मयोग मान्य केला; परंतु युद्धोपदेशाकडे कानाडोळा केला. महात्मा गांधींच्या मताने गीतेमध्ये युद्धाचा आदेश हा भौतिक सशस्त्र युद्धाचा आदेश नाही. मानवी हृदयात चाललेल्या सद्‍भावना व असद्‍भावना यांच्या संघर्षाला काव्यमय बनवण्साठी योजलेले मानवी सशस्त्र युद्धाचे कविकल्पित रूपक गीतेने योजिलेले आहे; महाभारत हा इतिहासग्रंथ नाही म्हणून त्यातील योद्धे आणि युद्धात गुंतलेले शत्रुमित्रपक्ष हे केवळ कविकल्पित होत; असे महत्मा गांधी अनासक्ति योग या पुस्तकात प्रतिपादितात. विनोबा आणि गांधी हे दोघेही निरपवाद अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते. भगवद्‍गीता वाचत असताना विनोबा भगवद्‍गीता हा युद्धोपदेश नाही असे सांगतात आणि महत्मा गांधी ते आध्यात्मिक भावनांचे युद्ध होय, असे सांगतात. हा युद्धाचा मुद्दा सोडला, तर सगळ्या एकेश्वरवादी धार्मिकांना प्रेरणा देणारे अत्युच्च जीवनविषयक व विश्वविषयक तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीतीने गीतेमध्ये सांगितले असल्यामुळे गीता हा हिंदूंनाच नव्हे तर जगातील अध्यात्मवाद्यांना मोहून टाकणारा ग्रंथ आहे, यात शंका नाही. म्हणूनच, गीता जरी सशस्त्र हिंसात्मक युद्धाचा पुरस्कार करत असली, तरी गांधींना आणि विनोबांना या गीतेने कायम मोहून टाकले आहे. म्हणून गांधींनी आणि विनोबांनी जन्मभर सकाळ-संध्याकाळ चालविलेल्या प्रार्थनासंगीतात भगवद्‍गीता ही कायमची अंतर्भूत केली होती.[ संदर्भ हवा ]

वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. १९३६ पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्‍ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्‍भावना निर्माण करण्याचा प्रयत्‍न विनोबांनी केला.[ संदर्भ हवा ]

दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी प्राणत्याग केला. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांनी प्रायोपवेशन सुरू केल्यानंतर केव्हाही अपेक्षित होती. ५ नोव्हेंबर रोजी विनोबांना ताप आला, त्याबरोबरच हृदयविकारही उद्‍भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली. उपचार त्वरित सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्‍णालयात उपचार करण्याकरता नेण्याचा विचार तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी विनोबांना सांगितला; परंतु त्यांनी परंधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले. मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे तज्‍ज्ञ डॉ. मेहता मुंबईहून आले. हळूहळू प्रकृती सुधारेल अशी आशा उत्पन्न झाली. अ‍ॅलोपथीचे उपचारही विनोबांनी स्वीकारले, परंतु ८ नोव्हेंबर रोजी रात्री अन्नपाणी आणि औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला. आचार्यांचे बंधू शिवाजीराव भावे, मित्र दादा धर्माधिकारी इत्यादी मंडळींनी व आश्रमस्थ भक्तजनांनी आचार्यांना परोपरीने काकुळतीस येऊन, अन्नपाणी व औषधे घेण्याची विनंती केली. ती त्यांनी नाकारली. इंदिरा गांधी विनोबाजींना १० नोव्हेंबर रोजी भेटल्या. अन्नपाणी, औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली. प्रायोपवेशनाचा संकल्प करण्याचे कारण आचार्यांनी श्री. त्र्यं. गो. देशमुख व इतर भक्तांना स्पष्ट करून सांगितले. ते म्हणाले- " आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक !" १५ नोव्हेंबर १९८२ रोजी आचार्य विनोबा भावे यांचे पौनार, महाराष्ट्र, भारत येथे निधन झाले.[ संदर्भ हवा ]

विनोबांचे विचार [ संदर्भ हवा ]

संपादन

१) वर्तमानाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी राहते. २) सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. [] ३) आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार म्हणजे शुद्ध व्यवहार . ४) हिंदुधर्माचे स्वरूप : आचार-सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, नीति- धर्माविषयी दृढता. ५) प्राप्तांची सेवा, संतांची सेवा, द्वेष कर्त्याची सेवा ही सर्वोत्तम सेवा. ६) असत्यात शक्ति नाही. आपल्या अस्तित्वासाठी ही त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे. ७) सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. ८) ईश्वर, गुरू, आत्मा, धर्म, आणि संत ही पाच पूजास्थाने. ९) इतिहास म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंतचे सर्व जीवन. पुराण म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला अनुभवाचा अमर अंश.

  • अष्टादशी (सार्थ)
  • ईशावास्यवृत्ति
  • उपनिषदांचा अभ्यास
  • गीताई
  • गीताई-चिंतनिका
  • गीता प्रवचने - भूदानयज्ञाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग झाला. १९३२ साली धुळ्याच्या कारागृहात अनेक संत, सत्पुरुष गोळा झाले होते, त्यांच्या समोर ही प्रवचने झाली. ती साने गुरुजींनी टिपून ठेवली. []
  • गुरूबोध सार (सार्थ)
  • जीवनदृष्टी
  • भागवत धर्म-सार
  • मधुकर
  • मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी)
  • लोकनीती
  • विचार पोथी
  • साम्यसूत्र वृत्ति
  • साम्यसूत्रे
  • स्थितप्रज्ञ-दर्शन

चरित्रग्रंथ[ संदर्भ हवा ]

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ विनोबा भावे - विचार पोथी - ग्राम सेवा मंडळ वर्धा. १९५४
  2. ^ विनोबा भावे (२०१९). गीता प्रवचने (आवृत्ती ५९ वी ed.). पवनार, वर्धा: परमधाम प्रकाशन, पवनार.

बाह्य दुवे

संपादन
  • www.vinoba.in Archived 2023-03-30 at the Wayback Machine. (यावर विनोबांची अनेक पुस्तके मोफत उपलब्ध आहेत.)