विठ्ठल उमप
विठ्ठल उमप (१५ जुलै, इ.स. १९३१ - २६ नोव्हेंबर, २०१०) हे मराठी शाहीर, लोककलाकार, गायक, अभिनेता आणि गीतकार होते. त्यांनी अनेक कोळीगीते आणि भीम गीते रचली आणि गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या लोकनाट्याचे ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.[१]
विठ्ठल उमप | |
---|---|
![]() विठ्ठल उमप | |
आयुष्य | |
जन्म | १५ जुलै, इ.स. १९३१ |
जन्म स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | २६ नोव्हेंबर, २०१० |
मृत्यू स्थान | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यूचे कारण | हृदयविकाराचा झटका |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | बौद्ध धर्म |
नागरिकत्व | भारतीय |
मूळ_गाव | चिखली, संगमनेर, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र |
देश | ![]() |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
वडील | गंगाराम उमप |
अपत्ये | नंदेश उमप |
संगीत साधना | |
गायन प्रकार | लोकसंगीत, भीम गीते, कोळीगीते, भारूड, लावणी, गझल |
संगीत कारकीर्द | |
पेशा | लोककलाकार, शाहीर, गायक, अभिनेता, गीतकार |
गौरव | |
पुरस्कार | राज्य सांस्कृतिक पुरस्कार (१९९६), दलित मित्र पुरस्कार (२००१) |
प्रारंभिक जीवन
संपादनविठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी मुंबईतील नायगाव येथे झाला.[२] त्यांचे पूर्ण नाव विठ्ठल गंगाराम उमप असे होते. त्यांचे मूळ घराणे विदर्भातील होते, पण कालांतराने ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिखली गावात स्थायिक झाले.[२] त्यांचे वडील गंगाराम उमप हे भेदिका गायन परंपरेतील गायक होते. विठ्ठल उमप यांच्यावर आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधकी तमाशा यांचा मोठा प्रभाव पडला.[३]
लहानपणापासूनच विठ्ठल उमप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली.[३] त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजात लोकगीते आणि पथनाट्यांद्वारे जनजागृती करत होते. विठ्ठल उमप यांनी हेच कार्य पुढे चालू ठेवले.[४]
कारकीर्द
संपादनविठ्ठल उमप यांनी मुंबईतील कामगार वस्तीत मेळा सादर करून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी लोकसंगीताच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि मनोरंजन यांचा समतोल साधला. महाराष्ट्रातील लोककलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.[१] त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे सल्लागार आणि आकाशवाणीचे परीक्षक म्हणूनही काम पाहिले. तसेच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाशीही ते संबंधित होते.[५] महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित शाहिरी शिबिरांचे ते चार वर्षे संचालक होते.
लोकसंस्कृतीची उपासना
संपादनविठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी पोवाडा, भारूड, भजन, लावणी, गझल, कव्वाली, गण-गवळण, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अनेक मराठी लोककलेचे प्रकार सादर केले. त्यांचा "उमाळा" हा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे.[२] १९८३ साली त्यांनी आयर्लंडमधील कॉर्क येथील आंतरराष्ट्रीय लोकनृत्य आणि संगीत महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.[५]
त्यांनी १० चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिंग्या, नटरंग आणि विहीर यांचा समावेश आहे. त्यांनी सतत आपल्या गाण्यांतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. 'अबक, दुबक, तिबक', 'अरे संसार संसार', 'खंडोबाचं लगीन' आणि 'जांभूळ आख्यान' ही त्यांची काही अविस्मरणीय लोकनाट्ये आहेत.[१]
मृत्यू
संपादन२६ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या एका कार्यक्रमादरम्यान विठ्ठल उमप यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.[५][६][७] त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या कुटुंबाला सांगितले होते की हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम असू शकतो.[५]
प्रकाशित साहित्य
संपादन- फू बाई फूगडी फू (आत्मचरित्र)
- माझी वाणी भीमाचरणी (काव्यसंग्रह)
- रंग शाहिरीचे (काव्यसंग्रह)
पुरस्कार
संपादन- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (१९९६)
- दलित मित्र पुरस्कार (२००१)
चित्रपट आणि नाटके
संपादनचित्रपट
संपादन- गलगले निघाले
- टिंग्या
- नटरंग
- पायगुण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- विहीर
- सुंबरान
नाटके
संपादन- अबक, दुबक, तिबक
- अरे संसार संसार
- खंडोबाचं लगीन
- जांभूळ आख्यान
- दार उघड बया दार उघड
- विठ्ठल रखुमाई
संदर्भ
संपादन- ^ a b c "लोकशाहीर विठ्ठल उमप जयंतीनिमित्त त्यांच्या कोळी गीतांचा आस्वाद घ्या". महाराष्ट्र टाइम्स. २३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b c "विठ्ठल उमप". मराठी विश्वकोश. 2024-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "Shahir Vitthal Umap Birth Anniversary: विठ्ठल उमप यांच्याबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?". हिंदुस्तान टाइम्स मराठी. २३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "राजा कांबळे मराठी सिनॉप्सिस" (PDF). शोधगंगोत्री. २३ मार्च २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ a b c d "It could be my last public appearance, Umap had told family". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "शाहीर विठ्ठल उमप यांचं निधन". लोकमत. २३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ^ "लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे निधन". महाराष्ट्र टाइम्स. २३ मार्च २०२५ रोजी पाहिले.