राम बाळकृष्ण शेवाळकर
राम शेवाळकर (जन्म : शेवाळ, २ मार्च १९३१; - ३ मे २००९) हे मराठी लेखक, कवी होते.
राम शेवाळकर | |
---|---|
जन्म नाव | राम बाळकृष्ण शेवाळकर |
जन्म |
२ मार्च १९३१ अचलपूर, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
३ मे २००९ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, ललित, चरित्र |
वडील | बाळकृष्ण काशीनाथ शेवाळकर |
आई | गोपिका बाळकृष्ण शेवाळकर |
जीवन
संपादनकयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.
राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.
१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.
अनुवाद
संपादनप्रा. शेवाळकर यांनी अनेक ग्रंथांचे अनुवाद केले. महाकवी भास यांच्या नाट्यावर आधारित ' अग्निमित्र ' हे त्यांचे विशेष पुस्तक. याशिवाय अभिज्ञान शाकुंतल, भासाची नाटके, प्रतिज्ञायौगंधरायण, स्वप्नवासवदत्ता, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कालिदासाची यक्षसृष्टी, चारुदत्त आणि शूद्रकृत मृच्छकटिक, त्रिवेणी हे अनुवादही मराठी-संस्कृतच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे आहेत.
व्याख्याने आणि ध्वनिफिती
संपादनप्रा. शेवाळकरांच्या ध्वनिफिती दर्दी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. अत्यंत ओघवती भाषा या ज्ञानतपस्वींकडे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर भुरळ पाडली. महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधिसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तियोग भाग १ आणि २, अमृतसरिताः (संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह), या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत.
संस्थाविषयक कार्य
संपादनराम शेवाळकरांना अनेक साहित्य संस्थामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, आकाशवाणी सल्लागार मंडळ, संतपीठ सल्लागार समिती, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा कितीतरी संस्थाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष किंवा सदस्य या नात्यानं शेवाळकरांनी मोठी कामगिरी केली.
नागपूर विद्यपीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ते संस्थापक होते. विदर्भातील लेखकांनाही एकत्रित करून त्यांनी 'अभिव्यक्ती' नावाची संस्था स्थापन केली होती.
राम शेवाळकर यांनी लिहिलेली पुस्तके
संपादननाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
अंगारा | कवितासंग्रह | ||
अग्निमित्र | लेखसंग्रह | ||
अमृतझरी | ललित | ||
असोशी | कवितासंग्रह | पराग प्रकाशन, नागपूर | १९५६ |
उजेडाची झाडे | व्यक्तिवर्णन | ||
तारकांचे गाणे | ललित | ||
त्रिदळ | लेखसंग्रह | ||
दर्शन विनोबांचे | व्यक्तिवर्णन | ||
देवाचे दिवे | व्यक्तिवर्णन | ||
ध्यासशिखरे | आत्मकथन | ||
डॉ. पंजाबराव देशमुख | गौरवग्रंथ(स्फादन) | ||
पाणियावरी मकरी | आत्मकथन | ||
पूर्वेची प्रभा | ललित | ||
प्रवास आणि सहवास | व्यक्तिवर्णन | ||
प्रसन्नतेचा मुक कटाक्ष | व्यक्तिवर्णन | ||
भावबंध | व्यक्तिवर्णन | ||
महर्षी विनोबा | चरित्र | ||
माझी दृष्टी माझी सृष्टी | आत्मकथन | ||
माणिकाच्या वाती | ललित | ||
मालविकाग्निमित्रम | अनुवादित, मूळ कालिदासाचे संस्कृत नाटक | ||
माहेरचे दिवस | आत्मकथन | ||
मोरपीस | व्यक्तिवर्णन | ||
रांगोळी | आत्मकथन | ||
रामसेतू | ललित | ||
रुचिभेद | लेखसंग्रह | ||
रेघा | कवितासंग्रह | ||
वर्तुळ आणि क्षितिज | व्यक्तिवर्णन | ||
विक्रमोर्वशीय | अनुवादित, मूळ कालिदासाचे संस्कृत नाटक | ||
शिक्षकाचा धर्म | शैक्षणिक | ||
शिक्षणयात्रा | शैक्षणिक | ||
श्रीवत्स, अमृत | दिवाळी अंक (संपादन) | ||
साम्ययोगी विनोबा | चरित्र | ||
सोयरे | लेखसंग्रह | ||
स्नेहगोत्री | आत्मकथन |
संपादित साहित्य
संपादननाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
अक्षरमाधव | |||
आमचे विनोबा | |||
चित्रगुप्त | |||
तूलाधार | |||
त्रिविक्रम आणि संचित | |||
दर्शन विनोबांचे | |||
निवडक मराठी आत्मकथा | |||
निरूपणचंद्रिका | |||
यशोधन | |||
रूपे तीर्थरूपांची | |||
लोकमान्य टिळकांचे निबंध | |||
विचक्षणा | |||
विचारशासन | |||
विनोबांचे धर्मकीर्तन | |||
विनोबासारस्वत | |||
शिक्षणविचार | |||
संक्राती |
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- 'मॅन ऑफ द इयर ' हा अमेरिकेचा पुरस्कार[१]
- 'साहित्य धुरंधर' पुरस्कार बोस्टन येथील संस्थेतर्फे[१]
- स्वामी विवेकानंद पुरस्कार
- श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य पीठ पुरस्कार
- दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा कुसुमाग्रज पुरस्कार
- नागपूर विद्यापीठाची डी. लिट्.
- डॉ. राधाकृष्णन पुरस्कार
- समाजभूषण पुरस्कार
- विदर्भ गौरव पुरस्कार
- विदर्भ भूषण पुरस्कार
- जीवनव्रती पुरस्कार
- नागभूषण पुरस्कार
- राष्ट्रसेवा पुरस्कार
- साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (पणजी, १९९४); शिवाय जागतिक मराठी संमेलन, जागतिक कीर्तन संमेलन, भंडारा येथे १९७८ मध्ये झालेले विदर्भ साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संमेलन, पहिले आदिवासी साहित्य संमेलन, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन, गुजरात प्रदेश मराठी साहित्य संमेलन, मराठी संत साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
राम शेवाळकर यांच्या संबंधी पुस्तके
संपादन- राम शेवाळकर - अमृताचा धनु (लेखक : नागेश सू शेवाळकर; प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड)
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ यावर जा a b म.टा. विशेष प्रतिनिधी. "परिचय ज्ञानमहर्षी शेवाळकरांचा..." १९ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]